पवारांना धक्का? आव्हाडांच्या 3 शब्दाच्या व्हॉट्सअप स्टेटसनं एकच खळबळ; नंतर स्टेटस डिलिट करून म्हणाले, 'मी सत्ता...'
शरद पवारांचे निकटवर्तीय अशी ओळख असलेले कळवा-मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला ठेवलेले तीन शब्द राज्याच्या राजकारणामध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चां तसेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षात काही वेगळ्या घडामोडी घडण्याच्या चर्चांना वेग आला असतानाच आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसनं एकच खळबळ उडून दिली आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात चर्चा झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी हे स्टेटस हटवलं असून पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नेमकं हे तीन शब्दांचं स्टेटस काय होतं? आव्हाड काय म्हणाले? त्यांची मुलगी नताशा आव्हाड यांनी केलेल्या पोस्टवर खासदार संजय राऊत यांनी रिप्लाय केला असून या स्टेटससंदर्भात आव्हाडांनी काय म्हटलंय जाणून घेऊयात सविस्तरपणे...
जितेंद्र आव्हाडांच्या लेकीनं काय पोस्ट केली?
केंद्रात मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी सकारात्मक भूमिका मांडली. त्यानंतर या मुद्द्यावरून पक्षांतर्गत विविध मतप्रवाह समोर येत असून पक्षाचे नेते व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांची कन्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शप) युवक सरचिटणीस नताशा आव्हाड यांनी या विधेयकाला पाठिंबा देणं म्हणजे देशाशी आणि देशाच्या संविधानाशी प्रतारणा करण्यासारखंच आहे, असे स्पष्ट मत व्यक्त केले. नताशा आव्हाड यांनी 'एक्स' पोस्टद्वारे याबाबत भूमिका मांडताना माझा पक्ष या विधेयकाला पाठिंबा देण्याचा विचार करत असल्याच्या वृत्तामध्ये तथ्य असेल, तर मी या निर्णयाचा तीव्र निषेध करते. मतदारांची वाढती संख्या लक्षात घेता पुनर्रचना आवश्यक असले, तरी प्रस्तावित विधेयक हे विरोधकांना मिळू शकणाऱ्या जागांची संख्या मर्यादित करण्याचा आणि त्याच वेळी भाजपला अनुचित राजकीय फायदा मिळवून देण्याचा घटनाबाह्य प्रयत्न आहे, असं नताशा आव्हाड म्हणाल्या आहेत.
भाजपची लोकप्रियता सातत्याने घसरत असताना, सत्तेला चिकटून राहण्यासाठीचा हा त्यांचा शेवटचा केविलवाणा प्रयत्न आहे. या देशाची लोकशाही व्यवस्था टिकवून ठेवण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाने या बिलाला प्रखर विरोध केला पाहिजे", असे मत नताशा आव्हाड यांनी व्यक्त केले. तसेच पक्षाने आपल्या भूमिकेचा फेरविचार करावा, अशीही मागणी त्यांनी केली.
यावर जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
"असे आहे की, नताशा माझी कन्या आहे. एकुलती एक कन्या आहे. तिच्यावर अंकुश आणण्याचे काम आम्ही केले नाही," म्हणत आव्हाड यांनी लेकीची मतं वेगळी असू शकतात असं मत नताशा आव्हाड यांच्या ट्विटवर बोलताना नोंदवलं. पुढे बोलताना, "जाहीरपणे सांगतो, आमच्यावर पवार साहेबांचे उपकार आहेत. हे मला समजतं तिला नसेल कळले. पवार साहेब लोकशाहीवादी आहेत. ती काय वाचते, ती वाचन संस्कृतीमधील आहे," असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
आव्हाड यांचं स्टेटस काय होतं?
'दैव जाणिले कुणी' असे स्टेटस जितेंद्र आव्हाड यांनी ठेवले. यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले. मात्र, काही वेळातच आव्हाड यांनी हे स्टेटस डिलीट केल्याने चर्चांना आणखी रंग चढला. अखेर आव्हाड यांनी पत्रकारांशी चर्चेदरम्यान यामागील खरं कारण सांगितलं.
स्टेटस हटवण्यासंदर्भात काय म्हणाले?
स्टेटस हटवण्यासंदर्भात विचारलं असता आव्हाड यांनी, "मी गाणे ऐकत बसलो होतो आणि ते स्टेटसला गेलं," असं उत्तर दिलं. पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांसोबत एकनिष्ठ राहणार असल्याचं अधोरेखित केलं. "मी शरद पवारांसोबत आहे. सत्ता असू द्या नसू द्या, माझे सर्वस्व शरद पवार आहेत! शरद पवार इक्वल टू एव्हरिथींग," असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.