राज ठाकरे कर्जतच्या जंगलात जिथं झाड तोडली तिथचं जाणार, सभा घेणार, 'सह्याद्रीच्या रक्षणासाठी' मनसे आक्रमक
कर्जतमधील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरे थेट मैदानात उतरले आहेत. राज ठाकरे कर्जमध्ये जाऊन वृक्ष तोडीची पाहणी करुन सभा घेणार आहेत.
राज ठाकरे : कर्जतमधील वृक्षतोडीला विरोध करत राज ठाकरेंनी रणशिंग फुंकलं आहे. 'सह्याद्रीच्या रक्षणासाठी'अशी टॅगलाईन घेत मनसेनं टीझर रिलिज केला आहे. कर्जतमधील वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी राज ठाकरे उद्या कर्जत दौऱ्यावर जाणार आहेत. जंगलातील वृक्षतोडीच्या ठिकाणी भेट देत ग्रामस्थ आणि आदिवासी बांधवांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर राज ठाकरेंची सभा होणार असून या सभेचा टीझर प्रदर्शित करण्यात आला.
वृक्षतोडीवरुन राजकीय वातावरण पेटले
कर्जतमधील जंगलात टोरंट प्रकल्पाच्या ऊर्जा प्रकल्पासाठी होत असलेल्या वृक्षतोडीवरुन राजकीय वातावरण चांगलच पेटले आहे. मनसे आणि शिवसेना UBT नं या वृक्षतोडीविरोधात रान उठवलं आहे. आदित्य ठाकरेंनी काल कर्जतच्या जंगलात वृक्षतोडीची पाहणी केली. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे कर्जतमध्ये उद्या सभा घेतोय. दरम्यान, या प्रकल्पाला वाढता विरोध बघता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रकल्पाची बाजूनं ठाम भूमिका घेतलीय. त्यामुळं यावरुन राजकीय आरोपप्रत्यारोपाचा वणवा भडकू लागला आहे.
जैन धर्मगुरू निलेश चंद्र मुनी यांचा राज ठाकरेंना पाठिंबा
कर्जतच्या जंगलातील वृक्षतोडीला विरोध करत जैन धर्मगुरू निलेश चंद्र मुनी यांनी राज ठाकरेंचं समर्थन केलंय.. कबूतरांवरून मनसे आणि निलेशचंद्र मुनी यांच्यात मतभेद झाले होते. पण आता वृक्षतोडीच्या विरोधातील मुद्द्यावर त्यांच्यात एकमत झालंय... कर्जतच्या जंगलातील वृक्षतोडीच्या विरोधात राज ठाकरेंनी भूमिका घेतली आहे. त्या भूमिकेला जैन समाजानं पाठिंबा द्यावा असं आवाहन निलेश चंद्र मुनी यांनी केलीये. गरज पडल्यास आंदोलनात सहभागी होऊ असंही ते म्हणालेत.
कर्जतमधील वृक्षतोडीवर संजय राऊतांनी संताप व्यक्त करत केंद्र आणि राज्य सरकार मानवी राक्षस असल्याचा हल्लाबोल केला आहे. हा लढा थांबणार नाही, प्रकल्प कसा होतो बघूच असा इशारा राऊतांनी दिला आहे.
कर्जतमधील प्रस्तावित टोरंट पंप स्टोरेज प्रकल्पावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापला आहे. या मुद्यावरुन आदित्य ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेत कर्जत गाठत वृक्षतोडीला विरोध केला आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना प्रकल्पाबाबत पुन्हा आपली भूमिका स्पष्ट केली. प्रकल्पाची संपूर्ण माहिती न घेता आणि त्याचा अभ्यास न करता विरोध केला जात आहे, असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.
टोरंट पंप स्टोरेज प्रकल्पासाठी कर्जत आणि भीमाशंकर अभयारण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळं या वृक्षतोडीला पर्यावरणप्रेमी, स्थानिक नागरिक आणि विरोधी पक्षांकडून तीव्र विरोध केला जात आहे. मात्र राज्य सरकार हा प्रकल्प तडीस नेण्यावर ठाम आहे त्यामुळं वृक्षतोडीवरुन वणवा आणखी भडकत जाणार हे नक्की.