SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

तुकाराम मुंढेच्या टीमचा 'कर्नाटक पॅटर्न'? सर्वसामान्यांचे लाखो रुपये वाचणार? FDA चा नेमका प्लॅन काय?

सध्या एफडीएकडून सुरु असलेल्या या प्रयत्नांना यश आलं तर सर्वसामान्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून त्यांचे उपचारांवरील लाखो रुपये वाचतील असं सांगितलं जात आहे. नेमका हा प्रकार आहे काय? जाणून घेऊयात सविस्तरपणे...

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Oct 23, 2026, 07:29 AM IST | Updated: Oct 23, 2026, 07:53 AM IST
Image Credit: यापूर्वीही एफडीएने मांडलेला हा मुद्दा (प्रातिनिधिक फोटो)
Join

आजारपण आणि त्यातही खासगी रुग्णालय म्हटलं की सर्वसमान्यांना सर्वाधिक चिंता असते ती बिलाची! रुग्णालयाचा खर्च, औषधं, रिकव्हरीदरम्यानचा खर्च अशा गोष्टींचा विचार केला तर पाण्यासारखा पैसा खर्च होतो. त्यातच अनेकदा आरोग्यसेवांच्या नावाखाली ग्राहकांची लूट केली जाते. मात्र आता खासगी रुग्णालयांकडून होणारी ही लूट थांबवण्यासाठी तुकाराम मुंढे आयुक्त असलेल्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) हालचाली सुरु केल्याचं वृत्त आहे. एफडीएला यश आलं तर औषधं आणि वैद्यकीय सामनावरील नफेखोरी रोखता येणार असून यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे या नव्या बदलांसंदर्भातील निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रातील एफडीएकडून शेजारच्या राज्यात सध्या अस्तित्वात असलेल्या यंत्रणेचा अभ्यास केला जातोय.

कोणत्या राज्यातील, कसला अभ्यास करणार एफडीए?

औषधे, वैद्यकीय सामग्री आणि उपकरणांसाठी खासगी रुग्णालयांमध्ये आकारल्या जाणाऱ्या अवास्तव दरांवर नियंत्रण आणण्यासाठी एफडीएकडून 'कर्नाटक पॅटर्न'चा अभ्यास सुरू करण्यात आला आहे. औषधे आणि वैद्यकीय सामग्रीच्या किमतींवर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या कर्नाटकमध्ये नेमकी कोणती कायदेशीर यंत्रणा, निकष आणि नियम लागू करण्यात आले, याची माहिती 'एफडीए' कडून घेतली जात असून अनेक अधिकारी या कामात व्यस्त आहेत.  एफडीएने केलेल्या अभ्यासामध्ये महाराष्ट्रातील अनेक खासगी रुग्णालयांमधील गैरप्रकार समोर आला आहे. अनेक खासगी रुग्णालयांमध्ये वैद्यकीय बिलांबरोबरच उपचारांच्या उपकरणांच्या खरेदीवर अवास्तव नफा कमावला जातोय.

कशा कशाचे घेतात अधिक पैसे

आश्चर्याची गोष्ट म्हणजे 13 कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात सध्या खासगी रुग्णालयांच्या बिलांवर थेट नियंत्रण ठेवणारी स्वतंत्र व्यवस्था नाही. याच कारणामुळे अनेकदा शस्त्रक्रियेसाठीचं सामान, ऑक्सिजन मास्क, औषधे, इम्प्लांट, सिरिंज, नेब्युलायझरसारख्या वस्तूंच्या किमती रूग्णालयांनुसार वेगवेगळ्या आहेत. दरांमध्ये एकसूत्रता नसल्याने या गोंधळाचा अतिरिक्त आर्थिक भार रुग्णांना सहन करावा लागतो.

कर्नाटकात काय आहे?

कर्नाटकात मात्र महाराष्ट्राच्या अगदी उलट चित्र आहे. रुग्णालयांकडून औषधं आणि उपकरणांच्या माध्यमातून होणाऱ्या अशा प्रकारच्या नफेखोरीवर नियंत्रण आणण्यासाठी दरनियंत्रणाची व्यवस्था लागू करण्यात आली आहे. आता कर्नाटकमधील ही व्यवस्था नक्की कोणत्या कायद्यांतर्गत लागू करण्यात आली? त्यासाठी कोणत्या अतिरिक्त तरतुदी करण्यात आल्या आहेत? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर्नाटकमध्ये असलेली अशीच यंत्रणा महाराष्ट्रात लागू करता येईल का? याचा अभ्यास मुंढेंच्या नेतृत्त्वाखालील एफडीएकडून केला जात आहे.

पारदर्शकता आवश्यक

एफडीएने महाराष्ट्रात कोणते संभाव्य बदल केले जावे यासंदर्भात अभ्यासानंतर सादर केलेल्या अहवालामध्ये, खासगी रुग्णालयांच्या बिलांमध्ये पारदर्शकता वाढण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. समान प्रकारच्या औषधे आणि वैद्यकीय सामग्रीसाठी वेगवेगळ्या रुग्णालयांकडून वेगवेगळे दर आकारले जात असल्याने रुग्णांमध्ये संभ्रम निर्माण तर होतोच शिवाय यामुळे त्यांच्यावर आर्थिक ताणही पडतो. वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये वेगवेगळे दर न ठेवता सर्वच दरांमध्ये सुसंगती आणणे आणि अनावश्यक नफेखोरी रोखणे, हा एफडीए सध्या करत असलेल्या कर्नाटक मॉडेलच्या अभ्यासाचा मुख्य उद्देश आहे. यापूर्वी राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाला (एनपीपीए) पत्र लिहून एफडीएने  या नफेखोरीसंदर्भातील मुद्द्याकडे लक्ष वेधले होते. आता एक पाऊल पुढे टाकत मुंढेंच्या नेतृत्वाखालील एफडीए कर्नाटकातील यंत्रणेचा अभ्यास करून महाराष्ट्रात रुग्णांच्या भल्यासाठी आणि त्यांच्यावरील आर्थिक भार कमी करण्यासाठी प्रभावी दरनियंत्रण व्यवस्था उभी करता येईल का, याची पडताळणी करत असून यात यश आलं तर महाराष्ट्रातील जनतेला खूप फायदा होईल, असं सांगितलं जात आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.

ZEENEWS TRENDING STORIES