मोदींच्या ताफ्याचा अंधारातून प्रवास! 12 स्ट्रीट लाईट्स बंद पडल्याने अधिकारी सस्पेंड; सरकारी नोकरी गेली, प्रकरण गंभीर कारण...
पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 ऑक्टोबर रोजी गुजरात दौऱ्यावर असताना नेमकं असं काय घडलं की या अधिकाऱ्याला नोकरी गमवावी लागली? हे प्रकरण अधिक गंभीर का मानन्यात आलं? जाणून घ्या सविस्तर माहिती...
गुजरातमधून एक थक्क करणारी बातमी समोर आली आहे. 31 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरात दौऱ्यादरम्यान झालेल्या एका छोट्या चुकीमुळे सरकारी अधिकाऱ्याला आपली नोकरी गमावावी लागली आहे. हा सारा प्रकार डभोई नगरपालिकेतील एका अधिकाऱ्यासोबत घडला असून सध्या हे प्रकरण गुजरातमध्ये चांगलेच चर्चेत आहे. नेमकं झालं काय होतं आणि हा निलंबित अधिकारी कोण हे जाणून घेऊयात...
नेमकं झालं काय?
31 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या दौऱ्यावर होते. वडोदरा जिल्ह्यातील डभोई येथून पंतप्रधान मोदींचा ताफा स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे जात असताना त्या मार्गावरील एक डझन स्ट्रीट लाईट्स पूर्णपणे बंद पडल्या होत्या. तर काही लाईट्स चालू-बंद होत होत्या. या ठिकाणी स्ट्रीट लाईट्च्या देखभालीची मुख्य जबाबदारी डभोई नगरपालिकेत कार्यरत असलेल्या लाईटिंग विभागाचे प्रभारी महेश वसावा यांच्यावर होती. मात्र मोदींचा ताफा या मार्गावरुन प्रवास करत असतानाच अनेक स्ट्रीट लाईट्स बंद असल्याचं निदर्शनास आलं.
सुरक्षेमध्ये त्रूट
वरकरणी हा प्रकार स्ट्रीट लाईट्स बंद असल्याचा वाटत असला तरी असा प्रकार म्हणजे पंतप्रधानांच्या सुरक्षेमधील त्रुटी म्हणून ग्राह्य धरला जातो. पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान कडक सुरक्षा व्यवस्था असते. व्हीव्हीआयपी व्यक्ती प्रवास करत असलेल्या मार्गावर अशाप्रकारे स्ट्रीट लाईट बंद असणे हा सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर निष्काळजीपणा मानला जातो. हाच ठपका ठेवत या प्रकरणामध्येही कारवाई करण्यात आली आहे.
चौकशी केली अन् नोकरीवरुन काढलं
पंतप्रधानांसारख्या अती महत्त्वाच्या व्यक्तीच्या दौऱ्यादरम्यान हा प्रकार घडल्याने या घटनेची गंभीर दखल घेत प्रशासनाने तातडीने चौकशीचे आदेश देत अवघ्या काही दिवसांमध्ये चौकशीही पूर्ण केली. या व्हीव्हीआयपी मार्गावरील लाईटिंगची जबाबदारी डभोई नगरपालिकेतील लाईटिंग विभागाचे प्रभारी महेश वसावा यांच्याकडे होती असं चौकशीदरम्यान समोर आलं. कामात हलगर्जीपणा केल्याने पंतप्रधानांची सुरक्षा धोक्यात आल्याचा ठपका ठेवत डभोई पालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी 5 नोव्हेंबर 2026 रोजी महेश वसावा यांना तात्काळ निलंबित केले. मोदींच्या ताफ्याच्या मार्गावरील 12 स्ट्रीट लाईट्स बंद असल्याने महेश वसावा यांना आपली सरकारी नोकरी गमवावी लागली.
आधी तपासणी करायला हवी होती
पंतप्रधानांच्या दौऱ्याआधी सुरक्षा आणि प्रोटोकॉलच्या नियमांनुसार अशा व्हीव्हीआयपी मार्गांची मुख्य दौऱ्यापूर्वी तपासणी करणे बंधनकारक असते. महेश वसावा यांनी अशाप्रकारची तपासणी केल्याचं चौकशीमध्ये दिसून आलं नाही आणि त्याचीच किंमत त्यांना नोकरीच्या स्वरुपात मोजावी लागली.