महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ठाण्यातील कल्याण-डोंबिवली या जुळ्या शहरांजवळ असलेल्या ठाकुर्लीमध्ये एक मोठी कारवाई केली असून या कारवाईमध्ये चक्क एका नक्षलवाद्याला अटक करण्यात आली आहे. ठाकुर्लीसारख्या भागामध्ये नक्षलवादी सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही कारवाई आज म्हणजेच 7 नोव्हेंबर रोजी सकाळी करण्यात आली असून अटक करण्यात आलेली व्यक्ती जहाल नक्षलवादी असल्याची माहिती मिळत आहे.
अटक केलेल्या व्यक्तीचं नाव काय?
हा नक्षलवादी मूळचा झारखंडच्या जंगलातील रहिवासी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तो गेल्या 10 दिवसांपासून ठाकुर्लीमध्ये राहत होता. झारखंड सरकारने या नक्षलवाद्यावर 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. एटीएसतर्फे आरोपीला आज न्यायालयात हजर केले जाईल. अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्याचे नाव संजय सरोज यादव उर्फ संजय गोदराई उर्फ बुधराम असं असून तो 45 वर्षांचा आहे.
स्वत:ची खरी ओळख लपवून
महाराष्ट्र एटीएसने अत्यंत गुप्तपणे मोहीम राबवत या संशयित नक्षलवाद्याला बेड्या ठोकण्यात यश मिळवलं आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अटक करण्यात आलेला व्यक्ती ठाकुर्ली परिसरात नाव बदलून राहत होती. इतरांपासून आपली खरी ओळख लपून ही व्यक्ती ठाकुर्लीत वास्तव्यास होती. या व्यक्तीचे इतर नक्षली नेटवर्कशी काय आणि कसे संबंध आहेत? ठाकुर्लीमध्ये येऊन राहण्यामागे त्याचा काय हेतू होता? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आता एटीएस आणि पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहे.
शहरी भागामध्ये नक्षलवाद
नक्षलवादग्रस्त भागात मोठ्याप्रमाणात सुरक्षा यंत्रणांकडून कारवाया केल्या जात असल्याने अनेक ठिकाणी नक्षलवाद संपुष्टात आला असून नक्षली गटांसोबत काम करणारे अनेक स्थानिक तरुण हे शरण आल्याचं मागील काही काळात पाहायला मिळालं आहे. त्यामुळे नक्षली चळवळीला मोठा धक्का बसल्याने आता त्यांनी आपला मोर्चा शहरांकडे वळवला आहे. शहरी भागात नक्षलवादी कारवाया करण्याचा किंवा नक्षली विचारसरणीच्या व्यक्तींनी आश्रय घेण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. त्याचा एक भाग म्हणून गुप्त माहितीच्या आधारे एटीएसने ही कारवाई केली आणि हा संशयित नक्षली यंत्रणांच्या हाती लागला. सध्या ताब्यात घेण्यात आलेला नक्षली हा लोन वुल्फसारखा म्हणजेच एकटाच काम करत होता का? तो ठाकुर्लीलाच कशासाठी आला होता? त्याला स्थानिकांनी मदत केली का? याचा शोधही घेतला जात आहे. या नक्षलवाद्याचे इतर कोणी सहकारी आहेत का? याचा तपासही केला जातोय.