SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

शिंदेंनी भाजपाकडून 500 कोटी घेतल्याच्या जरांगेंच्या आरोपावर शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'तुमचा आदर करतो, म्हणून...'

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केला आहे. एकनाथ शिंदेंनी भाजपाकडून 500 कोटी घेतले आणि मला दिले असं भाजपा नेत्यांना सांगितलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Oct 20, 2026, 06:14 PM IST | Updated: Oct 20, 2026, 06:30 PM IST
Image Credit: शिंदेंनी भाजपाकडून 500 कोटी घेतल्याच्या जरांगेंच्या आरोपावर नरेश म्हस्केंनी दिलं उत्तर
Join

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केला असून एकच खळबळ उडवून दिली आहे. एकनाथ शिंदेंनी भाजपाकडून 500 कोटी घेतले आणि मला दिले असं भाजपा नेत्यांना सांगितलं असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मनोज जरांगेंनी एकनाथ शिंदेंना हे खरं आहे की नाही हे जाहीर करावं असं आव्हान दिलं आहे. तसंच आपल्याकडे यासंदर्भात पुरावा असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. यानंतर शिवसेना नेते नरेश म्हसके यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

जरांगे पाटलांच्या 500 कोटींच्या आरोपावर ते म्हणाले आहेत की, "एकनाथ शिंदेंनी मराठा समाजाकरिता जे काम केलेलं आहे, ते यापूर्वी मनोज जरांगे यांनी सुद्धा मान्य केलेलं आहे आणि मराठा समाजही ते मान्य करीत आहे. ते मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री झाल्यानंतर राज्य सरकार मराठा समाजाला न्याय देण्याकरता प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत. मला आताच जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपासंदर्भात समजले. शिंदे हे देणारे आहेत, शिंदे साहेब कुणाकडून काही घेणारे नाहीत, हे संपूर्ण हिंदुस्थानला माहिती आहे".

"आज दसरा मेळावा आहे, दुर्जनांचा नाश करण्याचा दिवस आहे. त्या दिवशी मी मनोज जरांगे यांना दसऱ्याच्या आणि येणाऱ्या दिवाळीच्या शुभेच्छा देतो. परंतु एखाद्या मोठ्या नेत्यावर आरोप करताना किंवा त्याच्याविषयी मत व्यक्त करताना विचार करून मत व्यक्त करणं गरजेचं आहे. त्यांनी काय वक्तव्य केल त्याचा थोडा मी अभ्यास करतो आणि मग त्याचं उत्तर देतो," असं ते म्हणाले.

हेही वाचा - शिंदेंनी भाजपाकडून 500 कोटी घेतले अन् मला...; मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा; म्हणाले 'श्रीकांत शिंदेंनी माझ्याकडे...', कोण कोणाचा गेम करतंय?
 

पुढे त्यांनी सांगितलं की, "कोणी कोणाला संपवण्याचा हा विषय नाही. मराठा समाजाचं काम आहे. मराठा समाजाचे आपण नेते आहात. मनोज जरांगे म्हणून आम्ही तुमचा आदर करतोय. आम्हीसुद्धा मराठा समाजामध्येच काम करतो. आम्हीसुद्धा मराठा समाजाचेच आहोत, त्यामुळे कुणाला संपवण्याचा विषय नाही. शिंदे साहेबांना टार्गेट करण्याचा जर कोण प्रयत्न करत असेल, तर त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की शिंदे साहेब हा जनमाणसांमधला, मातीशी नाळ जुळलेला नेता आहे. सर्वसाधारण कार्यकर्त्यांपासून त्यांनी राजकारणाला सुरुवात केलेली आहे आणि ते इथपर्यंत पोचलेले आहेत. त्यामुळे असे कोणीही प्रयत्न करत असतील तरी शिंदे साहेबांचं लोकांच्या मनावरचं स्थान कुठेही कमी होणार नाही".

मनोज जरांगेंनी नेमकं काय म्हटलं आहे?

"एकनाथ शिंदे तुम्ही भाजपाच्या लोकांना असं सांगितलं आहे का, की मनोज जरांगे पाटलांना 500 कोटी रुपये द्यायचे आहेत. तुम्ही भाजपाकडून 500 कोटी घेऊन  मला दिले आहेत असं भाजपाच्या नेत्याला सांगितलं का? कारण ते नेते कुजबुज करु लागले आहेत की, मनोज जरांगे पाटलांना श्रीकांत शिंदेंच्या हातून 500 कोटी पोहोचले आहेत. जरांगे पाटील आपले थर्ड पर्सन आहेत असं तुम्ही भाजपाला सांगितलं का? तुम्ही जर मला 500 कोटी दिले नसतील तर भाजपा नेमकं तुम्हाला संपवत आहे की तुम्ही मला याचा छडा लावल्याशिवाय शांत बसणार नाही," असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

पुढे ते म्हणाले की, "'मी सोडणार नाही. भाजपात अंतर्गत चर्चा सुरु आहे. पण मनोज जरांगे सोपा नाही. मी मुळात हात घातला आहे. चर्चा कोणाच्यात झाली याचे पुरावे द्या असं सांगितलं आहे. माझ्याकडे पुरावा असून, तो समोर आणणार आहे. शिंदे भाजपाला खोटं बोलले आहेत. त्यांच्याकडून 500 कोटी घेऊन मला दिले सांगितलं. मग 500 कोटी कुठे आहेत? मी 5 हजारांचा गठ्ठाही बघितलेला नाही. शिंदेजी, हे जर खोटं असेल तर दिलखुलास सांगावं. मग मी त्यांच्याकडे पाहतो. खरं असेल तर तसंही सांगावं, की माझ्या मुलाच्या हातून 500 कोटी दिले".

 

Add Zee News as a Preferred Source

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा

ZEENEWS TRENDING STORIES