माथेफिरुने घरात घुसून तरुणीवर फेकलं ॲसिड! आई-वडिलांवरही चाकूने वार; धक्कादायक कारण आलं समोर!
लखनऊमध्ये लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याने तरुणीवर ॲसिड हल्ला केला. मुलीला वाचवण्यासाठी आलेल्या आई-वडिलांवरही चाकूने वार केले. आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहे.
एका तरुणाने तरुणीच्या घरात घुसून तिच्यावर ॲसिड फेकल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये घडली आहे. मुलीला वाचवण्यासाठी पुढे आलेल्या तिच्या आई-वडिलांवरही आरोपीने चाकूने हल्ला केला. २९ नोव्हेंबर रोजी पहाटे हुसेनगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उदयगंज परिसरात ही घटना घडली. या हल्ल्यात तरुणीसह तिचे कुटुंबीय आणि आरोपीही जखमी झाले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
पहाटे घरात घुसून तरुणीवर ॲसिड फेकले
रविवारी पहाटे साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास आरोपी तौसिफ ऊर्फ मुन्ना हा तरुणीच्या घरात घुसला. त्याने तरुणीशी लग्न करण्याचा आग्रह धरला. मात्र, तरुणीने नकार दिल्यानंतर त्याने तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात तरुणी गंभीररीत्या भाजली. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली.
आई-वडिलांवर चाकूने हल्ला
तरुणीचा आवाज ऐकून तिचे आई-वडील मदतीसाठी धावले. मात्र, आरोपीने त्यांच्यावरही चाकूने वार केले. या हल्ल्यात आई आणि वडील दोघेही जखमी झाले.तरुणीचा लहान भाऊही या घटनेत जखमी झाला आहे. त्यामुळे कुटुंबातील अनेक सदस्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करावे लागले.
आरोपीही हल्ल्यात जखमी
घरातील आरडाओरडा ऐकून शेजारी मदतीसाठी धावले. त्यांनी आरोपीला पकडले. या झटापटीदरम्यान आरोपीही ॲसिडमुळे भाजला आणि जखमी झाला. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. आरोपीसह जखमींना किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीच्या (KGMU) ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. आरोपीला उपचारादरम्यान पोलिसांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल
आरोपी तौसिफ ऊर्फ मुन्ना हा पीडित कुटुंबाचा दूरचा नातेवाईक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तो तरुणीच्या घराजवळच राहत असल्याचेही वृत्त आहे. तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांनी लग्नाच्या प्रस्तावाला नकार दिल्यानंतर आरोपीचा त्यांच्याशी वाद झाला होता. त्यातूनच हा हल्ला झाल्याचा प्राथमिक तपासात संशय आहे. याप्रकरणी हुसेनगंज पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम अंतर्गत ॲसिड हल्ला आणि हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, घटनास्थळावरील पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि इतर बाबींची तपासणी सुरू केली आहे. तरुणीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.