SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'... मग ते ₹500 कोटी गेले कुठे? हा प्रश्न शाह, फडणवीस, शिंदे यांना...', जरांगेंच्या आरोपावरुन राऊतांचे प्रश्न; 'एका दगडात तीन...'

मनोज जरांगे पाटलांनी पत्रकार परिषदेमध्ये ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये कथितरित्या भाजपाच्या नेत्यांनी अंतर्गत चर्चेदरम्यान जरांगेंना 500 कोटी रुपये देण्यात आल्याबद्दल भाष्य केल्याचा दावा केला. यावरुन राजकारण तापलेलं असतानाच त्यात आता ठाकरेंच्या शिवसेनेनं उडी घेतली आहे.

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Oct 23, 2026, 10:46 AM IST | Updated: Oct 23, 2026, 11:07 AM IST
Image Credit: जरांगेंच्या आरोपावरुन साधला निशाणा
Join

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांसमोर ऑडिओ बॉम्ब फोडला. जरांगेंनी सादर केलेल्या या ऑडिओमध्ये 500 कोटी रुपये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे खासदारपुत्र श्रीकांत शिंदेंच्या माध्यमातून भाजपाने आपल्याला दिलेले अशी चर्चा भारतीय जनता पार्टीच्या गोटात सुरु असल्याचा दावा जरांगेंनी केला. यावरुन आता शिंदेंची शिवसेना आणि भाजपामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु असतानाच खासदार संजय राऊत यांनी सदर प्रकरणात एका दगडात तीन पक्षी मारले जात आहेत असं सूचक विधान केलं आहे.

जरांगे खोटं बोलत आहेत का हे भाजपने सांगायला पाहिजे

"त्यांच्यावर झालेले सगळे खोटे आणि आमच्यावर केलेले आरोप खरे.  भाजपवर केलेले आरोप खोटे, फॅब्रिकेटेड आणि आमच्यावर खरा आरोप केला होता. महाविकास आघाडीवर, नेत्यांवर जे आरोप झाले ते खरे हा कोणता न्याय?" असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. तसेच, "जरांगे खोटं बोलत आहेत का हे भाजपने सांगायला पाहिजे," अशी मागणीही राऊत यांनी केली.

ते 500 कोटी रुपये गेले कुठे?

"पात्र परिचय हा काल झालेला आहे. 500 कोटी कोणाला दिले तर श्रीकांत शिंदेना दिले. हे कोण बोले? भाजपचे लोक. भाजप फोन टॅप करते.  सगळे भाजप करते त्यांच्याकडे यंत्र आहेत. असं असताना एआय जनरेटेड आहेत असं सांगितलं जातं. श्रीकांत शिंदेंना 500 कोटी दिले हे भाजपकडून सांगितले गेले. मनोज जरांगे म्हणतात आमच्याकडे आले नाही मग गेले कुठे? हा प्रश्न शाह, फडणवीस, शिंदे यांना पडला पाहिजे. हा प्रश्न ईडी आणि सीबीआयला पडला पाहिजे. काल मुंबई महाराष्ट्रात स्त्रीबीज प्रकरणात धाडी झाल्या आणि 29 लाख जप्त केले. आहो पण इथे 500 कोटींचा विषय आहे," असंही राऊत म्हणाले.

रोज 5-6 एसआयटी स्थापन करतात

"निवडणूक आयोग गुलाम आहे तसेच या संस्था सुद्धा झाल्या आहेत. आम्हाला यांच्या विरोधात आंदोलन घ्यावे लागेल. आता त्या 500 कोटींची तपासणी कोण करणार? तर एसआयटी स्थापन करणार. आतापर्यंत शेकडो एसआयटी स्थापन केल्या आहेत. ते रोज 5 ते 6 एसआयटी स्थापन करतात. खेळ सुरू आहे सगळा," असा टोला राऊतांनी लगावला. "शिंदे, अजित पवार गटाकडून सुरू असलेल्या गोष्टींचा स्फोट जरांगे यांनी केला हे अतिशय महत्वाचे काम केले आहे," असंही राऊत म्हणाले. "आम्ही जर याविरोधात आंदोलन केले तर आम्हाला देशद्रोही ठरवले जाईल. जेलात टाकले जाईल. आम्हाला चिरडले जाईल," असं राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं.

कोण कोणाचा गेम करतंय?

कोण कोणाचा गेम करतंय असं विचारलं असता राऊत यांनी, "शिंदे आणि फडणवीस हे एकमेकांवर तलवार चालवत आहेत. इथे एका दगडात तीन पक्षी मारायचे असे सुरू आहे. जरंगेना बदनाम करायचे आणि शिंदे फडणवीस यांच्यात वाद आहे," असा दावा केला.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.

ZEENEWS TRENDING STORIES