बंद कॅफे उघडला, 8 जण आत गेले अन् रात्री साडेतीन वाजता... 21 वर्षीय तरुणीसोबत सहकाऱ्यांचं हादरवणारं कृत्य; 2 महिलांसहीत तिघांना अटक
जिथे काम करते तिथल्या सहकाऱ्यांसोबत रात्री बाहेर पडलेल्या तरुणीसोबत घडला हादरवून टाकणारा प्रकार, नेमकं सोमवार आणि मंगळवारच्या रात्री झालं काय जाणून घ्या सविस्तर...
देशाच्या राजधानीचं शहर असलेल्या दिल्लीमध्ये सामुहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. पूर्व दिल्लीतील प्रीत विहार परिसरात एका 22 वर्षीय तरुणीवर तिच्याच सहकाऱ्यांनी सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी दोन महिलांसह एकूण तीन आरोपींना अटक केली आहे. उर्वरित तीन फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
नक्की घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि या प्रकरणातील सर्व आरोपी कडकडडूमा येथील क्रॉस रिव्हर मॉलमधील एका कॅफेमध्ये एकत्र काम करतात. सोमवार, 23 नोव्हेंबर रोजी रात्री पीडित तरुणीसह तिचे एकूण आठ सहकारी प्रीत विहारमधील 'सल्तनत कॅफे'मध्ये पार्टीसाठी जमले होते. खरं तर हा कॅफे रात्री साडेअकरा वाजता बंद झाला होता. मात्र त्यातील एका कर्मचाऱ्याकडे कॅफेची चावी असल्याने त्यांनी कुलूप उघडून आत बसून मद्यपान केले. त्यानंतर मोठ्या आवाजात गाणी लावून नाचगाण्याची पार्टी रात्री उशीरापर्यंत सुरू होती.
महिलांनी केली मदत
मंगळवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास हे सर्वजण कॅफेमधून बाहेर पडले. पीडितेच्या तक्रारीनुसार, दोन पुरुष सहकाऱ्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला, तर इतर सहकाऱ्यांनी (ज्यामध्ये महिलांचाही समावेश होता) त्यांना या कृत्यात मदत केल्याचं म्हटलं आहे. पीडितेने मंगळवारी पहाटे पावणे सहाच्या सुमारास पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार चार पुरुष आणि दोन महिला अशा एकूण सहा जणांविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
सीसीटीव्ही घेतले ताब्यात
पोलिसांनी आतापर्यंत दोन महिलांसह तीन आरोपींना अटक केली आहे. उर्वरित तीन फरार आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची पथके तैनात करण्यात आली आहेत. पोलिसांनी घटनास्थळाचे आणि परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज ताब्यात घेतले असून, पीडितेचा जबाब नोंदवण्याची आणि तिची वैद्यकीय तपासणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या तरुणीसोबतच्या महिलांनी तिला वाचवण्याऐवजी आरोपींना मदत केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या महिलांनी तिला मदत केली असती तर कदाचित हा प्रकार घडलाच नसता अशी चर्चा आहे.
अनेक प्रश्न अजून अनुत्तरित
मात्र रात्री साडेतीन वाजता हे सर्व आठजण कॅफेमधून बाहेर पडण्याआधी आतमध्ये काय घडलं? नेमका या लोकांमध्ये का संवाद झाला? सर्वजण नशेत होते का? या महिलांनी कोणत्या आमिषाखाली आरोपींना मदत केली? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं सध्या पोलीस शोधत आहेत.