'कर्मचाऱ्याने मला माझी पँट आणि अंतर्वस्त्रेही काढण्यास...'; भारतातल्या 'या' मॉलमध्ये शॉपिंगदरम्यान तरूणीसोबत घडला धक्कादायक प्रकार
ही तरुणी शॉपिंगसाठी झाराच्या स्टोअरमध्ये गेली होती. मात्र या स्टोअरमधून बाहेर पडताना तिला अत्यंत धक्कादायक अनुभव आला. तिने हा सारा अनुभव एका पोस्टच्या माध्यमातून सांगितला आहे. नेमकं ती काय म्हणालीये जाणून घ्या...
भारताचं आयटी हब अशी ओळख असलेल्या बंगळुरुमध्ये एक विचित्र प्रकार घडल्याचा दावा केला जातोय. येथील एका तरुणीने जगप्रसिद्ध 'झारा' ब्रॅण्डच्या स्टोअरमध्ये आपल्यासोबत विचित्र घटना घडल्याचा दावा केला असून तिने येथील कर्मचाऱ्यांवर अत्यंत गंभीर आरोप केलेत. स्टोअरमधून बाहेर पडत असतानाच अचानक अलार्म वाजल्याने या तरुणीला सुरक्षारक्षकांनी रोखलं आणि तपासणीसाठी तिला चक्क कपडे काढायला भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या तरुणीसोबत झालं काय?
आपण कोणतीही गोष्ट चोरून किंवा लपवून दुकानाबाहेर नेत नव्हतो हे अनेकदा सांगूनही त्या कर्मच्यांना पटलं नाही. त्यांनी तिच्यावर कपडे काढून आम्हाला तुझी झडती घेऊ दे असं म्हणत दबाव टाकला. हा सारा प्रकार फारच लज्जास्पद आणि अपमानित करणारा होता असं या तरुणीने म्हटलं आहे. तिने घडलेल्या प्रकाराबद्दलची माहिती 'रेडिट' या सोशल मीडिया वेबसाईटवरील बेंगळुरुमधील 'फोरम साऊथ मॉल'मधल्या झाराच्या दुकानात हे घडल्याचं सांगितलं आहे.
सोशल मीडियावर काय सांगितलं?
या तरुणीने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टला, "चोरीचा खोटा आरोप आणि 'झारा' बेंगळुरूमध्ये कपडे काढण्यास भाग पाडले गेले" असा मथळा दिला आहे. "कर्मचाऱ्यांना संशय होता की मी पैसे न देता एक कपडा स्वतःच्या कपड्यांखाली लपवून बाहेर नेत आहे. मी नकार दिला आणि त्यांनी केलेल्या तपासणीच्या मागणीला विरोध दर्शवल्यानंतरही कर्मचाऱ्यांनी माझी झडती घेण्याचा आग्रह काम ठेवला," असं या तरुणीने म्हटलं आहे.
कर्मचाऱ्यांची वागणूक आक्षेपार्ह
"मी काही कपडे घालून पाहिले होते, परंतु घाईत असल्यामुळे मी काहीही खरेदी केले नाही. स्टोअरमधून बाहेर पडताना सुरक्षा अलार्म वाजला, असं या तरुणीने घटनाक्रम सांगताना नमूद केलं. अशावेळी दुकानांची काही सुरक्षा प्रक्रिया आणि प्रोटोकॉल असतात हे मान्य केलं तरी कर्मचाऱ्यांची वागणूक ही केवळ एखादी सामान्य तपासणी करण्यासाठी आसल्याचं वाटलं नाही. त्यांनी ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली ते फारच आक्षेपार्ह होतं, असं या तरुणीने म्हटलं आहे.
शर्टला स्पर्श करुन पाहण्यास सांगितलं पण...
'झारा'च्या कर्मचाऱ्यांना संशय होता की या तरुणीने तिच्या स्वतःच्या कपड्यांखाली पैसे न भरता एक कपड घातलं आहे. यानंतर या तरुणीने कर्मचाऱ्यांना विनंती केली की, एखाद्या महिला कर्मचाऱ्याने तिची झडती घ्यावी. शर्टच्या कडांना स्पर्श करून मी पैसे न देता काहीही कपड्यांखाली लपवून नेत नाहीये याची खात्री करून घेऊ शकते, असं कर्मचाऱ्यांना सांगितलं.
शर्ट काढण्यासाठी बळजबरी
मात्र, संबंधित महिला कर्मचारी तिला ट्रायल रूममध्ये घेऊन गेली. या महिला कर्मचाऱ्याने तिला तिचा शर्ट काढण्यास सांगितले. महिलेने या महिला कर्मचाऱ्यासमोर शर्ट काढण्यास नकार दिला. मात्र तुला शर्ट काढून दाखवावेच लागेल अन्यथा इथून बाहेर पडता येणार नाही, असं सांगण्यात आलं.
पँट आणि अंतर्वस्त्रेही काढण्यास सांगितले
एवढ्यावरच न थांबताना पुढे या तरुणीने असाही आरोप केला की, 'नंतर या महिला कर्मचाऱ्याने मला माझी पँट आणि अंतर्वस्त्रेही काढण्यास सांगितले. मी याला स्पष्ट नकार दिला.' विरोध करत असतानाही त्या कर्मचाऱ्याने तपासणीदरम्यान उघड्या हातांनी तिच्या शरीराला स्पर्श केला, असा दावाही या महिलेने पोस्टमध्ये केला आहे.