भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील कोदामेढी येथे लग्न जमवण्याच्या कारणावरून दोन गटांत जोरदार हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत शिवीगाळ, मारहाण, महिलेचा विनयभंग तसेच अल्पवयीन मुलीला बलात्काराची धमकी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
याप्रकरणी दिघोरी मोठी पोलिसांनी 30 जणांविरुद्ध विविध गंभीर कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहेत. 11 नोव्हेंबर रोजी सकाळी ही घटना घडली. घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी भंडाऱ्यासह लाखांदूर, अड्याळ आणि दिघोरी मोठी येथील 40 हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हाणामारीत जखमी झालेल्यांवर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, रात्री उशिरापर्यंत दुसऱ्या गटाकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, या हाणामारीत एका गटाकडून महिलेचा विनयभंग करण्यात आल्याचा आणि अल्पवयीन मुलीला बलात्काराची धमकी देण्यात आल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. कोदामेढी गावात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यासह लाखांदूर, अड्याळ आणि दिघोरी मोठी येथील तब्बल 40 हून अधिक पोलिस अधिकारी आणि पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी तैनात करण्यात आला आहे.
बुलढाण्यातही मारहाणीचा प्रकार समोर आला आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या भालेगाव येथील निलेश निकम आणि त्यांचे मुलाला गावातीलच काही लोकांनी जुन्या पोस्टच्या झालेल्या वादा संदर्भात बैठकीत माफी मागायला बोलावून जबर मारहाण केलीय. या घटनेत निलेश निकम यांचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा किरकोळ जखमी झाला आहे. दरम्यान मृतकाचे नातेवाईकांनी मेहकर पोलिसात धाव घेतली असता पोलिसांनी दहा ते अकरा लोकांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
मृतक निलेश निकम यांच्या लहान मुलाने दोन महिन्यापूर्वी एक समाज माध्यमावर पोस्ट व्हायरल केली होती. तेव्हापासून गावात धुसफूस सुरू असताना गावांतील आणि बाहेरून आलेल्या काही लोकांनी मृतक निलेश आणि त्यांच्या लहान मुलाला बैठकीत बोलावून माफी मागायचे ठरविले. दरम्यान माफी मागितल्यावर बैठकीतील 20 ते 25 लोकांनी दोघंही बाप , लेकाला मारहाण केली आणि यातच निलेश निकम यांचा मृत्यू झाला.