'...एका आमदाराचं रामनाम सत्य होणार होतं', संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य; तो आमदार कोण? म्हणाला 'मीच त्यावेळी...'
शिंदेंच्या उठावादरम्यान सुरतला जाताना एका आमदाराचे 'राम नाम सत्य' झाले असते, असे वक्तव्य मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे.
एकनाथ शिंदेंच्या उठावादरम्यान सुरतला जाताना एका आमदाराचे 'राम नाम सत्य' झाले असते, असे वक्तव्य मंत्री संजय शिरसाट यांनी केलं आहे. एका मुलाखतीत 2022 च्या शिवसेना फुटीवेळचा प्रसंग शिरसाट यांनी सांगितला आहे. शिरसाटांचा रोख सुरतहून निसटून परत आलेले आमदार कैलास पाटील यांच्याकडे असल्याचे मानले जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना कैलास पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. कुणाचं राम नाम सत्य होणार होतं हे शिरसाटांनी सांगावं असं आव्हान कैलास पाटलांनी दिलं आहे. शिरसाट यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या उठावाच्या वेळच्या घडामोडींवरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
संजय शिरसाट यांनी यासंदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं की, "ही गेल्या उठावाची घटना आहे. त्यावर आता बोलणे योग्य नाही. जो आमदार होता तो आमच्या ग्रुपमधून निसटला होता. अशा स्थितीत काहीही घटना घडू शकली असती म्हणून मी बोललो. आम्ही सर्वजण सुरतला चाललो होतो. तो पलीकडील ट्रॅकवर गेला होता. आम्हाला जर जबरदस्ती केली असती तर काहीही झालं असते मात्र आम्ही जाऊ दिले. तशी काही कल्पना आमच्या डोक्यात नव्हती".
एकटा माणूस जाणार होता म्हणून मी राम नाम सत्य झाले असते असे सांगितले असे ते म्हणाले आहेत. "एकाने शिंदेंना सांगितले घरचे आजारी आहे. त्यांनी विमान करून दिले, त्यांनी मोकळ्या मनाने काम केले..त्या दरम्यान काही आमदार आम्हाला येऊन भेटले.
"रामनाम सत्य म्हणजे नेमकं काय? कोणाला थांबवलं, कशासाठी थांबवलं आणि कोणाचं रामनाम सत्य होणार होतं याबाबत स्पष्टीकरण त्यांनी देणं गरजेचं आहे. सूरतमधील आलेला आमदार मी एकटाच होतो. राजकारणात सत्ता मिळवण्यासाठी कोण कोणत्या स्तराला जाऊ शकतं हे त्यांच्याच तोंडून समोर आलं आहे. याची गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस चौकशी करणार का? हाच माझा प्रश्न आहे. कोणी कोणाला कशासाठी थांबवलं आणि नेमकं यातून काय होणार होतं याची चौकशी होणार का?," अशी विचारणा कैलास पाटील यांनी केली आहे.