बंगालच्या उपसागरात ‘मुरासू’ चक्रीवादळ! 120 किमी वेगाने वारे वाहणार?; कोणाला मोठा धोका?
बंगालच्या उपसागरात मुरासू चक्रीवादळ सक्रिय झाले आहे. 3 नोव्हेंबरला नेल्लोर-नरसापूर दरम्यान किनारपट्टी ओलांडण्याचा अंदाज आहे. आंध्र प्रदेशात 120 किमी वेगाने वारे आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे आता चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) या चक्रीवादळाला ‘मुरासू’ (Murasu) असे नाव दिले आहे. 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता हे चक्रीवादळ दक्षिण-पश्चिम आणि पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरावर सक्रिय होते. पुढील 24 तासांत त्याची तीव्रता वाढून तीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर ताशी 120 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. काय घडलंय नेमकं? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
चक्रीवादळाचा वेग ताशी 23 किलोमीटर
IMD च्या अपडेटनुसार, मुरासू चक्रीवादळ गेल्या सहा तासांत ताशी 23 किलोमीटर वेगाने पश्चिम-वायव्य दिशेने सरकले. सकाळी 11.30 वाजता त्याचे केंद्र चेन्नईपासून 560 किमी, विशाखापट्टणमपासून 660 किमी, नेल्लोरपासून 630 किमी, मछलीपट्टणमपासून 640 किमी आणि ओंगोलेपासून 680 किमी अंतरावर होते.
तीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता
2 नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत मुरासूची तीव्रता वाढून तीव्र चक्रीवादळ होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर हे वादळ वायव्य दिशेने सरकत दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे येईल. किनारपट्टी ओलांडताना वाऱ्यांचा वेग ताशी 100 ते 110 किलोमीटर, तर झोतांचा वेग 120 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो.
नेल्लोर-नरसापूर दरम्यान किनारपट्टी ओलांडण्याचा अंदाज
IMD च्या अंदाजानुसार, 2 नोव्हेंबरच्या रात्री 11.30 ते 3 नोव्हेंबरच्या पहाटे ४ वाजेदरम्यान नेल्लोर आणि नरसापूरच्या दरम्यान चक्रीवादळ किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे दक्षिण आंध्र प्रदेशातील किनारपट्टी भागांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कुठे मुसळधार पावसाचा इशारा?
2 आणि 3 नोव्हेंबर रोजी किनारपट्टी आंध्र प्रदेश, रायलसीमा आणि तेलंगणामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीचाही इशारा देण्यात आला आहे. तमिळनाडू, दक्षिण ओडिशा आणि छत्तीसगडमध्येही पुढील काही दिवसांत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला
बंगालच्या उपसागरातील समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असे आयएमडीने स्पष्ट केले आहे. आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर 2 ते 4 नोव्हेंबरदरम्यान मासेमारी टाळण्याचा इशारा आहे. किनारपट्टीवरील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचना पाळाव्यात आणि हवामान विभागाचे ताजे बुलेटिन तपासत राहावे.