काळ कोणावर कधी आणि कशी झडप घालेल सांगता येत नाही, असं म्हटलं जातं. याच म्हणीची आठवण नागपूरमध्ये अनेकांना झाली ती मध्य प्रदेशमधून आलेल्या एका अत्यंत विचित्र बातमीमुळे! नागपूरमधील एका शिक्षकाचा मध्य प्रदेशमधील शैक्षणिक सहलीदरम्यान खोल दरीत पडून मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे माकडाने खेचलेली बॅग परत मिळवण्यासाठी संघर्ष करताना तोल जाऊन हा शिक्षक खोल दरीत पडला आणि त्याने प्राण गमावले.
हा शिक्षक कोण? झालं काय?
मिळालेल्या माहितीनुसार नागपूरमधील सोमलवार शाळेमधून 20 विद्यार्थ्यी 40 वर्षीय शिक्षक विजय नाईक यांच्या देखरेखीखाली मध्य प्रदेशातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या पचमढी येथे गेले होते. शाळेतील एनसीसी शिक्षक असलेले विजय नाईक हे या दौऱ्यामध्ये आपल्या वडिलांनाही सोबत घेऊन गेलेले. शुक्रवारी वेगवेगळी पर्यटनस्थळं फिरताना एक विचित्र अपघात झाला.
नेमकी घटना कशी घडली?
शुक्रवारी सकाळी विजय नाईक हे सहकाऱ्यांसोबत पहाटे पचमढीमधील प्रसिद्ध सनराइज पॉईंट येथे सूर्योदय पाहण्यासाठी गेले होते. या ठिकाणी माकडांचा वावर मोठ्या प्रमाणात अनेकदा ते पर्यटकांच्या हातात दिसणाऱ्या गोष्टी खेचतात. असाच काहीसा प्रकार यावेळी नागपूरवरुन इथं आलेल्या गटातील एका शिक्षिकेसोबत घडला. विजय नाईक यांच्या सहकारी महिला शिक्षिकेची बॅग एका माकडाने हिसकावली. अचानक माकडाने हल्ला केल्याने शिक्षिका गोंधळून गेल्या. मात्र विजय नाईक यांनी ही बॅग पकडून ठेवली. काही काळ त्यांच्यात आणि माकडामध्ये बॅगवरुन बरीच खेचाखेची झाली. पण विजय नाईक यांनी बॅग आणि झुंज सोडली नाही.
बॅग मिळाली, पण दरीत पडून जागीच मृत्यू
अखेर काही मिनिटांमध्ये विजय नाईक यांनी धाडसाने त्या माकडाकडून महिला सहकाऱ्याची बॅग परत मिळवली. मात्र, बॅग परत मिळवून हातात आल्यानंतर लगेचच विजय नाईक यांचा पाय घसरला आणि तोल जाऊन ते खोल दरीत कोसळले. या दुर्दैवी घटनेत विजय नाईक यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे नागपूरमधील शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. आता विजय नाईक यांचे पार्थिव नागपूरला पाठवण्यासंदर्भातील नियोजन केलं जात आहे.
शाळेतील विद्यार्थी, सहकाऱ्यांना धक्का
विजय नाईक यांच्यासारखा मन मिळावू, विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असलेला शिक्षक गमावल्याने सोमलवार शाळेवर शोककळा पसरली आहे. अशा विचित्र अपघातामध्ये शाळा एका उत्तम शिक्षकाला गमावून बसल्याच्या बातमीवर कोणाचाच विश्वास बसत नाहीये. केवळ विजय नाईक यांचे सहकारीच नाही तर विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनीही या प्रेमळ शिक्षकाच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली आहे.