"भारताची राज्य व्यवस्था, सरकारी कारभार, यंत्रणा भ्रष्टाचाराने कशी सडली आहे याचे ताजे उदाहरण म्हणजे, राहुल गांधी यांनी केलेले ‘फोन टॅपिंग’चे आरोप. गांधी यांनी सांगितले की, मोदी यांच्याविरोधातले अनेक पुरावे माझ्या फोनमध्ये आहेत. ते पुरावे उडवण्याचा व माझा फोन चोरून ऐकण्याचा प्रयत्न सुरू आहे. गांधी हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत व ते कधीच हवेत बोलत नाहीत. मतचोरीपासून एपस्टीन प्रकरणापर्यंत त्यांनी जे स्फोट केले ते पुराव्यासह खरे ठरले. मोदी यांना काही शंका असतील तर त्यांनी खुल्या मंचावर येऊन आपल्याशी चर्चा करावी, असे आव्हान राहुल गांधी यांनी दिले आहे, पण ते स्वीकारायला मोदी तयार नाहीत. मोदी यांच्या हाती असलेली सत्ता त्यांनी बेकायदेशीर मार्गाने मिळवली आहे. त्यांची सत्ता आता डळमळीत होताना दिसत आहे. त्यामुळे सत्ता वाचवण्यासाठी ते रोज नवा गुन्हा करत आहेत," असा घणाघाती आरोप ठाकरेंच्या शिवसेनेनं केला आहे.
हा विनोदच म्हणावा लागेल
"राजकारण हा गुन्हेगारांचा खेळ बनवून मोदी-शहा वगैरे लोकांनी देशाच्या परंपरेचे धिंडवडे काढले आहेत. राहुल गांधी म्हणतात, त्यांचे फोन ‘टॅप’ होतात. हा विषय चेष्टा करण्याचा नाही, तर गांभीर्याने घ्यायचा आहे. मोदी यांच्याच काळात इस्रायलमधून ‘पेगॅसस’ नावाचे आधुनिक टॅपिंग यंत्र आणले गेले आणि त्या माध्यमातून पत्रकार, विरोधक, स्वपक्षातील मंत्री, नेते, लष्करी अधिकाऱ्यांचे फोन चोरून ऐकण्यात आले. पेगॅसस नेतान्याहूकडून त्यासाठीच आणले गेले. या प्रश्नावर संसदेत गदारोळ झाला. मोदी-शहा इथेही चर्चेपासून पळून गेले. आश्चर्य असे की, इस्रायलमध्ये आता नेतान्याहू व त्यांच्या सरकारचा पराभव झाला आहे. आपला पराभव घडवण्यात परकीय शक्तींचा हात असल्याचा आरोप आता नेतान्याहू करतात हा विनोदच म्हणावा लागेल. ज्या नेतान्याहूने जगभरातील लोकांवर पाळत ठेवली, त्यासाठी संशोधन करून यंत्र निर्माण केले, त्याला स्वतःच्या देशात परकीय शक्ती कार्यरत आहेत हे कसे समजले नाही?" असा सवाल 'आता आले ‘फोन टॅपिंग’, हे सुधारणार नाहीत!' या मथळ्याखालील 'सामना' अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.
मोदींच्या सूचनेवरून विरोधी पक्षनेत्यांचे फोन ‘टॅप’ केले जात असतील तर...
"नेतान्याहूने इस्रायलमध्ये ज्या राजकीय विरोधकांवर पाळत ठेवली, ज्यांचे फोन टॅप केले तेच लोक तेथे सत्तेवर आले. त्यामुळे मोदी जर राहुल गांधी यांचे फोन ‘टॅप’ करत असतील तर त्याचाही अर्थ तोच आहे. मोदी हे जात आहेत व राहुल गांधी सत्तेची सूत्रे हाती घेत आहेत. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात सत्तांतराची प्रक्रिया सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालक पदावरील अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांच्याकडून राज्यातील प्रमुख नेते आणि पत्रकारांवर पाळत ठेवली होती. त्या सगळ्यांचे फोन ‘टॅप’ करून माहिती गोळा केली होती. पोलीस यंत्रणाच त्यासाठी जुंपली गेली होती. प्रशासनातील व पोलीस दलातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना त्याआधी इस्रायलला पाठवून ‘फोन टॅपिंग’चे प्रशिक्षण देण्यात आले. हे सर्व उघड झाल्यावर फडणवीस यांनी असा कांगावा केला की, ‘सरकार मला अटक करू पाहात आहे.’ खरे तर पंतप्रधान मोदी यांच्या सूचनेवरून विरोधी पक्षनेत्यांचे फोन ‘टॅप’ केले जात असतील तर तो गुन्हा आहे व एखाद्याच्या खासगी जीवनावर अतिक्रमण आहे," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
लोकशाहीमध्ये असे प्रकार चालत असतील तर...
"इंडियन टेलिग्राफ अॅक्ट, 1885 च्या कलम 5 (2) नुसार भारताचे सार्वभौमत्व, एकता, राज्याची सुरक्षा कोणी संकटात आणत असेल तर अशा आणीबाणीच्या वेळी केंद्र किंवा राज्य सरकार फोन टॅप करू शकतात. अशा फोन टॅपिंगचे आदेश देशाचे किंवा राज्याचे गृह सचिव देऊ शकतात. टेलिकम्युनिकेशन अॅक्ट, 2023, कलम 20 मध्येही हीच तरतूद कायम केली गेली आहे. राहुल गांधी व इतर राजकीय विरोधकांकडून देशाच्या अखंडतेला कोणता धोका आहे की, ज्यामुळे त्यांचा फोन टॅप केला जात आहे? मोदी, शहा, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भ्रष्टाचाराचे व व्होट चोरीचे वाभाडे काढणे हे कृत्य राष्ट्रीय एकात्मतेला धोका आहे असे सरकारला वाटत असेल तर त्यांचे डोके तपासायलाच हवे. फोन टॅपिंग हा सरळ सरळ नागरिकांच्या गोपनीयतेच्या अधिकाराचा भंग आहे. मोदी व त्यांचे लोक हे बेकायदेशीर कृत्य नक्कीच करत असावेत. राहुल गांधीच कशाला, हे लोक योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणवीस, राजनाथ सिंह, लष्करी अधिकाऱ्यांचेही फोन ‘टॅप’ करीत असावेत. भारतीय लोकशाहीची पातळी रसातळाला नेणारा हा प्रकार आहे. लोकशाहीमध्ये असे प्रकार चालत असतील तर या राज्यपद्धतीवर लोकांनी विश्वास का ठेवावा? असाच प्रश्न उपस्थित होईल व हे भ्रष्ट, जुलमी सरकार उलथवून टाकण्यासाठी लोक रस्त्यावर येतील," असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.