SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

फोन कॉल करण्याची पद्धत बदलणार? TRAI चे नवे नियम 1 जानेवारीपासून लागू; तुमच्यावर काय परिणाम?

TRAI ने टेलिकॉम कंपन्यांसाठी इंटरकनेक्शनचे नवे नियम जाहीर केले आहेत. 1 जानेवारी 2027 पासून IP आधारित नेटवर्क, कॉल क्वालिटी आणि नेटवर्क व्यवस्थापनात कोणते बदल होणार? जाणून घेऊया.

Reported By Pravin Dabholkar Written By Pravin Dabholkar
Published: Nov 05, 2026, 10:48 PM IST | Updated: Nov 05, 2026, 10:57 PM IST
Image Credit: ट्राय नियम
Join

देशातील मोबाईल नेटवर्क आणि कॉल कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. ‘दूरसंचार आंतरजोडणी (तिसरी सुधारणा) विनियम, 2026’ हे नवे नियम जाहीर करण्यात आले असून हे नियम 1 जानेवारी 2027 पासून लागू होणार आहेत. काय आहेत नियम? याचा तुमच्यावर कसा परिणाम होणार? सविस्तर जाणून घेऊया.

आता नव्या इंटरकनेक्शनसाठी IP तंत्रज्ञान बंधनकारक

या नियमांमधील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे 1 जानेवारी 2027 पासून नव्याने तयार होणाऱ्या सर्व टेलिकॉम इंटरकनेक्शनसाठी आयपी आधारित तंत्रज्ञान अनिवार्य असेल. सध्या काही नेटवर्कमध्ये E1/TDM या जुन्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्याऐवजी इंटरनेट प्रोटोकॉलवर आधारित आधुनिक प्रणाली वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे नेटवर्कची क्षमता अधिक कार्यक्षमपणे वापरता येईल. तसेच कॉलची गुणवत्ता आणि नेटवर्कची कार्यक्षमता सुधारण्यास मदत होणार आहे.

जुन्या नेटवर्क व्यवस्थेत बदल

सध्या अस्तित्वात असलेली E1/TDM आधारित इंटरकनेक्शन व्यवस्था टप्प्याटप्प्याने आयपी आधारित प्रणालीमध्ये बदलावी लागणार आहे. यासाठी टेलिकॉम कंपन्यांना तीन वर्षांची मुदत देण्यात आली आहे. म्हणजेच 1 जानेवारी 2027 पासून पुढील तीन वर्षांत जुन्या व्यवस्थेचे आधुनिकीकरण करावे लागेल. या बदलामुळे नेटवर्कमधील डेटा आणि कॉल ट्रॅफिक हाताळण्याची क्षमता सुधारण्यास मदत होणार आहे.

कॉल कनेक्टिव्हिटी अधिक सुलभ

सध्या टेलिकॉम कंपन्यांमध्ये कॉल ट्रॅफिकची देवाणघेवाण एलडीसीए आणि एसडीसीए स्तरावरील पॉइंट ऑफ इंटरकनेक्शनच्या माध्यमातून केली जाते. आता ही व्यवस्था लायसन्स सर्व्हिस एरिया म्हणजेच एलएसए स्तरावर आणण्याची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे नेटवर्कमधील कॉल ट्रॅफिकचे रूटिंग अधिक सोपे होईल. जुन्या व्यवस्थेतील ट्रॅफिकही पुढील तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने नव्या व्यवस्थेत स्थलांतरित करावे लागणार आहे. यामुळे नेटवर्कची विश्वासार्हता वाढण्याची अपेक्षा आहे.

नियम मोडणाऱ्या कंपन्यांना आर्थिक दंड

नव्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी ट्रायने आर्थिक दंडाची टप्प्याटप्प्याने लागू होणारी व्यवस्था तयार केली आहे. इंटरकनेक्शनसंबंधी नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित टेलिकॉम कंपन्यांवर आर्थिक कारवाई होऊ शकते. तसेच कंपन्यांमधील आर्थिक व्यवहारात विलंब झाल्यास व्याजदराची मर्यादाही निश्चित करण्यात आली आहे. हा व्याजदर परस्पर संमतीने ठरवता येईल; मात्र तो SBI च्या एक वर्षाच्या एमसीएलआर दरापेक्षा दोन टक्क्यांहून अधिक ठेवता येणार नाही. या निर्णयामुळे टेलिकॉम कंपन्यांमधील व्यवहार अधिक पारदर्शक होण्याची अपेक्षा आहे.

सामान्य ग्राहकांना काय फायदा?

या बदलांचा फायदा मोबाईल ग्राहकांना अप्रत्यक्षपणे मिळू शकणार आहे. कॉल कनेक्टिव्हिटी, नेटवर्कची कार्यक्षमता आणि कॉलची गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार आहे. असे असले तरी 1 जानेवारीपासून प्रत्येक ग्राहकाच्या फोनमध्ये किंवा कॉल करण्याच्या पद्धतीत लगेच बदल होणार नाही. हा मुख्यतः टेलिकॉम कंपन्यांच्या नेटवर्कमधील तांत्रिक बदल आहे, याची ग्राहकांनी नोंद घ्या.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.

ZEENEWS TRENDING STORIES