निकाल लागताच महायुतीच ठिणगी! मित्रपक्षाने युतीचा धर्म पाळला नाही, प्रवीण दरेकरांचा आरोप, 'धंगेकरांना वरुन आदेश आले...'
विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन, भाजपा, काँग्रेस व शिवसेना गटाचे प्रत्येकी एक उमेदवार निवडून आले आहेत. पदवीधरच्या तिन्ही जागांवर महाविकास आघाडीला विजय मिळाल्याने महायुतीला धक्का बसला आहे.
विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन, भाजपा, काँग्रेस व शिवसेना गटाचे प्रत्येकी एक उमेदवार निवडून आले आहेत. पदवीधरच्या तिन्ही जागांवर महाविकास आघाडीला विजय मिळाल्याने महायुतीला धक्का बसला आहे. दरम्यान या निकालानंतर महायुतीत वादाची ठिणगी पडताना दिसत आहे. भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी मित्रपक्षांनी युतीचा धर्म पाळला नसल्याचा आरोप केला आहे. आम्ही महायुतीचा धर्म बजावला. पण महायुतीच्या घटकपक्षांनी हा धर्म बजावला नाही असं ते म्हणाले आहेत. महायुतीत राहून महायुतीच्या विरोधात भूमिका घेणं हे कोणालाच परवडणारं नाही असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
"पुण्याची जागा पडली कारण आमच्या मित्रपक्षाने आपले मतदार दुसऱ्या पक्षाकडे वळवले त्यामुळे फरक पडला. अन्यथा तिथे स्मिता जाधव निवडून आल्या असत्या. सर्व निकाल पाहिले तर भाजपा महायुतीचं प्रामाणिकपणे काम करत आहेत. अमरावती आणि इतर ठिकाणी जिथे भाजपाचे उमेदवार उभे राहिले तिथे आम्ही कारवाई केली आणि सहा वर्षासाठी निलंबन केलं. श्रीकांत देशपांडे, शिंदे आणि उमेदवार यांचं गणित केलं तर सरनाईकांना पराभवाला सामोरं जावं लागलं असतं. पण आम्ही महायुतीचा धर्म बजावला. पण महायुतीच्या घटकपक्षांनी हा धर्म बजावला नाही," असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
"मैत्रीपूर्ण लढत केली इथपर्यंत ठीक आहे. पण मित्रपक्षाला एनडीएच्या उमेदवाराला पराभूत करण्याचं काम आमच्या युतीपक्षाने केलं आहे. हे स्पष्ट आहे कारण रवींद्र धंगेकर यांनी निवडणुकीपूर्वी आवाहन केलं आहे आणि जिंकल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाचा महत्त्वाचा नेता अशी भूमिका घेतो आणि हे वरुन आदेश आल्याशिवाय होत नाही. त्यामुळे याचं अवलोकन करता शिंदेंनी लक्ष घातलं पाहिजे," अशी मागणी त्यांनी केली आहे.
"महाराष्ट्रातील जनतेने देवाभाऊंच्या, तेव्हा असणारे अजित पवार आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात सरकार बनवलं आहे. पण आपल्यात अशा कुरघोड्या होत असतील, तू मोठा की मी मोठा असे पलटवार होणार असतील तर महायुतीच्या भविष्यासाठी चांगलं नाही. आमचा पक्ष तर नेहमी आत्मचिंतन करतो, चुका दुरुस्त करतो आणि लोकांसमोर जातो. एकनाथ शिंदेंच्या पक्षानेही आपली भूमिका माध्यमांच्या माध्यमातून अतातायीपणे मांडू नये जेणेकरुन महायुतीत वितुष्ट होणार नाही," अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
"दुसऱ्याच्या वरातीत नाचायचं तसं आपलं वाटोळं झालं आहे, लोकांनी शून्य केलं आहे याची जाण काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेला नाही. ही विकृती आहे. काँग्रेसला फक्त एक जागा मिळाली आहे, तीदेखील दुसऱ्या पसंतीची मतं आहे. काँग्रेसची परंपरागत जागा भाजपाने जिंकली आहे," अशी टीका त्यांनी केली.