बीडमधील कार अपघातात मोठा ट्विस्ट! अल्पवयीन चालकाच्या वडिलांना अटक; मुलगाही ताब्यात; BJP नेत्याच्या मुलामुळे अपघात चर्चेत
बीडच्या माजलगाव अपघात प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली असून, अल्पवयीन चालकाच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे.
बीडच्या माजलगाव येथील गढी रोडवरील भीषण अपघातात गायकवाड दाम्पत्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अल्पवयीन चालकाचे वडील संभाजी नाईकनवरे यांच्याविरुद्ध मोटार वाहन कायद्याच्या कलम 199-अ ची वाढ करून त्यांना अटक करण्यात आली आहे. संभाजी नाईकनवरे यांना न्यायालयात, तर अल्पवयीन चालक अनुजला बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात येणार आहे.
भाजपा नगरसेवक दिलीप मेंडके यांनी आपला मुलगा वाहन चालवत नसून अल्पवयीन असलेला नाईकनवरे वाहन चालवत असल्याचा व्हिडिओ दाखवला होता. यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या अपघातात तीन मुलांच्या डोक्यावरील आई-वडिलांचे छत्र हरपल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
माजलगावमध्ये झालेल्या भीषण अपघातात प्रल्हादराव गायकवाड आणि त्यांच्या पत्नी सुनीता गायकवाड दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारच्या सुमारास बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात घडली. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे. सीसीटीव्हीमध्ये भरधाव कार जोडप्याच्या मोटारसायकलला समोरुन धडक देताना दिसत आहे. धडक इतकी भीषण होती की, मोटारसायकलवरील दोघेही हवेत उडून रस्त्यावर जाऊन आदळले.
हे ही वाचा - बीड: भाजपा नगरसेवकाच्या मुलाच्या गाडीने दिलेल्या धडकेत पती-पत्नीचा मृत्यू; रेसिंगचा कुटुंबीयाचा दावा; BJP नेत्याने दिला व्हिडीओ पुरावा
अपघातानंतर प्रल्हाद गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला, तर सुनीता यांचा रुग्णालयात नेत असताना दुखापतींमुळे मृत्यू झाला. मृत दाम्पत्याचा मुलगा आदित्य गायकवाड याने सांगितले आहे की, "काही मुलांनी मौजमजेसाठी एकमेकांशी शर्यत (रेसिंग) लावल्यामुळे ही घटना घडली. अल्पवयीन मुलांनी वाहने चालवणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. या घटनेमुळे मी माझे आई-वडील गमावले आहेत. असे वाटतेय की, जणू माझे स्वतःचे आयुष्यच संपले आहे."
ते म्हणाले, "ही घटना घडली तेव्हा माझ्या वडिलांचा जागीच मृत्यू झाला. आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात दोन गाड्या दिसल्या, एक 'इनोव्हा क्रिस्टा' आणि दुसरी 'क्रेटा'. माझ्या वडिलांना 'क्रेटा' कारने धडक दिली होती. त्यांना 400 मीटरपर्यंत फरफटत नेले गेले; त्यांचे मृतदेह पाहणेही आमच्यासाठी असह्य होते. हे अत्यंत भयावह होते."
'माझा मुलगा गाडी चालवत नव्हता,' भाजपा नेत्याचा दावा
ज्या दक्ष मेंडके याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला तो गाडी चालवत नव्हता तर अनुज नाईकनवरे हा गाडी चालवत असल्याचे भाजपा नगरसेवक दीपक मेंडके यांनी सांगितलं आहे. याच्या पुराव्यासाठी त्यांनी एक व्हिडिओ देखील दिला आहे. दीपक मेंडके म्हणाले, "अपघातावेळी अनुज नाईकनवरे हा गाडी चालवत होता. माझा मुलगा शेजारच्या सीटवर बसला होता. अनुज यांच्यावर गुन्हा दाखल न करता माझ्या मुलावर केला. मी नगरसेवक आहे, माझी पत्नी नगरसेवक आहे. मला राजकीय द्वेषातून बदनाम करण्याचा प्रयत्न झाला आहे".
अनुज नाईकनवरे याने स्वतः पोलिस ठाण्यात येऊन जबाब दिला आहे. मी पोलिस अधिकाऱ्यांशी बोललो आहे. पोलिसांनी अधिक तपास करायला हवा. हा रेसचा प्रकार नसून केवळ राजकीय बदनामी पोटी केलेले षडयंत्र आहे. ज्या अनुज नाईकनवरेच्या हातून अपघात झाला त्याने तसा जबाब देखील दिला आहे असं त्यांनी सांगितलं आहे.