'तू इतर मुलांशी का बोलतेस?' 17 वर्षीय प्रेयसीला संपवलं; आधी गळा आवळला नंतर चाकूने...
तमिळनाडूमध्ये इतर मुलांशी बोलते म्हणून 23 वर्षीय प्रियकराने 17 वर्षीय प्रेयसीची हत्या केली. आधी गळा आवळला, नंतर चाकूने वार केले. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली.
इतर मुलांशी बोलते म्हणून संतापलेल्या प्रियकराने 17 वर्षीय प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना तमिळनाडूमध्ये घडली आहे. आरोपीने आधी तरुणीचा गळा आवळला आणि त्यानंतर चाकूने वार करून तिचा जीव घेतल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर आरोपीने स्वतःचे आयुष्य संपवण्याचाही प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्याला वाचवले. या प्रकरणी पोलिसांनी 23 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. प्रेमसंबंधातून निर्माण झालेला संशय आणि जोडीदारावर नियंत्रण ठेवण्याची मानसिकता या घटनेतून पुन्हा समोर आली आहे.
सॉयरपुरम परिसरात धक्कादायक घटना
ही घटना तमिळनाडूच्या तूतीकोरीन जिल्ह्यातील सॉयरपुरम परिसरात घडली. मृत तरुणी सोलाईपुदूर येथील रहिवासी होती. ती सेबाथैयापुरम येथील अरुलमिगु मुथुमलाई अम्मन हिंदू हायर सेकेंडरी स्कूलमध्ये अकरावीत शिकत होती. आरोपीची ओळख मुथुराज अशी झाली असून तो प्लंबर म्हणून काम करत होता. अवघ्या 17 वर्षांच्या विद्यार्थिनीची अशा प्रकारे हत्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
दोन वर्षांपासून प्रेमसंबंध
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी आणि मृत तरुणी एकमेकांना ओळखत होते. गेल्या दोन वर्षांपासून त्यांचे प्रेमसंबंध असल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले. तरुणी इतर मुलांशी बोलत असल्याचा त्याला राग होता. तिने इतर मुलांशी बोलू नये, अशी त्याची इच्छा होती. यावरून दोघांमध्ये यापूर्वीही वाद होत असल्याचे वृत्त आहे. घटनेच्या दिवशीही याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर आली आहे.
आधी गळा आवळला नंतर चाकूने केले वार
21 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास मुथुराज चाकू आणि विष घेऊन तरुणीच्या घरी पोहोचला. त्यावेळी तरुणी घरात एकटी होती. इतर मुलांशी बोलण्याच्या मुद्द्यावरून त्यांच्यात वाद झाला. तरुणीने त्याचे म्हणणे मान्य करण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने कथितरीत्या तिचा गळा आवळला. त्यानंतर तिच्या छातीच्या खालच्या भागावर आणि पाठीवर चाकूने वार केले. या हल्ल्यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला.
हत्येनंतर आरोपीचाही आत्महत्येचा प्रयत्न
तरुणीची हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतःलाही संपवण्याचा प्रयत्न केला. त्याने आपल्या डाव्या हाताची नस कापली आणि विष प्राशन केले. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्याला वाचवले. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. सध्या तो धोक्याबाहेर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.