देशाच्या राजकारणात मोठी घडामोड! 7 वर्षांपूर्वी युती मोडलेल्या पक्षाशी भाजपाची हातमिळवणी; 2027 ची निवडणूक एकत्र लढणार
सप्टेंबर 2020 मध्ये अकाली दलाने एनडीए (NDA) मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यावर आणि लोकसभेच्या खासदार हरसिमरत कौर बादल यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिल्यावर ही युती तुटली होती.
देशाच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि शिरोमणी अकाली दल (एसएडी) यांनी युती जाहीर केली आहे. दोन्ही पक्षांनी 2027 च्या पंजाब विधानसभा निवडणुका एकत्र लढवणार असल्याची घोषणा केली आहे. 2020 मध्ये अकाली दलाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याच्या सहा वर्षांनंतर, आता पुन्हा एकदा या दोन्ही पक्षांची युती झाली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे नेते नितीन नवीन आणि शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनी दिल्लीतील भाजप मुख्यालयात आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत या युतीची घोषणा केली. पत्रकार परिषदेत बोलताना अमित शाह म्हणाले, "भाजप आणि अकाली दल या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी असा निर्णय घेतला आहे की, आम्ही पंजाबमधील निवडणुका एकत्र लढवू." 2027 च्या पंजाब विधानसभा निवडणुकांसाठी विविध राजकीय पक्षांनी तयारी सुरू केलेली असतानाच ही घोषणा करण्यात आली आहे.
'ही युती हिंदू-शीख बंधुभावाचे प्रतीक ठरेल'
पत्रकार परिषदेत बोलताना अमित शाह यांनी भाजप आणि अकाली दल यांच्यातील युतीला "हिंदू-शीख बंधुभावाचे प्रतीक" असे संबोधले. त्यांनी एनडीएचा सर्वात जुना मित्रपक्ष पुन्हा एकदा युतीत परतल्याबद्दल आनंदही व्यक्त केला. शाह म्हणाले की, अकाली दल आता एनडीएचा अधिकृत मित्रपक्ष म्हणून राजकारणात काम करेल.
ते पुढे म्हणाले, "पंजाबमधून अमली पदार्थांचा धोका मुळापासून नष्ट करणे आमचे मुख्य उद्दिष्ट असेल. पंजाबमधून भ्रष्टाचार नष्ट करणे हे एक महत्त्वाचे ध्येय असेल आणि राज्यातील राष्ट्रवादी शक्तींना बळकट करणे ही देखील आमच्यासाठी सर्वोच्च प्राथमिकता असेल."
ते पुढे म्हणाले, "काल जेव्हा मी पंतप्रधानांशी एनडीएच्या विस्ताराबाबत चर्चा केली, तेव्हा पंतप्रधानांनी सुखबीरजी आणि आमच्या अध्यक्षांशीही संवाद साधला. त्यांनी अशी भावना व्यक्त केली की, आता एनडीए पूर्ण झाली आहे; बादल साहेबांच्या पक्षाशिवाय एनडीए अपूर्ण होती. मला विश्वास आहे की पंजाबमध्ये, संपूर्ण देशात आणि जगभरात ही युती हिंदू-शीख बंधुभावाचे प्रतीक बनेल आणि दोन्ही पक्ष या दिशेने एकत्र वाटचाल करतील."
2020 मध्ये तुटली युती
या दोन्ही पक्षांनी 2022 ची विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवली होती. 117 सदस्यांच्या विधानसभेत शिरोमणी अकाली दलाने तीन जागा जिंकल्या होत्या, तर भाजपला दोन जागा मिळाल्या होत्या. सप्टेंबर 2020 मध्ये शिरोमणी अकाली दलाने एनडीए (NDA) मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यावर ही युती तुटली होती. केंद्राच्या तीन कृषी कायद्यांना विरोध दर्शवण्यासाठी लोकसभेच्या खासदार हरसिमरत कौर बादल यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला होता; हे कायदे नंतर मागे घेण्यात आले.
शिरोमणी अकाली दल हा भाजपच्या सर्वात जुन्या मित्रपक्षांपैकी एक आहे. 1996 च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर, पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रकाश सिंग बादल यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला होता आणि त्यानंतर 1997 च्या पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकृत युतीची घोषणा करण्यात आली होती.
2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीही या दोन्ही पक्षांनी पुन्हा एकत्र येण्याबाबत चाचपणी केली होती, परंतु युतीच्या अटींवर एकमत न झाल्यामुळे चर्चा निष्फळ ठरली होती.