संजय शिरसाट यांनी 5 कोटींची लाच मागितली, संजय राऊतांच्या आरोपानंतर महाराष्ट्रात खळबळ
अण्णाभाऊ साठे ट्रेनिंग सेंटरच्या प्रस्तावासाठी मंत्री संजय शिरसाट यांनी 5 कोटींची लाच मागितली, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत आज समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्यावर निशाणा साधला आहे. अण्णाभाऊ साठे ट्रेनिंग सेंटरच्या प्रस्तावासाठी संजय शिरसाट यांनी 5 कोटींची लाच मागितली, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे. संजय राऊत छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असताना हे मोठं विधान त्यांनी केलं आहे. एवढंच नाहीतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केलं.
संजय राऊत नेमकं काय म्हणालेत?
काल संभाजीनगरला आल्यावर लातूरचे एक सामाजिक कार्यकर्ते नरसिंग उदगीरकर मला भेटले. उदगीरकर हे मातंग समाजाचे नेते आहेत. अण्णाभाऊ साठेंच्या नावाने लातूरमध्ये ट्रेनिंग सेंटर उभं करण्यासाठी उदगीकर यांनी प्रस्ताव दिला होता. त्यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता केली होती. 25 कोटी रुपयांचं ट्रेनिंग सेंटर उभारायचं होतं. त्यात दलित मुलं आणि मातंग समाजातील मुलांना स्पर्धा परीक्षांचं प्रशिक्षण मिळावं किंवा शैक्षणिक कार्यक्रम व्हावेत म्हणून हा प्रस्ताव दिला होता. खरं तर अशा प्रस्तावाला वाट पाहायला लागू नये. पण उदगीरकर हे वारंवार हेलपाटे मारत होते. ओएसडी सिद्धार्थ भंडारी यांनी मंत्र्यांना भेटल्याशिवाय काम होणार नाही म्हणून उदगीरकर यांना सांगितलं.
मंत्र्यांनी उदगीरकरांना भेटायला बोलावलं. समोरासमोर बसवलं. मंत्री शिरसाटच डीलिंगला बसले होते. मी 25 कोटी मंजूर करतो. पण तुला मला 5 कोटी द्यावे लागतील. उदगीकर म्हणाले, दलितांसाठी काम करत आहे. 5 कोटी कुठून देऊ? थोडेफार देऊ शकतो. त्यावर मंत्र्याने प्रस्ताव मंजूर होणार नाही म्हणून सांगितलं. अजूनही प्रस्ताव अजूनही मंजूर झाला नाही. आणि हे लोक बाळासाहेब ठाकरेंचं नाव सांगतात. मी सांगतो ते तथ्य तपासा. नरसिंग उदगीरकर यांना बोलवा. ते काय सांगतात ते ऐकून घ्या, असंही ते यावेळी म्हणालेत.