दोन तरुणींमधील वाद मिटवायला गेला आणि...तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार; नागपुरमध्ये खळबळ!
नागपुरातील काचीपुरा परिसरात दोन तरुणींमधील वाद मिटवण्यासाठी गेलेल्या 16 वर्षीय विद्यार्थ्यावर तरुणी आणि तिच्या भावाने दगडाने हल्ला केला. मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झालाय.
नागपूरमध्ये दोन तरुणींमधील वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या 16 वर्षीय विद्यार्थ्यावर दगडाने हल्ला करण्यात आला. काचीपुरा परिसरातील शिवमंदिराजवळ सुरू झालेल्या वादानंतर हा प्रकार घडला. या वादात विद्यार्थ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झालीय. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अलंकार टॉकीजजवळ ही घटना घडली. कशावरुन झाला वाद? काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
शिवमंदिराजवळ दोन तरुणींमध्ये वाद
काचीपुरा परिसरातील एका शिवमंदिराजवळ दोन तरुणींमध्ये काही कारणावरून वाद झाला. दोघीही एकाच शिकवणी वर्गात जात असल्याचे सांगितले जाते. वाद वाढत असल्याचे पाहून त्याच शिकवणीला जाणाऱ्या 16 वर्षीय विद्यार्थ्याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती शांत करण्यासाठी त्याने आपल्या मैत्रिणीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
मध्यस्थी करणाऱ्या विद्यार्थ्यावरच हल्ला
विद्यार्थ्याने वाद मिटवण्याचा प्रयत्न केल्यानंतर एका तरुणीने त्याच्यावरच हल्ला केला. त्यानंतर तिने आपल्या भावाला घटनास्थळी बोलावले. वाद सोडवण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याला परिस्थिती आणखी गंभीर होईल, याची कल्पनाही नव्हती.
दोघांनी घेरून दगडाने मारहाण
तरुणीचा भाऊ घटनास्थळी आल्यानंतर दोघांनी मिळून विद्यार्थ्याला घेरल्याचे सांगितले जाते. त्यानंतर जवळच्या मैदानातून दगड उचलून त्याच्या डोक्यावर वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली.
मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर प्रकरण चर्चेत आले. व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या दृश्यांमुळे विद्यार्थ्यावरील हल्ल्याची तीव्रता समोर येत आहे.