एसटीचा सात दिवसांचा ऑनलाइन पास काढा आणि राज्यात कुठेही फिरा, असे असतील पासचे दर!
महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटीच्या ‘आवडेल तेथे प्रवास’ योजनेबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या ‘आवडेल तेथे प्रवास’ योजना कित्येक वर्षांपूर्वी सुरू केली आहे. या योजनेचा पास सुरुवातीला आगारात जाऊन काढावा लागत होता. मात्र आता हा पास ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळं आता आगारात जाऊन हस्तलिखित पद्धतीने पास काढण्याची आवश्यकता नाही, अशी माहिती समोर येत आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एसटी बस ही ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. एसटी बसच्या लालपरीने किफायतशीर दरात प्रवास करता येऊ शकतो. महाराष्ट्रासह बाहेरील राज्यांमध्ये कुठेही कधीही जायचे असेल, तर एसटी महामंडळाची ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ योजना आहे. या योजनेअंतर्गत 7 दिवस व 4 दिवस याप्रमाणे बसेच्या प्रकारानुसार तसेच आंतरराज्यांसह प्रवास सुविधा उपलब्ध करून दिली जाते.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने आवडेल त्या ठिकाणी कोठेही प्रवास करण्यासाठी ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ ही सवलत योजना प्रवाशांसाठी MSRTC मार्फत राबविली जाते. एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने 29 सप्टेंबर 2026 रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार 4 व 7 दिवसांच्या पाससाठी ऑनलाइन कार्यप्रणाली सुरू केली आहे. महामंडळाचे अधिकृत संकेतस्थळ तसेच मोबाईल ॲप्लिकेशन मध्ये ही सुविधा उपलब्ध आहे.
प्राप्त झालेला पास प्रिंट स्वरूपात किंवा मोबाईलमध्ये पीडीएफ स्वरूपात दाखवता येईल. ऑनलाइन पद्धतीने मिळालेल्या पासवर क्यूआर (QR) कोड देण्यात येणार तो प्रवासावेळी स्कॅन केला जाईल.
पाससाठी किती पैसे मोजावे लागतील
दरम्यान, 7 दिवसांच्या पाससाठी साधी / एक्सप्रेस / रात्रसेवा / शहर बस प्रवास करायचा असेल तर, प्रौढ प्रवाशांना ₹2,775 आणि 5 ते 12 वर्षे मुलांसाठी ₹1,390 इतका दर आकारण्यात येतो. हेच 4 दिवसांचा पास हवा असेल तर अनुक्रमे ₹1,590 आणि ₹800 रुपये मोजावे लागतील. याच योजनेत शिवशाही आसनी आंतरराज्यसह बस प्रवासासाठी 7 दिवसांच्या पासचा दर प्रौढ प्रवाशांना ₹3,180 आणि 5 ते 12 वर्षे मुलांसाठी ₹1,595 इतका आहे. हेच 4 दिवसांचा पास हवा असेल तर अनुक्रमे ₹1,525 आणि ₹915 रुपये भरावे लागतील. तसेच ई-बस शिवाई 12 मीटर बस प्रवासासाठी प्रौढ प्रवाशांना 7 दिवसांच्या पाससाठी ₹3,625 आणि 5 ते 12 वर्षे मुलांसाठी ₹1,815 इतका दर आहे. हेच हेच 4 दिवसांचा पास हवा असेल तर अनुक्रमे ₹2075 आणि ₹1045 मोजावे लागतील.