कांद्याचे दर वर्षभरात दुप्पट; खाद्यतेल, साखर आणि तांदूळही महागले! महागाईचा मोठा झटका; अहवाल काय म्हणतो?
सप्टेंबर 2026 मध्ये भारतातील किरकोळ महागाई 5.54 टक्क्यांवर पोहोचली. कांद्याचे दर 108 टक्क्यांनी वाढले; खाद्यतेल, साखर आणि तांदूळही महागले. महाराष्ट्रातील महागाईचे आकडे जाणून घेऊया.
सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजेट पुन्हा बिघडण्याची चिन्हे आहेत. सप्टेंबर 2026 मध्ये देशातील किरकोळ महागाईचा दर वाढून 5.54 टक्क्यांवर पोहोचला आहे. विशेषतः खाद्यपदार्थांच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली असून कांद्याच्या दरात वर्षभराच्या तुलनेत तब्बल 108 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. साखर, गूळ, खाद्यतेल आणि तांदळाच्या किमतीही वाढल्याने घरखर्चावर अतिरिक्त भार पडत आहे. केंद्र सरकारच्या ऑक्टोबर मासिक आर्थिक आढाव्यात ही माहिती समोर आली आहे. ग्रामीण भागातील महागाईचा वेग शहरांच्या तुलनेत अधिक असल्याने ग्रामीण कुटुंबांना या दरवाढीचा जास्त फटका बसताना दिसतोय. अहवालात काय म्हटलंय नेमकं? त्याचा सर्वसामान्यांवर कसा परिणाम होतोय? जाणून घेऊया.
किरकोळ महागाई 5.54 टक्क्यांवर
केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या (MoSPI) आकडेवारीनुसार, ऑगस्टमध्ये 4.83 टक्के असलेला किरकोळ महागाईचा दर सप्टेंबरमध्ये 5.54 टक्क्यांवर पोहोचला. म्हणजेच एका महिन्यात 0.71 टक्के-बिंदूंची वाढ झाली. अन्नधान्य आणि खाद्यपदार्थांची महागाई ऑगस्टमधील 5.97 टक्क्यांवरून सप्टेंबरमध्ये 7.74 टक्क्यांवर गेली. याचा थेट परिणाम घरातील किराणा खरेदीवर होत असल्याचे अहवालातून समोर आले आहे.
कांद्याच्या दरात 108 टक्के वाढ
सप्टेंबरमध्ये कांद्याच्या किमतींनी सर्वाधिक लक्ष वेधले. वर्षभराच्या तुलनेत कांद्याच्या दरात 108 टक्क्यांची वाढ झाली. साखरेच्या किमती सुमारे 30 टक्के, तर गुळाच्या किमती 23 टक्क्यांनी वाढल्या. खाद्यतेलाच्या बाबतीतही दरवाढ दिसून आली. रिफाइंड तेल सुमारे 15 टक्के आणि शेंगदाणा तेल 14 टक्क्यांनी महागले. तांदळाच्या किमतीतही आठ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. त्यामुळे भाजीपाला, किराणा आणि स्वयंपाकासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागत असल्याचे चित्र देशभरातील मार्केटमध्ये पाहायला मिळतंय.
कांदा महागण्यामागे काय कारण?
कांद्याच्या दरवाढीमागे पुरवठ्यातील अडचणी महत्त्वाच्या ठरल्या आहेत. मागील रब्बी हंगामातील कांद्याचा साठा कमी होत असताना नवीन खरीप कांद्याची आवक जवळपास महिनाभर उशिराने सुरू झाल्याचे आर्थिक आढाव्यात नमूद आहे. त्यामुळे बाजारात उपलब्ध कांद्याचा पुरवठा कमी झाला आणि किमतींवर दबाव निर्माण झाला. साखरेच्या बाबतीत ऊस उत्पादनात घट, अतिवृष्टी आणि रेड रॉट या रोगामुळे पिकावर परिणाम झाल्याचे कारण सांगण्यात आले आहे. सणासुदीपूर्वी वाढलेली मागणी आणि जागतिक बाजारातील साखरेचा मर्यादित पुरवठाही दरवाढीला कारणीभूत ठरू शकतो, असे तज्ज्ञ सांगतात.
ग्रामीण भागाला शहरांपेक्षा महागाईचा अधिक फटका
सप्टेंबरमध्ये ग्रामीण भागातील किरकोळ महागाई 6.8 टक्के होती, तर शहरी भागात ती 4.88 टक्के नोंदवण्यात आली. खाद्यपदार्थांची महागाई ग्रामीण भागात 8.6 टक्के, तर शहरांमध्ये 7.18 टक्के होती. म्हणजेच ग्रामीण कुटुंबांवर महागाईचा अधिक दबाव आहे. घाऊक महागाईचा दरही ऑगस्टमधील 9.92 टक्क्यांवरून सप्टेंबरमध्ये 11.39 टक्क्यांवर गेला. घाऊक इंधन आणि वीज गटातील महागाई 25.85 टक्क्यांवर पोहोचल्याने उत्पादन आणि वाहतूक खर्चावरही दबाव येऊ शकतो, असे अहवालात नमूद करण्यात आलंय.
महाराष्ट्रातील महागाई किती?
महाराष्ट्रासाठीही सप्टेंबरची महागाई लक्षवेधी आहे. केंद्र सरकारच्या राज्यनिहाय आकडेवारीनुसार, राज्यातील एकत्रित किरकोळ महागाईचा दर 5.18 टक्के होता. ग्रामीण महाराष्ट्रात तो 6.12 टक्के, तर शहरी भागात 4.56 टक्के नोंदवण्यात आला. म्हणजेच राज्यातील ग्रामीण कुटुंबांनाही महागाईचा तुलनेने अधिक भार सहन करावा लागत आहे.