SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

दिलेला शब्द पाळला नाही तर अपक्ष लढा, फलटणचा DNAच अपक्ष लढण्याचा; रामराजे निंबाळकरांचा मंगेश चिवटेंना सल्ला

मंगेश चिवटे यांनीही “मी लढणार आणि जिंकणारच; कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही,” असा ठाम निर्धार व्यक्त केला.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Oct 07, 2026, 09:26 PM IST | Updated: Oct 07, 2026, 09:32 PM IST
Join

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फलटण येथे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार मंगेश चिवटे यांच्या प्रचारार्थ ‘विजय संकल्प सभा’ पार पडली. या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी चिवटे यांना ठाम पाठिंबा देत, "महायुतीत दिलेला शब्द पाळला नाही तर मागे हटू नका, अपक्ष लढा. फलटणचा DNAच अपक्ष लढण्याचा आहे," असा स्पष्ट सल्ला दिला. यावेळी संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी चिवटेंच्या अविरत रुग्णसेवेचा गौरव करत, "आता माघार नाही, चिवटे निवडूनच येणार," असा विश्वास व्यक्त केला. फलटणमधील या एकजुटीमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक ताकदीचे मोठे पाठबळ चिवटे यांच्या पाठीशी उभे राहिले आहे

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधान परिषदेचे आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सभेत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीबाबत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाकडून महत्त्वपूर्ण राजकीय भूमिका मांडण्यात आली. यावेळी बोलताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी मंगेश चिवटे यांना स्पष्ट शब्दांत लढत कायम ठेवण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, “आपण लढतीला तर उतरलेलो आहोत. महायुतीमध्ये राज्यपातळीवर आपलं ऐकलं गेलं नाही, दिलेला शब्द पाळला नाही, तर अपक्ष लढा. फलटणचा DNA मध्येच अपक्ष आहे. तुम्ही काळजी करू नका.”

आपल्या राजकीय प्रवासाचा संदर्भ देताना रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, “मी 1996 साली आलो तेव्हाही असंच सर्वांनी मला पाठवलं होतं.” त्यांच्या या वक्तव्यामुळे मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत फलटणच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.

दरम्यान, सभेत बोलताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीला ठाम पाठिंबा व्यक्त करताना स्पष्ट केले, “एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत मंगेश चिवटे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. आता कोणत्याही परिस्थितीत माघार नाही, तर निवडूनच यायचे.”

मंगेश चिवटे यांच्या जनसेवेचा उल्लेख करताना संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले, “मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून त्यांनी केलेली अविरत रुग्णसेवा हीच त्यांची खरी ताकद आहे. सामान्यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम त्यांनी केले आहे. हीच जनसेवेची पार्श्वभूमी शिक्षक मतदारसंघातील त्यांच्या उमेदवारीची प्रमुख ओळख आहे.”

या विजय संकल्प सभेचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती. त्यामुळे फलटणमध्ये मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाकडूनही राजकीय पाठबळ मिळत असल्याचा संदेश या सभेतून देण्यात आला.

दरम्यान, पुणे येथे मंत्री, खासदार आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंगेश चिवटे यांनी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर फलटण येथे झालेल्या विजय संकल्प सभेतून त्यांच्या उमेदवारीला स्थानिक पातळीवरही पाठबळ देण्याची भूमिका स्पष्ट झाली. यावेळी मंगेश चिवटे यांनीही “मी लढणार आणि जिंकणारच; कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही,” असा ठाम निर्धार व्यक्त केला. त्यामुळे पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मंगेश चिवटे यांच्या लढ्याबाबतचा संदेश फलटणच्या सभेतून अधिक स्पष्ट झाला.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा

ZEENEWS TRENDING STORIES