प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणी मोठी कारवाई! फरार दोन मुख्य आरोपींनाही अटक; गोव्याला पळून जाताना कर्नाळा अभयारण्यात ठोकल्या बेड्या
निखिल यादव आणि नितेश पवार हे दोघेही गोव्याच्या दिशेने रस्ते मार्गाने पळून जात असताना कर्नाळा अभयारण्य परिसरातून मुंबई-गोवा महामार्गावर पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती आहे.
प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणात ठाणे गुन्हे शाखेच्या तपासाला मोठं यश मिळालं आहे. सलग तिसऱ्या दिवशी कारवाई करत उर्वरित चार फरार आरोपींपैकी दोन मुख्य आरोपींना गुन्हे शाखेने अटक केली आहे. निखिल यादव आणि नितेश पवार हे दोघेही गोव्याच्या दिशेने रस्ते मार्गाने पळून जात असताना कर्नाळा अभयारण्य परिसरातून मुंबई-गोवा महामार्गावर पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती आहे. दरम्यान, या दोघांच्या चौकशीतून हत्येच्या कटामागील अनेक महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान कोर्टात हजर करण्यात आले असता दोघांना 8 ॲाक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे या हत्याकांडाचे नवनवे धागेदोरे समोर येत आहेत. हत्येच्या प्रकरणातील उर्वरित चार फरार आरोपींपैकी निखिल यादव आणि नितेश पवार या दोन आरोपींना ठाणे गुन्हे शाखेने अटक केली आहे. दोन्ही आरोपी गोव्याच्या दिशेने रस्ते मार्गाने पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. मात्र गुन्हे शाखेने सापळा रचत कर्नाळा अभयारण्य परिसरात मुंबई-गोवा महामार्गावर मध्यरात्री दोघांनाही ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
या कारवाईसाठी पोलिसांना मिरा रोडमधून मिळालेल्या माहितीचा मोठा धागा मिळाला. हत्येच्या दुसऱ्याच दिवशी गुन्हे शाखेने मिरा रोड परिसरातून काही संशयित महिलांना ताब्यात घेतलं होतं. या महिला फरार आरोपींच्या संपर्कात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. महिलांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी पोलिसांना काही ठिकाणांची माहिती दिली. याच माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने तपासाची दिशा निश्चित केली आणि सापळा रचत अखेर निखिल यादव आणि नितेश पवार यांना ताब्यात घेत अटक केले
निखिल यादव हा याच परिसरातील एका वडापावच्या गाडीवर काम करत असल्याची माहिती आहे. तर नितेश पवार हा त्याचा साथीदार असल्याचं समोर येत आहे. विशेष म्हणजे, हत्या घडली त्यावेळी हे दोन्ही आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचं बोललं जात आहे. निखिल यादव याने हातवारे केल्याचंही सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आल्याची माहिती आहे. आता या दोन्ही आरोपींच्या चौकशीतून या हत्याकांडातील अनेक महत्त्वाचे प्रश्न उलगडण्याची शक्यता आहे. प्रदीप पुर्णेकर यांच्यावर गोळीबार नेमका कोणी केला? धारदार शस्त्राने हल्ला कोणी केला?
हत्येचा कट कुठे आणि कसा रचला गेला? आणि या संपूर्ण हत्याकांडामागचा सूत्रधार नेमका कोण? या प्रश्नांची उत्तरं आरोपींच्या चौकशीतून समोर येण्याची शक्यता आहे. मात्र तपासात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे.
घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये एकूण पाच आरोपी दिसून येत असल्याची माहिती आहे. यापैकी चार आरोपींची ओळख पटली आहे. मात्र पाचव्या आरोपीची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यामुळे या हत्याकांडात आणखी आरोपींचा सहभाग आहे का, याचाही तपास गुन्हे शाखेकडून केला जात आहे.
दुसरीकडे, प्रदीप पुर्णेकर यांचं कार्यालय तुलनेने छोट्या स्वरूपाचं असल्याची माहिती आहे. कार्यालयाच्या आत गोळीबार झाल्याने त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या इतर व्यक्तींना गोळी का लागली नाही, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणातील घटनाक्रम नेमका कसा घडला, याचा तपशील सीसीटीव्ही, प्रत्यक्षदर्शी आणि आरोपींच्या चौकशीतून जोडण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे.
याचसोबत प्रदीप पुर्णेकर ज्या बिल्डरविरोधात आंदोलन करणार होते, त्या बिल्डरचीही गुन्हे शाखेकडून चौकशी केली जाणार असल्याची माहिती आहे. बिल्डरशी संबंधित अँगलसोबतच राजकीय आणि इतर संभाव्य अँगलचीही पोलिसांकडून पडताळणी केली जात आहे. त्यामुळे आता अटक करण्यात आलेले निखिल यादव आणि नितेश पवार तपासात नेमकी काय माहिती देतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कारण या दोघांच्या चौकशीतून केवळ गोळीबार आणि हल्ला करणाऱ्या आरोपींची भूमिका स्पष्ट होणार आहे की, या संपूर्ण हत्याकांडामागचा मास्टरमाइंडही समोर येणार? याचं उत्तर आता पोलिसांच्या तपासातून समोर येणार आहे.