राक्षसभुवनमध्ये गोदावरी आटली! दशक्रिया विधीसाठी भाविकांना विकतचं पाणी; तीर्थक्षेत्रावर दुष्काळाचं सावट!
दुष्काळाचे भयानक परिस्थिती बीडमध्ये पहायला मिळत आहे. गोदावरी आटली आहे. दशक्रिया विधीसाठी भाविकांना विकतचं पाणी घ्यावं लागतं आहे.
बीड न्यूज : बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या राक्षसभुवन येथील गोदावरी नदीपात्र कोरडेठाक पडलंय. नदीत पाणीच नसल्याने दशक्रिया विधीसाठी येणाऱ्या नागरिकांना विकतचं पाणी घेऊन विधी करावे लागत आहेत. या भयाण दुष्काळाचा फटका भाविकांना पडला आहे.
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथील गोदावरी नदीपात्राची. जिथे एरवी तुडुंब भरणारी नदी. तिथं आज फक्त दगड, खडक आणि वाळू उरली आहे. संपूर्ण पात्र ९० टक्के कोरडं पडलं आहे. शिल्लक राहिलेलं पाणीही गढूळ झालं आहे. त्यामुळे दशक्रिया विधी करणेही कठीण झाले आहे. एवढेच नाही तर पाणी देखील गढूळ असल्याचा आरोप भाविकांनी केला. शासनाने यावर तोडगा काढला पाहिजे अशी मागणी भाविक करत आहेत.
पाणी नसल्याने येथे आता जुगाड सुरू झाला आहे. स्थानिकांनी गोदावरीच्या पात्रात पाच फुटांचे खड्डे खोदून झरे तयार केले आहेत. या झऱ्यातून निघणारे पाणी विकले जात आहे. दशक्रिया विधीसाठी खड्ड्यामधून 300 ते 700 रुपये मोजून विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. सिमेंटच्या रिंग टाकून तयार केलेल्या विहिरीतून विद्युत मोटारीने पाणी उपसून पाईपखाली भाविकांना आंघोळ करावी लागत आहे.
दररोज 25 पेक्षा जास्त दशक्रिया विधी येथे होत आहेत. शनी महाराज देवस्थान साडेतीन पीठांपैकी मुख्य आहे. इथं पाण्याची परिस्थिती बिकट आहे. येणाऱ्या भाविकांना अंघोळीला पाण्याची सोय नाहीये, पिण्याची सोय नाहीये. गेल्यावर्षी भरपूर पाणी होतं, यंदा पाणीच नाहीये, त्यामुळे भाविक कमी झालेत.
राक्षसभुवन हे मराठवाड्यासह महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि तेलंगणातून नागरिक दशक्रिया विधीसाठी येतात. भाविकांची संख्या घटल्याने येथील पूजा साहित्य विक्रेते, भटजी आणि छोटे व्यावसायिक यांच्या रोजगारावर गदा आली आहे. त्यामुळे शासनाने येथे कायमस्वरूपी उपाय म्हणून पाणी आडवा, पाणी जिरवा आणि बंधाऱ्याची योजना राबवावी, अशी मागणी होत आहे. पाणी आडवा पाणी जिरवा ही योजना राबवणं गरजेचं आहे.
कारण हे तीर्थक्षेत्र आहे. साडेतीन पीठातलं नंबर एकचं पीठ असल्यामुळं इथं राज्यातून, परराज्यातून लोकं दर्शनाला, दशक्रिया विधीला येतात. पाणीच नसलं नदी पात्रात तर कुठून येणार आहे? म्हणून शासनाने या ठिकाणी बंधाऱ्याची योजना राबवावी अशी मागणी आता जोर धरत आहे.
एकीकडे श्रद्धा आणि धार्मिक परंपरा जपण्यासाठी राक्षसभुवनमध्ये येणारे भाविक, तर दुसरीकडे पाण्याअभावी निर्माण झालेली भयाण परिस्थिती अशा दुहेरी संकटात हे तीर्थक्षेत्र सापडलं आहे. त्यामुळे तात्पुरती पाण्याची सोय करण्यासोबतच गोदावरी नदीपात्रात कायमस्वरूपी जलसंधारणाचे उपाय राबवण्याची गरज आहे. अन्यथा पाण्याअभावी केवळ भाविकांची गैरसोयच नाही, तर या तीर्थक्षेत्राशी जोडलेल्या अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचाही प्रश्न गंभीर होणार आहे. आता शासन या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन राक्षसभुवनला पाणीटंचाईतून दिलासा देणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.