कात्रज प्रकरण नेमकं काय? ज्यामुळे न्यायालयाच्या बाहेरच मंदार किवळेला संपण्याचा झाला प्रयत्न!
पुण्यात शिवाजीनगर न्यायालयाबाहेर मंदार किवळेवर जीवघेणा हल्ला झाला. 2025 मधील कात्रजच्या शुभम चव्हाण हत्याकांडाशी या हल्ल्याचा काय संबंध आहे? संपूर्ण घटनाक्रम जाणून घेऊया.
पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाबाहेर बुधवारी भरदिवसा झालेल्या हल्ल्याने शहरात खळबळ उडाली आहे. मंदार मारुती किवळे याच्यावर काही हल्लेखोरांनी बंदुकीने गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात मंदार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, मंदार हा 2025 मध्ये पुण्यातील कात्रज परिसरात झालेल्या शुभम चव्हाण हत्याकांडातील आरोपी आहे. या जुन्या हत्येचा बदला घेण्यासाठीच हा हल्ला करण्यात आल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. नेमकं काय आहे हे कात्रज प्रकरण आणि मंदार किवळेवर हल्ला का झाला? जाणून घेऊया पाच मुद्द्यांत.
काय आहे कात्रज हत्याकांड?
20 एप्रिल 2025 रोजी पुण्यातील कात्रज परिसरातील संतोषनगर येथे शुभम सुभाष चव्हाण याची हत्या झाली होती. जमिनीच्या आणि आर्थिक व्यवहाराच्या वादातून हा खून झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात मंदार मारुती किवळे याच्यासह काही जणांना पोलिसांनी अटक केली होती.या हत्याकांडामुळे कात्रज परिसरात मोठी खळबळ उडाली होती. शुभमच्या हत्येनंतर त्याच्या कुटुंबीयांकडून न्यायाची मागणी केली जात होती. या प्रकरणातील आरोपी आणि मृत शुभमच्या कुटुंबीयांमध्ये पूर्ववैमनस्य निर्माण झाल्याचा संशय आता न्यायालयाबाहेरील हल्ल्यानंतर व्यक्त केला जात आहे.
दीड वर्ष तुरुंगात राहिल्यानंतर मंदार किवळे जामिनावर बाहेर
शुभम चव्हाण हत्या प्रकरणात मंदार किवळे याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात तो कारागृहात होता. त्याला नुकताच उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्याची माहिती समोर आली आहे. हल्ल्याच्या काही दिवस आधीच तो तुरुंगातून बाहेर आला होता. बुधवारी त्याला शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणीसाठी उपस्थित राहायचे होते. त्यासाठी तो न्यायालयात आला होता. न्यायालयीन कामकाज पूर्ण करून बाहेर पडत असताना त्याच्यावर हल्ला करण्यात आला. त्यामुळे जुन्या हत्याकांडातील वैमनस्यातूनच हा प्रकार घडला का, या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे.
न्यायालयाच्या गेट क्रमांक 4 बाहेर थरार
बुधवारी दुपारी साधारण 1.15 वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट क्रमांक 4 जवळ ही घटना घडली. मंदार बाहेर येत असताना दुचाकींवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्याला लक्ष्य केले. हल्लेखोरांची संख्या पाच ते सहा होती.हल्लेखोरांनी सुरुवातीला बंदुकीचा वापर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोळीबाराचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर त्यांनी धारदार कोयत्याने मंदारवर वार केले. या हल्ल्यात त्याच्या हातांना गंभीर दुखापत झाली. रक्तबंबाळ अवस्थेत काही पावले चालल्यानंतर तो रस्त्यावर कोसळल्याचे घटनास्थळावरील व्हिडीओमध्ये दिसते. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कात्रज हत्येचा बदला घेण्यासाठी हल्ला?
या हल्ल्यामागे कात्रजमधील शुभम चव्हाण हत्या प्रकरणाचा संबंध असल्याचा प्राथमिक संशय आहे. शुभमच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांशी संबंधित व्यक्तींनी हा हल्ला घडवून आणला असावा, अशी शक्यता तपासात तपासली जात आहे. मात्र, शुभमचा भाऊ अक्षय चव्हाण किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीचा हल्ल्यातील सहभाग अद्याप अधिकृतरीत्या सिद्ध झालेला नाही. त्यामुळे या टप्प्यावर कोणालाही हल्ल्याचा सूत्रधार म्हणणे योग्य ठरणार नाही. पोलिसांकडून वैयक्तिक वैमनस्य आणि जुन्या हत्याकांडाशी संबंधित सर्व शक्यता तपासल्या जात आहेत.
घटनास्थळावर दोन पिस्तुले जप्त
हल्ल्यानंतर पुणे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान घटनास्थळावरून दोन पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत. न्यायवैद्यक पथकानेही घटनास्थळाची पाहणी केली. न्यायालय परिसरातील आणि आसपासच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे. पोलिसांनी संशयित हल्लेखोरांची ओळख पटल्याचे सांगितले असून त्यांच्या अटकेसाठी गुन्हे शाखेची पथके रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान, डॉक्टरांच्या प्राथमिक माहितीनुसार मंदारच्या शरीरावर गोळी लागल्याच्या खुणा आढळल्या नसून त्याच्या जखमा धारदार शस्त्रांमुळे झाल्या आहेत. या घटनेमुळे न्यायालयासारख्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.