यावेळची सर्वात मोठी बातमी, ज्ञानेश कुमारांची चौकशी होणार; सरकारने दिले आदेश!
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर 2 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. केरळ सरकारने 2006 मधील रस्ता प्रकल्पाशी संबंधित तक्रारीची व्हीएसीबी चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधा देशभरात वातावरण पेटलंय. देशभरात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून (SIR) मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात विरोधकांकडून टीका आणि आंदोलने सुरू आहेत. काँग्रेस, काँकरोच जनता पार्टीसह देशभरातील विरोधी पक्षांनी ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन केली. आता ज्ञानेश कुमारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. असे असले तरी हे प्रकरण वेगळे आहे. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
केरळ सरकारने त्यांच्याविरोधात आलेल्या कथित लाचखोरीच्या तक्रारीची दक्षता आणि भ्रष्टाचारविरोधी विभागामार्फत चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. हे प्रकरण सुमारे 20 वर्षांपूर्वीचे असून, त्यावेळी ज्ञानेश कुमार केरळमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव म्हणून कार्यरत होते. केरळचे गृहमंत्री रमेश चेन्निथला यांनी संबंधित तक्रारीच्या आधारे चौकशीचे निर्देश दिले आहेत.
लाच मागितल्याचा आरोप नेमका काय?
कोल्लम जिल्ह्यातील माजी कंत्राटदार व्ही. ओ. साजन यांनी दक्षता विभागाकडे तक्रार केली आहे. त्यांच्या आरोपानुसार, केरळ स्टेट ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टअंतर्गत (KSTP) रस्त्याच्या कामाची सुमारे 17 कोटी रुपयांची बिले मंजूर झाली होती. मात्र, संबंधित धनादेश जारी करण्यासाठी तत्कालीन PWD सचिव ज्ञानेश कुमार यांनी 2 कोटी रुपयांची लाच मागितल्याचे साजन यांनी तक्रारीत म्हटले आहे. या प्रकल्पाचे काम PATI-BEL या भारत-मलेशिया संयुक्त कंपनीकडे होते.
मलेशियन इंजिनिअरच्या आत्महत्येशीही प्रकरणाचा संबंध
या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले आहे. PATI-BEL कंपनीचे मलेशियन प्रकल्प अभियंता ली सी बीन यांनी 2006 च्या सुमारास आत्महत्या केली होती. बिलांचे पैसे वेळेवर न मिळाल्याने कंपनीचे कंत्राटदार आणि कामगार आर्थिक अडचणीत आले होते, असा दावा साजन यांनी केला आहे. ली यांनी आपल्याला ज्ञानेश कुमार यांनी लाच मागितल्याचे सांगितले होते, असेही साजन यांचे म्हणणे आहे. ली यांच्या कथित आत्महत्येच्या चिठ्ठीतही कुमार यांच्या नावाचा उल्लेख असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, ही चिठ्ठी सार्वजनिक झालेली नाही.
आता पुन्हा तपासाची मागणी
या प्रकरणाची यापूर्वीही दक्षता विभागाने चौकशी केली होती. मात्र, आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे मिळाले नसल्याने पुढील कारवाईची आवश्यकता नसल्याचा अहवाल देण्यात आला होता. 2012 मध्ये काही संबंधित प्रकरणे न्यायालयात 'मिस्टेक ऑफ फॅक्ट' म्हणून सादर करण्यात आली होती, असे केरळच्या गृहमंत्र्यांनी विधानसभेत सांगितले होते. आता साजन यांनी नव्याने तक्रार दाखल केली आहे.
ज्ञानेश कुमार यांची भूमिका काय?
नव्या तक्रारीच्या आधारे व्हीएसीबी प्राथमिक चौकशी करणार असून, त्यानंतर एफआयआर दाखल करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. या प्रकरणात ज्ञानेश कुमार यांच्याकडून आरोपांवर अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.