26/11 हल्ल्याला 18 वर्षे झाली तरी अजून नाही मिळाली कसाबच्या वकिलांना फी; अजूनही पाहतायत वाट!
26/11 मुंबई हल्ल्याला 18 वर्षे पूर्ण होत असताना अजमल कसाबची बाजू मांडणारे वकील अमीन सोलकर आणि फरहाना शाह यांचे मानधन अद्याप थकित असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याला यंदा 18 वर्षे पूर्ण होत असताना, दहशतवादी अजमल कसाबची मुंबई उच्च न्यायालयात बाजू मांडणाऱ्या दोन वकिलांची फी अद्याप थकित असल्याची बाब समोर आली आहे. अॅड. अमीन सोलकर आणि अॅड. फरहाना शाह यांनी कसाबच्या फाशीच्या शिक्षेविरोधातील अपीलात सुमारे नऊ महिने युक्तिवाद केला होता. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाकडून नियुक्ती होऊनही त्यांचे मानधन मिळाले नसल्याचे या दोन्ही वकिलांचे म्हणणे आहे. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
कसाबची बाजू मांडणाऱ्या दोन वकिलांचे मानधन रखडले
26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 166 जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यातील एकमेव जिवंत पकडला गेलेला दहशतवादी अजमल कसाब याला कनिष्ठ न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल झाल्यानंतर अॅड. अमीन सोलकर आणि अॅड. फरहाना शाह यांनी कसाबची बाजू मांडली. मात्र, इतकी वर्षे उलटूनही या कामाचे मानधन मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
2010 मध्ये नियुक्ती
मुंबई उच्च न्यायालयाने या दोन्ही वकिलांची नावे निश्चित केली होती. त्यानंतर 8 जून 2010 रोजी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाने अधिसूचना काढून त्यांची नियुक्ती केली. कसाबच्या फाशीच्या शिक्षेच्या पुष्टीकरणाची सुनावणी आणि त्याच्या अपीलात बचाव पक्षाची बाजू मांडण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. उच्च न्यायालयात जवळपास नऊ महिने या प्रकरणाची सुनावणी सुरू होती.
किती मानधन अपेक्षित?
नियुक्तीच्या अधिसूचनेनुसार, अमीन सोलकर यांना विशेष सरकारी वकिलांच्या मानधनाच्या धर्तीवर, तर फरहाना शाह यांना फाशीच्या शिक्षेच्या पुष्टीकरणाच्या प्रकरणात काम करणाऱ्या अतिरिक्त सरकारी वकिलांच्या धर्तीवर मानधन देण्याचे ठरले होते. उपलब्ध माहितीनुसार, हे मानधन दिवसाला साधारण 1500 ते 2000 रुपये इतके होते.
नोंदी सादर करण्याची मागणी
मानधनासाठी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाकडे वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न सुटलेला नाही. प्राधिकरणाकडून न्यायालयात कोणत्या तारखांना आणि किती तास उपस्थित होते, याची तपशीलवार बिले व नोंदी मागितल्या जात आहेत, असे दोन्ही वकिलांचे म्हणणे आहे. इतक्या वर्षांनंतर प्रत्येक दिवसाचा तपशील उपलब्ध करून देणे अवघड असल्याचे वकिलांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, मानधन मंजूर करण्यासाठी नियमानुसार बिले आणि मेमो सादर करणे आवश्यक आहे, असे प्राधिकरणातील अधिकाऱ्यांच्या म्हणणे आहे.
कसाबला 2012 मध्ये पुण्यातील येरवडा कारागृहात फाशी
मुंबई उच्च न्यायालयाने फेब्रुवारी 2011 मध्ये कसाबची फाशीची शिक्षा कायम ठेवली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही शिक्षेवर शिक्कामोर्तब केले. 21 नोव्हेंबर 2012 रोजी पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात कसाबला फाशी देण्यात आली. विशेष न्यायालयात कसाबची बाजू मांडणारे अॅड. अब्बास काझमी यांनी मात्र आपले मानधन सरकारकडून वेळेत मिळाल्याचे सांगितले आहे. त्यामुळे उच्च न्यायालयातील अपीलासाठी नियुक्त केलेल्या वकिलांचे मानधन अद्याप का रखडले?, हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.