'दुष्यंत गौतम यांच्या राज्यपाल नियुक्तीवर स्थगिती आणा', हत्या झालेल्या अंकिता भंडारीच्या आई-वडिलांची मागणी
दुष्यंत गौतम यांची नुकतीच सिक्कीमचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीच्या विरोधात अंकिता भंडारीचे आई-वडील इंडिया गेटवर धरणे आंदोलन करत आहेत.
भाजप सरकारच्या विरोधात आणखी एक आंदोलन उभं राहिलं असून, त्यात राहुल गांधी आणि प्रियंका गांधी सहभागी झाले आहेत. राहुल गांधी यांनी बुधवारी संध्याकाळी इंडिया गेटच्या आवारात उत्तराखंडमधील हत्या प्रकरणातील बळी ठरलेल्या अंकिता भंडारी हिच्या आई-वडिलासंह आंदोलन केलं. सप्टेंबर 2022 मधील एका प्रकरणात नाव समोर आलेले असूनही दुष्यंत कुमार गौतम यांची सिक्कीमचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने त्याच्या विरोधात हे आंदोलन केले जात आहे. दुष्यंत गौतम यांचे नाव अद्याप कोणत्याही आरोपपत्रात आलेले नाही, परंतु अंकिता भंडारीच्या पालकांचा आरोप आहे की, या प्रकरणात अलीकडेच ज्या 'व्हीआयपी'चा (VIP) उल्लेख करण्यात आला आहे, ते गौतमच आहेत.
नेमकी घटना काय?
हे प्रकरण ऋषिकेशमधील एका रिसॉर्टवर रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या 19 वर्षीय अंकिता भंडारीच्या हत्येशी संबंधित आहे. रिसॉर्ट चालवणारे पुलकित आर्य हे भाजपच्या एका माजी नेत्याचे पुत्र आहेत. अंकिताने रिसॉर्टमधील पाहुण्यांच्या लैंगिक मागण्या फेटाळल्यामुळे तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. स्थानिक न्यायालयाने या प्रकरणात तीन जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मात्र, जानेवारी 2026 मध्ये एका अज्ञात 'व्हीआयपी'चा (VIP) उल्लेख असलेल्या आरोपांमुळे आणि त्यासंदर्भातील व्हायरल ऑडिओ व व्हिडिओ क्लिप्सने लक्ष वेधून घेतले. य़ा 'व्हीआयपी' विरुद्ध एफआयआर (FIR) दाखल झाला होता.
आई-वडिलांचं नेमकं म्हणणं काय?
अंकिता भंडारीच्या पालकांनी दुष्यंत गौतम यांच्या राज्यपालपदावरील नियुक्तीला विरोध करत. त्यांनी इंडिया गेटवर धरणे आंदोलन केले, जिथे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी त्यांची भेट घेतली. राष्ट्रपती त्यांचे म्हणणे ऐकून घेतील, त्यांना न्याय मिळवून देतील आणि ही नियुक्ती थांबवतील, असा विश्वास अंकिताची आई सोनी देवी यांनी व्यक्त केला.
अंकिताच्या च्या वडिलांनी सांगितले की, 18 सप्टेंबर 2022 रोजी त्यांच्या मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यानंतर तीन आरोपींना अटक करण्यात आली आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांनी नमूद केले की, कनिष्ठ न्यायालयातील सुनावणीदरम्यान त्यांनी वारंवार 'व्हीआयपी'चा (VIP) उल्लेख केला होता, ही अशी व्यक्ती होती जिचा संबंध मुलीच्या हत्येमागील हेतूशी होता.
माध्यमांशी बोलताना वीरेंद्र सिंह यांनी सांगितले की, सीबीआयचा तपास पूर्ण होईपर्यंत दुष्यंत गौतम यांची नियुक्ती स्थगित ठेवली जावी. ते म्हणाले, "दुष्यंत कुमार यांना तुरुंगात टाकले जावे, अशी आमची मागणी आहे. सीबीआयचा तपास पूर्ण होईपर्यंत दुष्यंत कुमार यांच्या नियुक्तीला मंजुरी देऊ नये, अशी मी राष्ट्रपतींना विनंती करतो."
रिसेप्शनिस्ट म्हणून कार्यरत होती अंकिता
ऋषिकेशजवळील 'वनंतरा रिसॉर्ट'मध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या १९ वर्षीय अंकिताची 18 सप्टेंबर 2022 रोजी हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर चार दिवसांनी तिचा मृतदेह कालव्यातून सापडला होता. न्यायालयाने या प्रकरणात रिसॉर्टचा मालक पुलकित आर्य आणि त्याचे दोन कर्मचारी सौरभ भास्कर व अंकित गुप्ता यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
गेल्या डिसेंबरमध्ये हे प्रकरण पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले. याचे कारण म्हणजे सोशल मीडियावर भाजपचे माजी आमदार सुरेश राठोड आणि अभिनेत्री उर्मिला सनाव्हर (जिने स्वतःला त्यांची पत्नी असल्याचे सांगितले होते) यांच्यातील कथित संभाषणाच्या ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या. यामुळे या हत्या प्रकरणात एका 'व्हीआयपी'च्या (VIP) कथित भूमिकेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले.