उंबरठ्यावर पेटता दिवा अन् दारात सिलिंडर; घरासमोर उडाला भडका; धक्कादायक VIDEO व्हायरल
उंबरठ्यावर पेटता दिवा अन् दारात सिलिंडर; घरासमोर उडाला भडका; धक्कादायक VIDEO व्हायरल
घरात गॅस सिलिंडर असेल तर खूप काळजी बाळगण्याची गरज असते. थोडासा निष्काळजीपणा मोठ्या दुर्घटनेचं कारण ठरु शकते. कर्नाटकची राजधानी बंगळुरूमधील मल्लेश्वरम परिसरात गॅस सिलिंडर डिलिव्हरीदरम्यान धक्कादायक घटना घडली. घरपोच सिलिंडर देण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्याने घराच्या प्रवेशद्वाराजवळ सिलिंडर ठेवताच अचानक त्याला आग लागली. काही क्षणांत आगीच्या मोठ्या ज्वाळा पसरल्या आणि स्फोटासारखा मोठा आवाज झाला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर तो वेगाने व्हायरल होतोय. काय घडलंय नेमकं आणि आपण काय काळजी घ्यायला हवी? सविस्तर जाणून घेऊया.
उंबरठ्यावर पेटवलेल्या दिव्यामुळे गॅसने घेतला पेट?
घरातील महिलेने काही वेळापूर्वी प्रवेशद्वार स्वच्छ करून पूजा केली होती. त्यानंतर उंबरठ्यावर तेलाचा दिवा लावला. त्याचवेळी गॅस सिलिंडरची डिलिव्हरी करण्यासाठी कर्मचारी तिथे पोहोचला. त्याच्या खांद्यावर सिलिंडर होता. सिलिंडर खाली ठेवताना त्याचे लक्ष उंबरठ्याजवळ पेटलेल्या दिव्याकडे गेले नाही. दरम्यान, सिलिंडरमधून किरकोळ गॅस गळती होत होती. गळती झालेला गॅस दिव्याच्या ज्योतीच्या संपर्कात आल्याने अचानक आग भडकली.
डिलिव्हरी बॉयचे प्रसंगावधान
सीसीटीव्ही फुटेजमध्ये सिलिंडर खाली ठेवताच त्याच्या आसपास आगीच्या ज्वाळा पसरताना दिसतात. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच डिलिव्हरी कर्मचाऱ्याने तातडीने तिथून अंतर ठेवले. त्याच्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली. या घटनेत डिलिव्हरी कर्मचाऱ्याला गंभीर दुखापत झाली नाही. तसेच परिसरातील इतर नागरिकही सुरक्षित असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
घटनेची माहिती मिळताच मल्लेश्वरम पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीची पाहणी करून आवश्यक कार्यवाही केली. सिलिंडरमधून गॅसची गळती नेमकी कशी झाली?, आग लागण्यामागे कोणती परिस्थिती कारणीभूत ठरली? आणि सिलिंडरच्या सुरक्षिततेबाबत काही त्रुटी होत्या का?, याची तपासणी केली जात आहे.
घरात गॅस सिलिंडर आणताना कोणती काळजी घ्यावी?
या घटनेमुळे घरगुती एलपीजी सिलिंडरच्या सुरक्षित वापराचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. सिलिंडरची डिलिव्हरी घेताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.सिलिंडर घरात आणताना आसपास दिवा, मेणबत्ती किंवा अन्य पेटती वस्तू नसल्याची खात्री करा. सिलिंडर उभ्या स्थितीत आणि हवेशीर जागेत ठेवा. रेग्युलेटर, व्हॉल्व्ह आणि रबर पाइपची नियमित तपासणी करा.गॅसचा वास आल्यास मॅचस्टिक किंवा लायटर पेटवू नका. विद्युत स्विच चालू किंवा बंद करू नका. रेग्युलेटर सुरक्षितपणे बंद करा, शक्य असल्यास दरवाजे-खिडक्या उघडा आणि सुरक्षित अंतरावर जाऊन गॅस एजन्सी किंवा आपत्कालीन सेवांना कळवा, असे आवाहन करण्यात आलंय.