पवारांच्या मागे हा निर्णय झाला, जाहीर पत्रात रोहित पवारांचा अत्यंत गंभीर दावा, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
टीका होताना साहेब स्वत: भूमिका मांडू शकत नाहीत, स्पष्टीकरणही देऊ शकत नाहीत असा अत्यंत गंभीर दावा रोहित पवार यांनी केला आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली आहे.
रोहित पवार : डिलिमिटेशनला पाठिंबा देऊ नका, असं पत्र रोहित पवारांनी खासदार सुप्रिया सुळेंना दिले आहे. विधेयकाला पाठिंबा दिल्यास पुरोगामी विचारांना धक्का बसेल. दबाव झुगारुन डिलिमिटेशन विधेयकाला विरोध करा, असं रोहित पवार म्हणालेत. डिलिमिटेशन अर्थात परिसीमन विधेयकाला पाठिंबा म्हणजे जनतेशी प्रतारणा असल्याचं रोहित पवार पत्रात म्हणालेत. पवारांच्या मागे हा निर्णय झाला. पक्षातल्या काही आमदार आणि खासदारांचा सत्तेत जाण्यासाठी दबाव असल्याचा खळबळजनक आरोप रोहित पवार यांनी केला.
रोहित पवार यांच्या पक्षाच नेमकं आहे तरी काय?
हे पत्र लिहिताना मनात प्रचंड अस्वस्थता आणि वेदना आहे. आदरणीय पवार साहेब सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळं कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्याच्या स्थितीत नाहीत. साहेबांच्या या अवस्थेनं आपल्या सर्वांच्याच मनात काहूर माजलंय. पण ते लवकरच ठणठणीत बरे होतील असा विश्वासदेखील आहे. अशा कठीण प्रसंगी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याबाबत सुरु असलेल्या चर्चांमुळं राज्यातील पुरोगामी विचारांना मानणाऱ्या जनतेला मोठा धक्का बसला आहे.
डिलिमिटेशनला पाठिंबा देण्याच्या चर्चेमुळं पुरोगामी वर्ग, निष्ठावान मतदार आणि तळागाळातील कार्यकर्ते प्रचंड नाराज आणि अस्वस्थ आहेत. याच संतापातून आणि नैराश्यातून तुमच्यासह पवार साहेबांवर मोठ्या प्रमाणात टीका होतेय. ज्या नेत्यानं आयुष्यभर पुरोगामी विचारांसाठी रक्त आटवलं त्या साहेबांवर अशी टीका होताना साहेब स्वत: भूमिका मांडू शकत नाहीत आणि स्पष्टीकरणही देऊ शकत नाहीत. अशा वेळी त्यांच्यावर होणारी टीका पाहून माझ्याप्रमाणेच तुमच्याही मनाला वेदना होत असणार यात तिळमात्र शंका नाही.
साहेब आजारी असताना त्यांच्यामागं घेतल्या जाणाऱ्या या निर्णयामुळं त्यांच्या आयुष्यभराच्या तपाचा भंग होऊ नये ही माझी प्रामाणिक भावना आहे. आपल्या पक्षातील काही खासदार आणि आमदार सत्तेसोबत जाण्याचा विचार करतायत किंवा काहींना सत्तेसोबत जाण्यास भाग पाडलं जातंय. त्यांचा आपल्यावर दबाव असणं स्वाभाविक आहे.
पण ज्यांना जायचं असेल त्यांना खुशाल जाऊ द्या, त्यांचे खरे चेहरेदेखील समोर येऊ द्या. कुणी गद्दारी करणार असेल तर असे गद्दार आमदार-खासदार इथली स्वाभिमानी जनता पुन्हा कदापी निवडून देणार नाही. कोणताही निर्णय घेताना केवळ आमदार-खासदार यांचं मत महत्वाचं नसतं तर लाखो कार्यकर्ते, पदाधिकारी, मतदार आणि नागरिकांची भावनाही महत्वाची असते आमदार आणि खासदारांनाही आपली भूमिका स्पष्ट करावी लागेल, धाडस दाखवावं लागेल. आपण डोळे झाकले म्हणजे लोकांचं लक्ष आपल्याकडे नाही असं कुणीही समजू नये.
देशातील लोकशाहीसमोरची आव्हानं पाहता आपण या विधेयकाच्या बाजूनं उभं राहणं हे आपल्या विचारांशी प्रतारणा ठरेल. तुमच्यातील संवेदनशील मनाला साद घालण्यासाठी एक सहकारी आणि कुटुंबातील सदस्य म्हणून डिलिमिटेशन विधेयकाला विरोध करावी आशी साद मी घालतोय. साहेबांच्या विचारांचा वारसा अखंड ठेवण्यासाठी आपण या विधेयकाला विरोध करण्याचा निर्णय नक्की घ्याल असा मला विश्वास आहे.
आपल्याच पक्षातील सत्तापिपासू खंडोजी खोपडे हे आपल्या मनात अनेक गोष्टी भरवत असावेत. आर्थिक ताकद आणि सत्ता असल्याशिवाय निवडणुका जिंकायच्या तरी कशा? हा त्यांचा नेहमीचा युक्तिवाद असतो. आपल्यातल्या खंडोजी खोपडे यांना हाताशी धरुन भाजपनं हे षडयंत्र रचलं असलं तरी या पापात आपण भागीदार का व्हायचं? तुमचा चेहरा पुढं करुन आपल्याच पक्षातील भाजपचा हस्तक नेता मात्र शांतपणे बसला असून आपली प्रतिमा मात्र खराब होतेय.