अभिनेत्रीचा 24 व्या वर्षी मृत्यू, तिच्या लास्ट फोन कॉलमुळे वाचला बॉयफ्रेंड; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालेलं?
यशाच्या शिखरावर असताना वयाच्या 24 व्या वर्षी तिने अचानक जगाचा निरोप घेतला. त्यानंतर जवळपास दहा वर्षांनी तिच्या बॉयफ्रेंडला तिच्यासोबत झालेल्या शेवटच्या फोन कॉलचा फायदा झाला असून या कॉलवर जे काही बोलणं झालेल्या त्यामुळेच तो आज वाचलाय. नेमकं हे प्रकरण काय ते पाहूयात...
1 एप्रिल 2026 रोजी गोरेगाव पश्चिम येथील भाड्याच्या घरात आत्महत्या करणारी बालिका वधू फेम अभिनेत्री प्रत्यूषा बॅनर्जीच्या बॉयफ्रेंडला कोर्टाने निर्दोष मुक्त केलं आहे. या प्रकरणामध्ये प्रत्यूषाला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा ठपका प्रत्यूषाचा कथित प्रियकर अभिनेता राहुल राज सिंहवर ठेवण्यात आलेला. मात्र या प्रकरणामधून राहुल हा केवळ एका फोन कॉलमुळे वाचला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने राहुलला आरोपमुक्त केले आहे. दशकभराच्या लढाईनंतर त्याला हा दिलासा मिळाला असून एक फोन कॉल या निकालामध्ये निर्णायक ठरलाय. या फोन कॉलवर झालेल्या बोलण्यामुळेच तो वाचलाय. नेमकं काय बोलणं झालेलं या दोघांमध्ये? हा खटला काय होता? जाणून घेऊयात...
आईने केलेली तक्रार
प्रत्यूषाने 1 एप्रिल 2016 रोजी गोरेगाव पश्चिम येथील भाड्याच्या घरात आत्महत्या केली होती. तिच्या आईच्या तक्रारीवरून बांगूरनगर पोलिसांनी प्रियकर राहुल राज सिंहविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता. राहुलच्या वकिलांनी युक्तिवाद करताना एफआयआर दाखल करण्यासाठी घाई करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला. आत्महत्येची चिठ्ठी ठेवलेली नसताना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आल्याचेही राहुलच्या वकिलांनी नमूद केले.
... म्हणून उच्च न्यायालयात धाव
बांगूरनगर पोलिसांनी या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले होते. राहुलने आरोपमुक्त करण्यासाठी अर्ज केला. मात्र, दिंडोशी सत्र न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला होता. त्याविरोधात त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली.
अखेरच्या फोन कॉलमुळे वाचला
राहुलच्या वकिलांनी प्रत्यूषा आणि राहुल यांच्यातील अखेरच्या रेकॉर्डेड संभाषणाचा दाखला न्यायालयासमोर दिला. या संभाषणातून राहुलने प्रत्यूषाला कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये, असे समजावण्याचा प्रयत्न केल्याचे आणि तिच्याबद्दल आपुलकी व्यक्त केल्याचे सांगण्यात आले. या बाबी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाशी विसंगत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणले. न्यायालयाने त्यांचा हा मुद्दा विचारात घेतला. याच मुद्द्याच्या आधारे न्यायालयाने राहुलला निर्दोष मुक्त केलं. प्रत्यूषाने आत्महत्या करण्याआधी तिला केलेल्या अखेरच्या कॉलवरील संभाषणामुळे राहुल या खटल्यातून निर्दोष बाहेर पडला.
लहान वयात मिळालेली प्रसिद्ध अन् अनपेक्षित मृत्यू
2010 मध्ये छोट्या पडद्यावर आलेल्या ‘बालिका वधू’ मालिकेमधून प्रत्यूषा बॅनर्जी देशातील घराघरात ओळखीचा चेहरा झाली. या मालिकेचं कथानक पुढे गेल्यानंतर अविका गोरच्या जागी प्रौढ आनंदीची भूमिका प्रत्यूषाने साकारली. सुमारे 2010 ते 2013 दरम्यान प्रत्यूषाने ही भूमिका साकारली. विशेष म्हणजे तिला ही भूमिका टॅलेंट हंटमधून मिळाली होती. प्रत्यूषाने ‘हम हैं ना’, ‘ससुराल सिमर का’, ‘गुलमोहर ग्रँड’, ‘आहट’, ‘सावधान इंडिया’ तसेच रिॲलिटी शो ‘बिग बॉस 7’ (2013) आणि ‘झलक दिखला जा 5’ यासारख्या रिअॅलिटी शोमध्येही सहभाग नोंदवला. मात्र ती ‘आनंदी’ म्हणूनच अधिक प्रसिद्ध होती. वयाच्या 24 व्या वर्षी तिने गळफास घेऊन स्वत:ला संपवलं. पोस्टमॉर्टमनुसार मृत्यूचे कारण असफिक्सिया (गुदमरून) होते आणि पोलिसांनी सुरुवातीला आत्महत्या म्हणून नोंद केली. प्रत्यूषा ज्याच्यासोबत शेवटचं बोलली होती त्या राहुलनेच तिचा मृतदेह सर्वात आधी पाहिला. तो तिला तातडीने रुग्णालयात घेऊन गेला. मात्र तिथे तिला मृत घोषित करण्यात आले.