'छत्री धरल्याने रूपाली चाकणकरांना...', 'चंद्रकांतदादांसाठी खरात बाबाने वेगळा टेबल...'; फोटो शेअर करत शिंदेंच्या नेत्याचा सवाल, 'देवेंद्रजी, जो..'
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षाच्या नेत्याने एक जुना फोटो पोस्ट करत भाजपाचे ज्येष्ठ नेत्यावर निशाणा साधला असून या नेत्यासाठी वेगळा न्याय का लावला जातोय असा सवाल उपस्थित केलाय.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तसेच पुणे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांनी महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. भारतीय जनता पार्टीचे पुण्यातील कोथरूडचे आमदार तसेच ज्येष्ठ नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांचा एक फोटो पोस्ट करत महायुतीमध्ये दोन वेगवेगळ्या नेत्यांना दोन वेगवेगळे न्याय का दिले जात आहेत असा सवाल विचारला आहे. विशेष म्हणजे या पोस्टमध्ये धंगेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तसेच महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकरांचाही उल्लेख केला आहे.
काय म्हटलंय धंगेकरांनी?
पदवीधर मतदारसंघाची निवडणूक, युती धर्म आणि भाजप नेत्यांवरील आरोपांवरुन अनेकदा भाजपाविरोधी भूमिका घेणाऱ्या धंगेकरांनी चंद्रकांत पाटील भोंदूबाबा अशोक खरातच्या पाया पाडत असल्याचा जुना फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पोस्ट करताना त्यांनी या फोटोच्या कॅप्शनमधून आपलं म्हणणं मांडलं आहे. "खरात प्रकरणात खरातसाठी छत्री धरल्याने रूपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हटविण्यात आले, मग खरातचे पाय धरणारे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याबाबतीत वेगळा न्याय का?" असा सवाल धंगेकरांनी विचारला आहे. एवढ्यावरच न थांबता पुढे धंगेकरांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री तसेच भाजपाचे राज्यातील सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीसांचाही उल्लेख केला आहे.
खरात बाबाने वेगळा टेबल मांडला होता का?
"देवेंद्रजी, न्यायाची भूमिका घेताना व्यक्ती पाहून निर्णय होऊ नये. रूपाली चाकणकर यांच्याबाबतीत जो निकष लावला, तोच चंद्रकांतदादा पाटील यांच्याबाबतीतही लावला पाहिजे. चंद्रकांतदादांसाठी खरात बाबाने वेगळा टेबल मांडला होता का?" असा खोचक सवाल धंगेकरांनी आपल्या पोस्टमधून विचारला आहे.
एवढा माज केला नाही पाहिजे, की...; आधीही चंद्रकांत पाटलांवर साधलेला निशाणा
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निकालामध्ये भाजपाला पुण्यात धक्का बसल्यानंतर धंगेकरांनी उघडपणे आपला भाजपा उमेदवाराला विरोध होता अशी विधानं वृत्तवाहिन्यांवरील चर्चांदरम्यान केली. चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य करताना त्यावेळीही धंगेकरांनी, "एवढा माज केला नाही पाहिजे, की लोकांना किळस येईल," असे विधानही केले होते.
एकनाथ शिंदेंमुळे भाजपा सत्तेत, असंही म्हणालेले
ऑगस्ट महिन्यामध्ये एका कथित ऑडिओ क्लिपवरून वाद सुरु असताना धंगेकरांनी लाडकी बहिणीचा मुद्दा उपस्थित करत भाजपवर टीका केली होती. "आज भाजप सत्तेत आहे, ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या 'लाडकी बहीण' योजनेच्या कृपेमुळे आहे. त्यामुळे भाजपने शिवसेनेचे आभार मानावेत आणि त्यांच्या वाचाळ नेत्यांनी शिवसेनेविरोधातील वक्तव्ये थांबवावीत," असं धंगेकरांनी म्हटलं होतं.
चाकणकरांचा राजीनामा
रूपाली चाकणकर यांनी 20 मार्च रोजी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि 29 मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. अशोक खरात प्रकरणावरून वाढलेल्या राजकीय आणि सामाजिक दबावानंतर त्यांनी ही दोन्ही पदं सोडली होती.