महाराष्ट्रात रुग्णालयांसंदर्भात लवकरच नवा कायदा! सर्वसामान्यांना मोठा फायदा; 'ही' गोष्ट सर्व रुग्णालयांना बंधनकारक
महाराष्ट्र चिकित्सा आस्थापना कायदा नावाने लागू होणाऱ्या नव्या कायद्यामध्ये नेमकं काय असणार आहे? त्याचा सर्वसामान्य रुग्णांना नक्की काय फायदा होणार आहे? जाणून घ्या ए टू झेड माहिती...
अनेकदा आपत्कालीन परिस्थितीमध्येही औपचारिकता आणि इतर गोष्टींमुळे रुग्णाला वेळीच उपचार मिळत नाही आणि उपचारांना उशीर झाल्याने रुग्णाला प्राण गमावावा लागल्याच्या घटनाही यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. मात्र अपघातानंतरच्या गोल्डन अवर म्हणजेच तातडीने मदत मिळाल्यास जीव वाचण्याच्या कालावधीमध्ये मदत करण्यासंदर्भातील आस्थापना कायदा यंदाच्या विधानसभा हिवाळी अधिवेशनामध्ये संमत करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा इरादा आहे. त्याबाबतचे विधेयक मांडण्यात येणार असून हा कायदा संमत झाला तर त्याचा रुग्णांना मोठा फायदा होणार आहे.
प्राथमोपचार करणं सर्व रुग्णालयांना बंधनकारक
महाराष्ट्र चिकित्सा आस्थापना कायदा असं या कायद्याचं नाव असून या कायद्याच्या माध्यमातून राज्यातील लाखो रुग्णांना त्यांचे कायदेशीर हक्क मिळणं अधिक सोयीस्कर होणार आहे. या कायद्यातील नव्या तरतुदींनुसार, आपत्कालीन परिस्थितीत दाखल होणाऱ्या रग्णांकडे पैशांची मागणी न करता तातडीने त्यांना प्राथमोपचार करणं सर्व रुग्णालयांना कायद्याने बंधनकारक केलं जाणार आहे. हा कायदा यंदाच्या हिवळी अधिवेशनात मंजूर करून घेण्याचा सरकारचा मानस आहे. वैद्यकीय तंत्रज्ञान, उपचार पद्धती आणि रुग्णांच्या हक्कांची वाढती अपेक्षा लक्षात घेत महाराष्ट्र चिकित्सा आस्थापना हा कठोर कायदा अंमलात आणला जाणार आहे. गेल्या काही दशकांमध्ये यासंदर्भातील रुग्णांकडून वाढत्या अपेक्षा लक्षात घेऊन हा कायदा करण्यात आला आहे.
यापूर्वीही विधीमंडळात मांडलेलं विधेयक
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात हे विधेयक दोन्ही सभागृहांत मांडले होते. मात्र, त्यावर सत्ताधारी आणि विरोधकांचे एकमत होऊ शकले नाही. तसेच सत्ताधारी महायुतीमध्येच या विधेयकातील काही तरतुदींवर मतभिन्नता झाल्याने हे विधेयक दोन्ही सभागृहांच्या संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठविण्यात आले होते.
समिती आणि लोकांचे सल्ले
आबिटकर यांच्या अध्यक्षतेखालील संयुक्त चिकित्सा समितीने विधेयकातील तरतुदींच्या अनुषंगाने सल्ले मागवले होते. राज्यातील जनतेबरोबरच संबंधित विषय क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संस्था, संघटना, स्वयंसेवी संस्थाकडून सदर विधेयकासंदर्भातील सूचना, सुधारणा मागवण्यात आल्या होत्या. राज्यभरात विविध ठिकाणी बैठका घेऊन सबंधितांशी चर्चा करुन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आल्यानंतर या कायद्याचा अंतिम मसुदा तयार करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितले. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात समितीचा अहवाल आणि विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येईल.
कायद्याचा उद्देश काय?
रुग्णांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवणे, खासगी आरोग्य सेवांमध्ये पारदर्शकता आणण्याबरोबरच सर्व वैद्यकीय संस्थांमध्ये आरोग्य सेवेचा एक किमान दर्जा राखणे या उद्देशाने हा नवीन कायदा आणण्यात येत आहे.
पैसे नाहीत म्हणून उपचार नाकारणाऱ्या रुग्णालयांवर आता....
महाराष्ट्र चिकित्सा आस्थापना या नव्या प्रस्तावित कायद्यातील तरतुदीनुसार, अधिकृत नोंदणीशिवाय कोणताही दवाखाना, रुग्णालय सुरू करण्यास बंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही रुग्णाला पैसे नाहीत म्हणून उपचार नाकारणाऱ्या रुग्णालयांवर आता कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असून तशी तरतूद नव्या कायद्यात आहे.