EPFOचा मोठा बदल! UPIवरून थेट PFचे पैसे कधीपासून काढता येणार? मोठी अपडेट
सध्या PF काढण्यासाठी सदस्यांना यूएएन पोर्टलवर ऑनलाइन दावा दाखल करावा लागतो.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) कोट्यवधी सदस्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पीएफमधून पैसे काढण्याची प्रक्रिया आता अधिक सोपी आणि डिजिटल करण्याच्या दिशेने ईपीएफओने मोठे पाऊल उचलले आहे. UPIच्या माध्यमातून पीएफमधील पात्र रक्कम काढण्याच्या सुविधेची काही बँकांसोबत चाचणी सुरू झाली आहे. ही सुविधा डिसेंबर 2026 अखेरपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या ही सुविधा सर्वांसाठी उपलब्ध झालेली नाही.
UPIद्वारे PF काढण्याची सुविधा
सध्या PF काढण्यासाठी सदस्यांना यूएएन पोर्टलवर ऑनलाइन दावा दाखल करावा लागतो. दावा मंजूर झाल्यानंतर ईपीएफओकडून रक्कम संबंधित बँक खात्यात जमा केली जाते. नव्या व्यवस्थेत यूएएन पोर्टल आणि सदस्याचे UPI खाते जोडण्याची योजना आहे. त्यामुळे पीएफमधून पात्र रक्कम काढण्याची प्रक्रिया अधिक जलद आणि सोपी होण्याची अपेक्षा आहे. या सुविधेची सध्या बँकांसोबत चाचणी सुरू आहे.
डिसेंबरअखेरपर्यंत अधिकृत सुरुवात?
ईपीएफओने यूपीआयद्वारे पीएफ काढण्याची सुविधा अद्याप अधिकृतपणे सुरू केलेली नाही. उपलब्ध माहितीनुसार, चाचणी पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर 2026च्या अखेरपर्यंत ही सुविधा सुरू करण्याचे लक्ष्य आहे. मात्र अंतिम तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे सध्या सदस्यांनी UPIच्या माध्यमातून तात्काळ पीएफ काढता येईल, असे समजू नये.
संपूर्ण पीएफ रक्कम काढता येणार नाही
UPI सुविधा सुरू झाली तरी सदस्यांना आपल्या पीएफ खात्यातील संपूर्ण रक्कम मनाप्रमाणे काढता येणार नाही. प्रस्तावित व्यवस्थेनुसार, पात्रता आणि लागू नियमांच्या अधीन राहून जास्तीत जास्त 75 टक्क्यांपर्यंत EPF रक्कम काढता येऊ शकते. किमान 25 टक्के रक्कम पीएफ खात्यात ठेवावी लागेल. शिक्षण, विवाह आणि घराशी संबंधित काही गरजांसाठी आंशिक पैसे काढण्याची तरतूद लागू राहणार आहे. खात्यात शिल्लक राहिलेल्या रकमेवर करमुक्त व्याज मिळत राहील.
नवीन अॅपचीही तयारी
पीएफ व्यवहार अधिक डिजिटल करण्यासाठी ईपीएफओकडून नवीन अॅप विकसित करण्याचीही तयारी असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. हे अॅप सदस्यांच्या बँक खात्याशी जोडले जाऊ शकते. तसेच BHIM आणि इतर यूपीआय अॅप्सशी जोडणी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे PFशी संबंधित सेवा आणि पैसे काढण्याची प्रक्रिया एका डिजिटल व्यवस्थेत आणण्याचा ईपीएफओचा प्रयत्न आहे.
ईपीएफओचा मोठा निधी आणि कोट्यवधी सदस्य
ईपीएफओकडे सध्या सुमारे 30 कोटी सदस्य असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यापैकी सुमारे 7.5 कोटी सदस्य नियमितपणे योगदान देणारे असल्याचे सांगण्यात येते. ईपीएफओच्या एकूण निधीचा आकार जवळपास ₹26 लाख कोटी आहे. त्यामुळे यूपीआयसारख्या डिजिटल सुविधेमुळे मोठ्या संख्येने सदस्यांना पीएफशी संबंधित व्यवहार अधिक सोप्या पद्धतीने करता येण्याची शक्यता आहे. मात्र, अंतिम नियम, पात्रता आणि सुविधा सुरू होण्याची अधिकृत तारीख EPFOकडून स्पष्ट झाल्यानंतरच निश्चित माहिती मिळेल.