प्रत्यक्ष गोळ्या झाडल्या तेव्हाचा व्हिडीओ समोर! टायगर ड्रायव्हिंग सीटवर आला अन्...; एका गोंधळामुळे टायगरचा जीव वाचला; 2 नवे थरारक Video
अभिनेता टायगर श्रॉफवर रविवारी रात्री झालेल्या गोळीबाराचे दोन नवे व्हिडीओ समोर आले असून गोळीबारापूर्वी काय घडलं आणि त्यानंतर काय झालं हे या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. नक्की त्या मैदानाच्या गेटजवळ घडलं काय जाणून घेऊयात...
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर मुंबईतील जुहू परिसरातील पुष्पा पार्क मैदानाजवळ गोळीबार झाल्याच्या घटनेनं मायानगरी मुंबई रविवारी सायंकाळी हादरुन गेली. सुदैवाने यामधून टायगर बचावला असला तरी या गोळीबारमध्ये तीन जण जखमी झाले आहेत. बिश्नोई टोळीनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली असून हल्लेखोर गर्दीचा फायदा घेऊन पसार झाले आहेत. असं असतानाच दुसरीकडे हा हल्ला झाला तेव्हाचा नेमका क्षण आणि हल्लेखोर एका उपस्थिताच्या कॅमेरामध्ये कैद झाले आहेत. नक्की घडलं काय ते जाणून घेऊयात...
नेमका कधी झाला हल्ला?
टायगर श्रॉफ हा काही कलाकारांसोबत पुष्पा मैदान येथे फुटबॉलची फ्रेंडली मॅच खेळण्यासाठी आला होता. मॅच झाल्यानंतर सायंकाळच्या सुमारास टायगर चाहत्यांच्या गर्दीमधून आपल्या बीएमडब्ल्यू कारमधून मैदानाबाहेर पडत होता. गाडी मैदानाच्या गेटपासून बाहेर पडून रस्त्याला लागणार इतक्यात चालकाच्या बाजूला बसलेल्या टायगवर गाडीच्या डाव्या बाजूने गोळीबार झाला. आधी उपस्थितांना नेमकं काय होतंय हे समजलं नाही. अनेकांना फटाके फुटत असल्यासारखं वाटलं. मात्र टायगरच्या कारवर गोळीबार होत असल्याचं लक्षात आल्यानंतर एकच पळापळ सुरु झाली.
...अन् तिघे पळून गेले
टायगर त्याच्या कारने बाहेर पडत असतानाच बोनेटच्या डाव्या बाजूला समोरच उभ्या असलेल्या पांढऱ्या रंगाचं शर्ट घातलेल्या हल्लेखोराने टायगर बसलेला त्या दिशेने गोळीबार केला. एकामागोमाग एक चार गोळ्या झाडल्या. त्याच्यासोबतच्या साथीदाराने टायगर बसलेल्या खिडकीवर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या बंदुकीमधून गोळी सुटलीच नाही. चार गोळ्या झाडून पहिला हल्लेखोर बाजूलाच त्याची वाट पाहत रस्त्यावर बाईक घेऊन उभ्या असलेल्या साथीदाराच्या बाईकवर बसला आणि बाईक पळू लागली. दुसऱ्या हल्लेखोराने बंदुकीतून गोळी सुटत नसल्याचं पाहून घटनास्थळावरुन पळ काढत वेग पकडणाऱ्या बाईकवर उडी मारली आणि तिघांनी तिथून धूम ठोकली.
गन लॉक झाल्याने मोठा अनर्थ टळला
दुसऱ्या हल्लेखोराने टायगर बसलेला त्या खिडकीवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याची गन लॉक झाल्याने एकही गोळी सुटली नाही. दोनदा प्रयत्न केल्यानंतर या हल्लेखोराने प्रयत्न सोडून दिला आणि पळ काढला. गन लॉक झाल्याने मोठा अनर्थ टळल्याचं हा व्हिडीओ पाहिल्यानंतर स्पष्ट होत आहे.
टायगर ड्रायव्हर सीटवर बसला
हल्ला झाल्यानंतर टायगरचा चालक कारमधून उतरला. त्यानंतर एकच गोंधळ सुरु असतानाच टायगर स्वत: कारमध्येच चालकाच्या सीटवर आला आणि तो जखमी अवस्थेतील चालक फरदूसला घेऊन तिथून निघाला. हा सारा घटनाक्रमही कॅमेरामध्ये कैद झाला आहे.
शिंदेंनी घरी जाऊन घेतली भेट
या प्रकरणामध्ये पोलिसांनी तपास सुरु केला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष तुकड्या तयार केल्या आहेत. या प्रकरणात वापरण्यात आलेली पिवळ्या रंगाची बाईक अंधेरी रेल्वे स्थानक परिसरामध्ये सापडली आहे. दरम्यान, दुसरीकडे मध्यरात्रीच्या सुमारास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: टायगरची भेट घेण्यासाठी त्याच्या घरी पोहोचले. त्यांनी टायगरच्या कुटुंबातील सर्वांशी संवाद साधून सरकार तुमच्यासोबत असून घाबरण्याचं कारण नसल्याचं सांगितलं. तसेच आरोपींना लवकरात लवकर अटक केली जाईल असा विश्वास त्यांनी कुटुंबियांना दिला. या प्रकरणात आता पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
टायगरला किरकोळ दुखापत
गनपावडरमुळे भाजल्याने टायगरच्या उजव्या हाताला किरकोळ दुखापत झाली असून शिंदे भेटीला गेले तेव्हा त्याच्या हाताला मलमपट्टी करण्यात आल्याचं दिसून आलं. या हल्ल्यात टायगर श्रॉफचा ड्रायव्हर आणि आणखी एक जण (एक रिक्षाचालक) गोळी लागल्याने जखमी झाले आहेत. सध्या दोघांचीही प्रकृती स्थीर असून त्यांच्या जीवाला कोणताही धोका नसल्याचे सांगितलं जात आहे. "जो कोणी सलमान खानसोबत काम करेल, त्याचा हाच परिणाम सहन करावा लागेल," असं म्हणत लॉरेन्स बिश्नोई गँगच्या अनिल पंडित नावाच्या व्यक्तीने हल्ल्याची जबाबदारी स्वीकरली आहे.