वाहनचालकांची रोजची कटकट मिटणार, 121 ठिकाणी सीएनजी पंप उभारणार, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकसाठी मोठे निर्णय
नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रकल्प व उपाययोजना राबवण्यात येणार आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात तब्बल 121 नवीन ठिकाणी सीएनजी पंप उभारण्यात येणार आहेत. त्यामुळं नाशिककरांना आता सीएनजीसाठी पेट्रोल पंपावर रांगा लावण्याची गरज नाही.
सध्या पेट्रोल पंपांवर लागणाऱ्या लांबच लांब रांगा कमी करण्यासाठी पुरवठा विभागाने इंधन कंपन्यांना सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचनेनुसार इंधन कंपन्यांसोबत समन्वय साधून नवीन पंप उभारण्याला वेग दिला जात आहे.
सध्या जिल्ह्यात केवळ 23 सीएनजी पंप कार्यरत असून, कुंभमेळ्यात वाढणारी वाहनांची गर्दी पाहता पुरवठा यंत्रणा सक्षम केली जात आहे. नवीन पंप उभारणीबरोबरच गॅसवाहिन्या आणि वितरण यंत्रणेची क्षमता वाढविण्यावरही प्रशासनाकडून भर दिला जाणार आहे.
सध्या जिल्ह्यात सुमारे 23 सीएनजी पंप कार्यरत आहेत. त्यात आठ ऑनलाइन, 15 ऑफलाइन पंपाचा समावेश आहे. त्यामुळं नवीन पंप उभारणीबरोबरच गॅसवाहिन्या, पुरवठा क्षमता आणि वितरण यंत्रणेची क्षमता वाढवण्याबरोबर प्रशासनाला भर द्यावा लागणार आहे. या नवीन पंपामुळं सीएनजीचा पुरवठा सुरळीत होणार आहे. तर वाहनचालकांचा वेळ व प्रतीक्षा कमी होणार आहे.
सीएनजी पंपांना मागणीच्या तुलनेत सध्या पुरवठा वाढवण्याची गरज आहे. सीएनजी पुरवठ्याचा नियमित आढावा घेत गरजेनुसार अतिरिक्त गॅस उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. सध्या काही पंपावर मागणीच्या तुलनेत कमी प्रमाणात पुरवठा होत असल्याने अशा पूर्वीपासून अस्तित्वास असलेल्या पंपांना पुरवठा सुरू करणे आवश्यक आहे.
कुशावर्त कुंड बंद राहणार
1 ते 30 ऑक्टोबरपर्यंत त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त भाविकांसाठी बंद राहणार आहे. प्रशासनाने 31 ऑक्टोबरला असलेल्या सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहणाच्या तयारीसाठी कुंडाचे काम हाती घेतले आहे. कुंडाचे संवर्धन, दुरुस्ती, अद्यावतीकरण आणि सुशोभीकरणाचे काम हाती घेतल्याने कुंड बंद राहणार आहे.
1 ऑक्टोबरपासून ऐन पितृपक्षात भाविकांना आता कुशावर्तात स्नानाची संधी हुकणार आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरी एकाच वेळी ध्वजारोहण केले जाणार आहे. यानिमित्ताने त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्ताची कामे सुरू करण्यात आली आहे.