Glenn Maxwell Retirement : ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज आणि जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडूंच्या यादीत नाव मिळवलेल्या ग्लेन मॅक्सवेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. वनडे फॉरमॅटमधून तो आधीच निवृत्त झालेला त्यानंतर मॅक्सवेल आता टी20 आणि टेस्ट क्रिकेटमधूनही निवृत्त झाला आहे. मॅक्सवेल जगभरातील विविध टी20 लीगमध्ये आपली आक्रमक शैली दाखवणे सुरूच ठेवणार असला, तरी त्याला पुन्हा कधीही ऑस्ट्रेलियाची पिवळी जर्सी परिधान केलेली पाहायला मिळणार नाही.
मॅक्सवेलची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अशा रोमांचक घडामोडीने भरलेली आहे, ज्यांनी क्रिकेटच्या इतिहासात एक विशेष स्थान मिळवून दिले आहे. 2023 च्या वनडे वर्ल्ड कप दरम्यान वानखेडे स्टेडियमवर अफगाणिस्तानविरुद्ध त्याने खेळलेली 201 धावांची नाबाद खेळी, वनडे क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळींपैकी एक मानली जाते. गंभीर क्रॅम्प्स येत असूनही त्याने केवळ लेग साइड शॉट्सचा वापर करून सिक्स मारले आणि 91 धावांत 7 विकेट गमावलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला ऐतिहासिक विजयापर्यंत पोहोचवले. वनडे क्रिकेटच्या इतिहासात सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन दुहेरी शतक झळकावणारा तो पहिलाच फलंदाज ठरला.
मॅक्सवेलची कारकीर्द :
मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियासाठी 149 वनडे सामने खेळले असून त्यात 126.70 च्या प्रभावी स्ट्राईक रेटसह एकूण 3895 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 4 शतके आणि 23 अर्धशतके झळकावली. ज्यामध्ये अफगाणिस्तानविरुद्ध खेळलेली नाबाद 201 धावांची ऐतिहासिक खेळी ही त्याची सर्वोच्च धावसंख्या ठरली. याशिवाय आपल्या ऑफ स्पिन गोलंदाजीच्या जोरावर वनडे सामन्यांमध्ये 77 विकेट्स सुद्धा मिळवले. त्याने 110 हून अधिक टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 150 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने 2600 हून अधिक धावा केल्या आहेत. या काळात त्याने 5 शानदार शतकं आणि 11 अर्धशतकं झळकावली. गोलंदाजीच्या बाबतीत सांगायचे तर, त्याने टी20 क्रिकेटमध्ये 44 विकेट्सही मिळवले आहेत.