पुण्यातील जगप्रसिद्ध हिंजवडी IT पार्कमधील 5 बड्या कंपन्यांची मोठी मागणी; ऑफिस कॅम्पस मेट्रो स्टेशनला जोडा?
ऑफिस कॅम्पस मेट्रो स्टेशनला कनेक्ट करा अशी मागणी पुण्यातील जगप्रसिद्ध हिंजवडीच्या आयटी पार्क मधील 5 कंपन्यांनी केली आहे. या कंपन्यांमध्ये 90,000 कर्मचारी काम करतात. असे झाल्यास या कर्मचाऱ्यांना थेट ऑफिसच्या दारातून मेट्रो पकडता येणार आहे.
Metro Station Office Connectivity: पुण्यातील जगप्रसिद्ध हिंजवडीच्या आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांसह पुणेकरांची अखेर भयानक वाहतूक कोंडीतून सुटका झाली आहे. माण-हिंजवडी ते शिवाजीनगर अशी बहुप्रतीक्षित पुणेरी मेट्रो अर्थात पिंक लाईनचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. ही मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. पहिल्या टप्प्यात 17 स्थानकं खुली होणार असून गर्दीच्या वेळेत दर सहा मिनिटांनी मेट्रो धावणार आहे. सर्वात खास गोष्ट म्हणजे काही कंपन्यांचे ऑफिस कॅम्पस थेट मेट्रो स्टेशनला जोडले जाणार आहेत. हिंजवडी आयटी पार्कमधील 5 बड्या कंपन्यांनी ऑफिस कॅम्पसला मेट्रो स्टेशन कनेक्ट करण्याची मागणी केली आहे.
हिंजवडी आयटी पार्क, बाणेर, बालेवाडी,वाकड, औंध आणि शिवाजीनगर परिसरात दररोज वाहतुकीचा मोठा ताण पाहायला मिळत होता. याच वाहतूक कोंडीवर पर्याय म्हणून मेट्रो सुरु करण्याची मागणी केली जात होती. माण हिंजवडी - शिवाजीनगर मेट्रो पुणेकरांच्या सेवेत दाखल झाली आहे. पुण्याच्या IT पार्क मध्ये काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
पहिल्या टप्प्यात 17 स्थानकांवरून मेट्रो प्रवास करता येणार आहे.
या मध्ये माण, माण midc सर्कल फेज 2, माण बस डेपो, हिंजवडी फेज 2- सर्कल 2, हिंजवडी फेज 2 - सर्कल 1, पद्मभूषण चौक, श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज चौक, हिंजवडी, हिंजवडी फेज 1, वाकड चौक, श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे, मिटकॉन बालेवाडी, आर के लक्ष्मण म्युझियम बालेवाडी, औंध, सकाळ नगर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, कृषी महाविद्यालय आणि जिल्हा न्यायालय या स्थानकांचा समावेश आहे
तर बालेवाडी हाय स्ट्रीट, बालेवाडी फाटा, बाणेर गाव, बाणेर पाषाण लिंक रोड, भोसले नगर आरबीआय आणि शिवाजीनगर ही स्थानक बंद असणार आहेत. या सहा स्थानकांचं काम टप्प्याटप्प्याने पूर्ण केलं जाणार आहे. विशेष म्हणजे गर्दीच्या वेळेत दर सहा मिनिटांनी मेट्रो उपलब्ध होणार असल्याने नोकरदार आणि आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा प्रवास अधिक वेगवान होण्याची अपेक्षा आहे. मेट्रो साठी 12 रुपयांपासून 62 रुपयांपर्यंत तिकीट दर आकारण्यात येणार आहे.
मेट्रो स्थानकं ऑफिस कॅम्पला जोडण्याचा प्रस्ताव
मेट्रो स्थानक खुली झाली असली तरी या स्थानकापर्यंत पोहचण्यासाठी उत्तम कनेक्टिव्हिटी असावी अशी मागणी केली जात आहे. हिंजवडी आयटी पार्कमधील पाच प्रमुख कंपन्यांना त्यांचे कॅम्पस मेट्रो स्थानकांशी जोडण्यासाठी समर्पित पादचारी पूल (FOBs) उभारण्याची मागणी केली आहे. या कंपन्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) आणि पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड (PITCMRL) यांना प्रस्ताव दिल्याची माहिती समोर येत आहे.
ऑफिसच्या दारात मेट्रो स्टेशन
ऑफिस कॅम्पसला मेट्रो स्टेशनला कनेक्ट केल्यास प्रवाशांना इतर मार्गाने मेट्रो स्टेशनला पोहचावे लागणार नाही. कार्यालयाच्या गर्दीच्या वेळी वर्दळीचे रस्ते ओलांडावे लागणार नाहीत. यामुळे कर्मचाऱ्यांचा प्रवास अधिक जलद आणि सुरक्षित होईल. 5 कंपन्यांनी पादचारी पुल उभारुन कंपनीचे कॅम्पस मेट्रो स्थानकांना जोडण्याची मागणी केली आहे. या 5 कार्यालयांमध्ये अंदाजे 90,000 कर्मचारी काम करतात.