नाशिकमध्ये खळबळ! रिटायर होण्याच्या 24 तास आधी मालेगाव महापालिका आयुक्ताला अटक
नाशिकमध्ये खळबळजनक घडामोड घडली आहे. मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांना ACB ने अटक केली आहे.
नाशिक : नाशिकमध्ये कुंभमेळ्याची तयारी सुरु असतानाच खळबळजनक वृत्त समोर आले आहे. मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. कंत्राटदाराचे बिल काढण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप केला जात आहे.
नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांना सुरुवातीला ताब्यात घेतले असल्याचे सांगितले जात होते. मात्र, नंतर त्यांना अटक झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्यासह उद्यान अधीक्षक नीलेश पाटील यांनाही ACB कडून ताब्यात घेतले आहे.
रवींद्र जाधव यांनी कंत्राटदाराचे बिल काढण्यासाठी 4 टक्के लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. दोन वेगवेगळ्या कामांचे 20 लाख रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी रवींद्र जाधव यांनी लाच मागितल्याचा आरोप केला जात आहे.
लाचेची रक्कम मागितल्याप्रकरणी तक्रारदाराने ACB कडे तक्रार दिली होती. तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई केली. आयुक्त रवींद्र जाधव यांना ताब्यात घेतल्यानंतर ACB चे पथक नाशिक कार्यालयात दाखल झाले. त्यांची चौकशी सुरु आहे.
विशेष म्हणजे रवींद्र जाधव हे उद्या रिटायर होणार होते. त्याच्या आदल्या दिवशी त्यांच्यावर अटकेची कारवाई झाल्यामुळे त्यांचं निवृत्तीवेतन आणि इतर सुविधा अडचणीत सापडणार आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण?
नाशिक लाचलूचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचत मालेगावात धाड मारली. मूळ तक्रारदार हे ठेकेदार असून त्यांनी केलेल्या 2 कामांचे बिल पास करण्यासाठी रविंद्र जाधव, आयुक्त, महानगरपालिका मालेगाव जि. नाशिक व त्यांचे स्वीय सहायक निलेश पाटील, अकाउंट हरीश डिंबर यांनी प्रत्येकी 4 टक्के प्रमाणे 80,000 हजार रूपये लाचेची मागणी केली आहे. म्हणून त्यांचे वर मालेगाव किल्ला पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे आयुक्त रवींद्र जाधव यांच्यावर या आधीही ACB ची कारवाई झाली आहे