मोबाईल फोनने भरलेला संपूर्ण ट्रकच चोरीला; दिल्लीहून पुण्यासाठी निघालेला ट्रक मालेगावातून लंपास
नाशिकच्या मालेगावात पंधरा कोटींच्या मोबाईलचा ट्रक चोरीला गेला आहे. दिल्लीहून पुण्यासाठी निघालेला ट्रक मालेगावात चोरीला गेला आहे.
नाशिकच्या मालेगावात पंधरा कोटींच्या मोबाईलचा ट्रक चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीहून पुण्यासाठी निघालेला ट्रक मालेगावात चोरीला गेला आहे. चोरीच्या या वेगळ्याच प्रकाराचे पोलिसही आश्चर्यचकित झाले आहेत. काय आहे नेमकं प्रकरण?
दिल्लीहून रेडमी कंपनीचे मोबाईल घेऊन जाणारा आयशर ट्रक चोरीला गेल्याची तक्रार तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. पोलिसांनी चोवीस तासात ट्रक चालक व घोडेगाव येथील दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून मोबाईलचे बॉक्स, आयशर ट्रक असा 15 कोटी 33 लाखाचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांनी येथे दिली
दिल्ली येथून पुणे येथे रेडमी कंपनीचे मोबाईल फोन घेऊन जाणारी आयशर ट्रक (केए 42 बी 6590) मनमाड-मालेगाव रस्त्यावरील वऱ्हाने शिवारात पेट्रोलपंपाजवळ ट्रकचालक यासीर हकमुद्दीन याने घोडेगाव येथे राहणाऱ्या इरफान आसमोहम्मद खान याच्या मदतीने मोबाईलचे बॉक्स दुसऱ्या वाहनात भरले.
या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी केली. दरम्यान हे बॉक्स इरफान आसमोहम्मद खान व आयशर ट्रक चालक या दोघांनी दुसऱ्या वाहनात भरून घोडेगावजवळील बंद पडलेल्या पोल्ट्री फार्मच्या शेडमध्ये लपवून ठेवले होते. पोलिसांनी बॉक्स व आयशर ट्रक असा 15 कोटी 33 लाख लाख 29 हजार 866 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे
दोघां संशयितांना 16 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मुख्य आरोपीचा शोध पोलिसांतर्फे सुरु आहे. नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अपर पोलिस अधीक्षक सुरज गुंजाळ, मालेगाव ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.