'प्रत्येक कृतीचा हिशोब ठेवला जाईल, येणारा काळ...'; खुर्चीसाठी स्टेजवरील अपमान नाट्यानंतर रामदास कदमांना सुनील तटकरेंच्या मेव्हण्याचा इशारा
खेडमध्ये आयोजित पोयनार धरणाच्या भूमिपूजन सोहळ्यात भर मंचावर रामदास कदम आणि अजय बिरवटकरांदरम्यानच्या शाब्दिक बाचाबाचीनंतर पहिल्यांदाच सुनील तटकरेंचे मेव्हणे बोललेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी स्टेजवरच केलेल्या अपमानाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरेंचे मेहुणे अजय बिरवटकर यांनी उत्तर दिलं आहे. रामदास कदम यांनी अजय बिरवटकर यांना खेडमध्ये आयोजित पोयनार धरणाच्या भूमिपूजन सोहळ्यात भर मंचावर झापलं. रामदास कदम यांनी मंचावरुनच 'माझ्या खुर्चीवर बसू नकोस' अशा शब्दांत अजय बिरवटकर यांना सुनावलं. या साऱ्या वादग्रस्त संवादाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता अजय बिरवटकर या संदर्भात बोलले आहेत.
स्टेजवरच अजय बिरवटकर यांना, 'थेट वरची पायरी गाठू नका' असा सज्जड दम भरणाऱ्या रामदास कदमांना फेसबुकवरुन उत्तर देण्यात आलं आहे. दोघांमध्ये स्टेजवरच खडाजंगी झाल्याने कार्यक्रमात काही काळासाठी तणावाचं वातावरण निर्माण झालेलं. अजय बिरवटकर यांनी काय उत्तर दिलंय हे जाणून घेण्याआधी नक्की घडलं काय ते समजून घेऊयात...
स्टेजवर झालं काय?
मंत्री योगेश कदम यांचे वडील रामदास कदम भाषण करत असताना सुनील तटकरेंचे मेहुणे अजय बिरवटकर स्टेजवर येऊन थेट कदमांसाठीच्या राखीव खुर्चीवर बसले. हे पाहताच कदम रामदास कदम यांनी आपलं भाषण थांबवत, ''माझ्या खुर्चीवर बसू नकोस, एका एका पायरीने वर जा, थेट वरची पायरी गाठू नका'', असा दमच भरला. यावर बिरवटकरांनीही हात जोडून नाराजी व्यक्त केली. यानंतर रामदास कदम यांनी अजय बिरवटकरांसाठी खूर्चीची व्यवस्था करण्यास सांगितलं. मात्र अजय बिरवटकर यांनी, 'मी हात जोडून विनंती करतोय, मी दु:खात असतानाही कार्यक्रमासाठी आलो आहे,' असं राम कदमांना सांगितलं. त्यावर रामदास कदम यांनी, "माझ्यावर मेहरबानी केली का?" असं सुनावलं. तसंच मी भाषण करतोय असं सांगत थांबण्यास सांगितलं. "दु:खात मी पण आहे. माझीही आईही गेली आहे. दु:खाचं आम्हाला काय सांगत आहात. आपण लोकांसाठी, जनतेसाठी येथे जमलो आहोत आणि जनसेवा हीच ईश्वरसेवा या माध्यमातून आम्ही काम करत आहोत. जनहिताचं काम आम्ही हाती घेतलं आहे. कोयनेच्या पाण्यावरुन तुम्ही माझ्यावर टीका केली. मी त्याचं उत्तर दिलं नाही. पण मी तुम्हाला फाईल दाखवीन," असंही रामदास कदम पुढे म्हणाले.
उतरती कळा लागली की...
या शाब्दिक बाचाबाचीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता या अपमानावर अजय बाविटकरांकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. "उतरती कळा लागली की माणसाची अशीच आगपाखड सुरू होते… कारण वाढतंय ते समोरच्याचं प्रस्थ आणि कमी होतंय ते स्वतःचं वर्चस्व. शेठ हे खुर्चीने नाही, तर कर्तृत्वाने मोठे झालेत आणि हेच काहींच्या अस्वस्थतेचं खरं कारण आहे. नाव अजयशेठ बिरवटकर चर्चा होती, आहे आणि राहणार," अशी पोस्ट 'अजय बाविकटर प्रतिष्ठान'च्या पेजवरुन करण्यात आली आहे.
स्टेजवरची खुर्ची जरी त्यांची असली तरी...
याच पेजवरील अन्य एका पोस्टमध्ये एका स्थानिक पत्रकाराशी बोलताना, "निश्चित या ठिकाणी काही प्रोटोकॉल आहेत. मी देखील जिल्हा परिषद सदस्य आहे. मी जेव्हा उशीरा या ठिकाणी गेलो. एक्झिक्युटीव्ह इंजिनिअरने मला आमंत्रण दिलं होतं. आमंत्रण पत्रिकेमध्ये माझं नाव होतं. मला उशीर झाल्याने त्यासंदर्भातील कारण सांगण्याचा प्रयत्न त्यावेळी मी केला. वरिष्ठ नेत्यांना माझ्या मनात किंतू-परंतू आहे किंवा माझा कशाला विरोध आहे असं वाटू नये इतकाच या स्पष्टीकरणामागील हेतू होता. त्यावेळेस भाषण देणाऱ्या रामदास कदम यांनी, स्टेजवरची ही खुर्ची माझी आहे असं सांगितलं. स्टेजवरची खुर्ची जरी त्यांची असली तरी कोयना हे गाव माझं आहे. ती माझी जन्मभूमि आहे. मी त्यांना त्याच पद्धतीने उत्तर देऊ शकलो असतो. पण मी दिलं नाही. जसं तटकरे म्हणाले की चिखलात आम्ही दगड मारत नाही," असं अजय बाविकटरांनी उत्तर दिलं.
प्रत्येक कृतीचा हिशोब...
या मुलाखतीचा दोन मिनिटांचा व्हिडीओ शेअर करताना, "आज शांत आहोत, कारण आमच्या संस्कारात संयम आहे. पण याचा अर्थ आम्ही विसरलो आहोत असा अजिबात समजू नका. प्रत्येक गोष्ट लक्षात आहे आणि प्रत्येक कृतीचा हिशोबही ठेवला आहे. वेळ बदलायला वेळ लागत नाही. येणारा काळ आमच्या संयमाचा नाही, तर जशास तसं उत्तर देण्याचा असेल लक्षात ठेवा," अशी कॅप्शन 'अजय बाविकटर प्रतिष्ठान' पेजवरुन देत रामदास कदमांना इशारा देण्यात आला आहे.
आता यावर रामदास कदम पुन्हा काही बोलतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.