'मोदी-शहा वगैरे पंपूचे ‘लवणेन भोज्यम्’ करणारी...', शिवसेनेकडून भाजपावर हल्लाबोल, शहांना म्हणाले 'टकलावरचे उरलेसुरले केस उपटत...'
निवडणूक यादीत घोटाळे आहेत हा विरोधी पक्षाचा आरोप नसून दोन निवडणूक आयुक्तांनीच तसे उघडपणे चव्हाटय़ावर आणले आहे. तरीही ज्ञानेश कुमार हे निर्लज्जपणे खुर्चीला चिकटून बसले आहेत व शहा, मोदी या भ्रष्ट माणसांना संरक्षण देत आहेत अशी टीका सामना संपादकीयमधून करण्यात आली आहे.
निवडणूक यादीत घोटाळे आहेत हा विरोधी पक्षाचा आरोप नसून दोन निवडणूक आयुक्तांनीच तसे उघडपणे चव्हाटय़ावर आणले आहे. तरीही ज्ञानेश कुमार हे निर्लज्जपणे खुर्चीला चिकटून बसले आहेत व शहा; मोदी या भ्रष्ट माणसांना संरक्षण देत आहेत. या संरक्षक भिंती रविवारच्या ‘रॅली’ने डळमळून गेल्या आहेत असा हल्लाबोल शिवसेनेने सामना संपादकीयमधून केला आहे. रॅली अडवण्याचे सरकारचे सर्व प्रयोग फेल गेले. 1975 साली सत्ताबदलाची जी गर्जना रविवारी त्याच मैदानावरून झाली. मोदी, शहा व ज्ञानेश कुमारला जावेच लागेल हाच ‘रामलीला’ मैदानावरील रॅलीचा संदेश आहे. एकंदरीत, मोदी-शहा वगैरे पंपूचे ‘लवणेन भोज्यम्’ करणारी ही रॅली देशात क्रांती घडवेल असा विश्वास शिवसेनेने व्यक्त केला आहे.
"भारतीय जनता पक्षाची झोप उडवणारी प्रचंड गर्दी ‘रामलीला’ मैदानावर उसळली हे ‘इंडिया आघाडी’चे यश मानावेच लागेल. ज्ञानेश कुमार या भ्रष्ट मुख्य निवडणूक आयुक्ताविरोधात ‘चलो दिल्ली’चा नारा राहुल गांधी यांनी दिला व 1 नोव्हेंबरला देशभरातून लाखो लोक दिल्लीत पोहोचले. भाजपच्या नेत्यांना ही गर्दी दिसली नाही. ते म्हणतात, पाच-सहा हजार लोक जमले. ही त्यांची भीती बोलत आहे. राहुल गांधी यांना ‘पप्पू’ ठरवण्याचा प्रयत्न मोदी-शहांनी केला, पण आता राहुल गांधी यांनी त्याच मोदी-शहांना सळो की पळो करून सोडले आहे," अशी टीका शिवसेनेने केली आहे.
'...हा मोदींच्या मनातील भित्रेपणा'
"रविवारी दिल्लीचे बहुतेक रस्ते गर्दीने ‘जाम’ झाले होते व ‘रॅली’त अडथळे आणण्यासाठी जागोजागी फौजफाटा आणि अडथळे उभे केले होते. तरीही रामलीला मैदान व दिल्लीचे रस्ते गर्दीने ओसंडून वाहत होते. याचा अर्थ मोदी-शहा-ज्ञानेश कुमारच्या ‘मतचोरी’ प्रकल्पाच्या विरोधात जनता उसळली आहे. गोदी मीडियाने कितीही झाकण्याचा प्रयत्न केला तरी कोंबडे आरवलेच. लोकांत उत्साह प्रचंड होता व गेल्या पन्नासेक वर्षांत दिल्लीत इतकी प्रचंड राजकीय गर्दी झाली नव्हती. भारतीय जनता अन्यायाविरोधात लढायला तयार नाही व ती मोदीभक्तीने आंधळी झाली आहे हा गैरसमज रविवारच्या भव्य ‘रॅली’ने खोटा ठरवला. 1 नोव्हेंबरचा ‘दिल्ली चलो’ नारा मोदी-शहांच्या मस्तवालपणाला आव्हान देणारा होता. हुकूमशहाला जनतेचे आव्हान पेलवत नाही व तो सैरभैर होतो. अमित शहा यांनी ‘दिल्ली चलो’चा नारा हा अराजकतेला निमंत्रण आहे असे सांगितले, तर विरोधी पक्ष देशाचे विभाजन करू पाहत असल्याची बोंब पंतप्रधान मोदी यांनी ठोकली. हा त्यांच्या मनातला भित्रेपणा आहे," अशी टीका करण्यात आली आहे.
अरुणाचल प्रदेशातील चीनची घुसखोरी, मणिपूरमधील हिंसाचार, प. बंगाल व महाराष्ट्रासारख्या राज्यांतील कायदा-सुव्यवस्थेची बिघडलेली स्थिती देशाला अस्थिरतेकडे नेणारी आहे असे आमच्या पंतप्रधानांना वाटत नाही, पण विरोधकांनी निवडणूक आयुक्तांच्या भ्रष्ट कारभाराविरोधी घडलेली मोहीम, लोकशाहीच्या रक्षणार्थ सुरू केलेले आंदोलन अराजक वाटते हे मोदी-शहांच्या भंपकपणाचे लक्षण आहे असा टोला लगावण्यात आला आहे.
पुढे म्हटलं आहे की, "रामलीला मैदानावरील ‘रॅली’ ही लोकशाही संरक्षणासाठी केलेली गर्जना आहे. 25 जून 1975 नंतर दिल्लीत अशी गर्जना झाली नव्हती. 25 जून 1975 या दिवशी जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही रक्षणासाठी प्रचंड जनसमुदाय रस्त्यावर उतरला होता. रामलीला मैदानावरही गर्दी उसळली होती. रविवारी, 1 नोव्हेंबर रोजी रामलीला मैदानावर झालेली ‘चलो दिल्ली’ रॅली त्याच ‘जे.पी.’ आंदोलनाची आठवण करून देते. लोकांचा तोच उत्साह, तोच संताप व तीच ‘रेजिम चेंज’ करण्याची जिद्द दिसून येत होती. राहुल गांधी यांनी दिल्लीवर नियंत्रण मिळवले आहे व ते देशातील मोठय़ा गर्दीचे नेतृत्व करताना रविवारी दिसले. रामलीला मैदानाकडे निघालेली गर्दी व त्या गर्दीत सर्व विरोधी पक्षांसह राहुल गांधी यांनी घेतलेल्या आघाडीने भाजपची अवस्था बिकट झाली. उघडय़ा बसमध्ये राहुल गांधी ड्रायव्हरच्या बाजूला बसले व मागे समस्त विरोधी पक्ष त्यांच्या पाठीशी हे चित्र मोदी-शहांची झोप उडवणारे आहे".
राहुल गांधी यांनी सांगितले की, ‘‘2024 साली मोदी-शहांचा पराभवच झाला आहे. ज्ञानेश कुमारच्या मदतीमुळेच हे दोन हुकूमशहा पुन्हा सत्तेवर आले. त्यामुळे मोदी, शहा, ज्ञानेश कुमारला जावेच लागेल.’’ यावर मोदी यांनी नवी पिपाणी वाजवली की, ‘‘मोदी कहीं नहीं जाएगा!’’ यावर गांधी यांनी आव्हान दिले, ‘‘होय, मोदी कुठेच जाणार नाहीत. आम्ही त्यांना सोडणार नाही. कुठेच पळू देणार नाही. त्यांच्या पापाचा हिशेब केला जाईल व मोदी, शहा, ज्ञानेश कुमारवर कायदेशीर कारवाईच केली जाईल.’’ याचा अर्थ मोदी वगैरे लोक कुठेच जाणार नाहीत व ते थेट दिल्लीच्या तुरुंगातच जातील असा दावा त्यांनी केला आहे.
मतचोरी ही आता राष्ट्रीय घोषणा झाली आहे. जनतेची घोषणा बनली आहे. मतदार यादीतले घोटाळे, मतदारांची नावे कोटय़वधींच्या संख्येने उडवणे, एसआयआरच्या नावाखाली मोदी-शहांना मदत होईल असे काम करणे याविरोधातील जनमताचा उद्रेक म्हणजे अराजक नाही. उलट मोदी, शहा, ज्ञानेश कुमारने निर्माण केलेल्या भयंकर स्थितीच्या विरोधातील हे जनतेचे बंड आहे असं म्हटलं आहे.
बारा वर्षांत आपण स्वतःच्याच टकलावरचे उरलेसुरले केस उपटत होतात काय?
शहा म्हणतात, ‘‘इंडिया आघाडी मतदार यादीतल्या बांगलादेशी घुसखोरांचे समर्थन करत आहे.’’ शहा यांचे वक्तव्य बिनडोकपणाचे आहे. जी साडेतेरा कोटी नावे मतदार यादीतून वगळली गेली ते सगळे काय बांगलादेशी आहेत? बांगलादेशची लोकसंख्या 15 कोटी इतकी आहे, पण भारतात साडेतेरा कोटी बांगलादेशी मतदार यादीत हे शहांचे म्हणणे असेल तर गृहमंत्री म्हणून ते त्यांचे अपयश आहे. बारा वर्षांत आपण स्वतःच्याच टकलावरचे उरलेसुरले केस उपटत होतात काय? साडेतेरा कोटी बांगलादेशी गृहमंत्री अमित शहा पोसत आहेत व त्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी शहांची हकालपट्टीच करायला हवी अशी मागणी शिवसेनेने केली आहे.