महाराष्ट्रात थंडीची तीव्रता वाढली, 'हा' जिल्हा ठरला सर्वाधिक थंड, तापमान तब्बल...
महाराष्ट्रात गारवा वाढण्यास सुरुवात झाली असून राज्यातील काही भागात थंडीचा कडाका वाढला आहे.
राज्यात थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली असून काही जिल्ह्यांत थंडीचा कडाका जाणवण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये किमान तापमान सरासरीपेक्षा कमी असल्याने पहाटे आणि रात्री थंडी अधिक जाणवण्याची शक्यता आहे. पण दुपारी उन्हाचे चटके बसण्याची शक्यता कायम आहे.
राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव अधिक जाणवत आहे. पुण्यातील किमान तापमान सरासरीपेक्षा 3.3 अंशांनी कमी झाले आहे. साताऱ्यातही तापमानात सरासरीच्या तुलनेत 3.3 अंशांची घट झाली आहे.
पुणे येथे राज्यातील सर्वात कमी 12.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ नाशिकमध्ये 12.6, तर जळगाव आणि सातारा येथे प्रत्येकी 13 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. मुंबईसह उपनगरात पुढील काही दिवसही कमाल तापमान 33 ते 35 अंशांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. किमान तापमानात मात्र काहीसा चढ-उतार होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
पुढील चार ते पाच दिवसांत महाराष्ट्राच्या बहुतांश भागातील कमाल तापमानात विशेष बदल होणार नाही. तर पुढील 48 तासांत महाराष्ट्राच्या अंतर्गत भागातील किमान तापमानात हळूहळू 1 ते 2 अंश सेल्सिअसने घट होण्याचा अंदाज आहे. त्यानंतरच्या दोन दिवसांत किमान तापमानात पुन्हा हळूहळू 1 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.महाराष्ट्रावर रविवारपासून ते बुधवारपर्यंत हवेचा दाब 1014 हेप्टापास्कल इतके राहणार आहेत. त्यानुसार पहाटे व सकाळी थंडीचे प्रमाण सौम्य राहील. किमान व कमाल तापमानातील घसरण सुरू होईल आणि थंडीची तीव्रता आणखी वाढेल. गुरुवारपासून शनिवारपर्यंत किमान व कमाल तापमानात घट होईल. महाराष्ट्रातील बहुतांशी भागात किमान तापमानात 13 ते 14 अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल. हवेच्या दाबात वाढ होऊन ते 1016 हेप्टापास्कलपर्यंत वाढतील. यानंतर राज्यात किमान तापमानातील घसरण वेगाने सुरूच राहील.
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची शक्यता
बंगालच्या उपसागरात अवघ्या तीन आठवड्यांत तिसरे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता असल्याने ओडिशा सरकारने राज्यातील सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. विशेषतः दक्षिण ओडिशा आणि किनार पट्टीवरील जिल्ह्यांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.