SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

तुम्ही ‘विरोधक’ असाल तेव्हा तुम्हालाही...; मोदी-शाहांचं नाव घेत ठाकरेंच्या शिवसेनेचा इशारा; 'हुकूमशहा जनतेला घाबरू लागतो तेव्हा...'

"रामलीला मैदानावर पुढील चार महिने ‘बुकिंग’ आहे व हे मैदान भाजपच्या रामकथावाल्यांनी आधीच बुक करून ठेवले आहे. रामलीला संसदेपासून 4 किलोमीटर, सीबीडी ग्राऊंड 12 कि.मी. आणि बुरारी 20-21 किलोमीटर दूर आहे."

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Oct 14, 2026, 06:23 AM IST | Updated: Oct 14, 2026, 06:48 AM IST
Image Credit: ठाकरेंच्या शिवसेनेचा मोदी-शाहांवर निशाणा (प्रातिनिधिक फोटो)
Join

"मोदी-शहा व त्यांचे सरकार जनतेच्या आंदोलनांना किती घाबरले आहेत, हे त्यांच्या नव्या भूमिकेवरून दिसते. दिल्लीची ओळख फक्त सत्ताकेंद्र, पंतप्रधान, राष्ट्रपती भवन, केंद्रीय कार्यालये, ऐतिहासिक इमारती आणि राजकीय हालचाली इतकीच नाही. दिल्लीतील सडकांनी अशा अनेक बुलंद नाऱ्यांचे आवाज ऐकले आहेत. देशभरातील अन्यायग्रस्तांच्या आंदोलनांना आवाज दिला आहे. कधी थेट संसदेच्या दरवाजांवर धडक, कधी बोट क्लबवर शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे शक्ती प्रदर्शन, तर कधी ‘जंतर मंतर’वर दिवस-रात्र, दिवसेंदिवस सुरू असलेली उपोषणे आणि धरणे. सत्ताधाऱ्यांना विरोध करण्याच्या जागा बदलत राहिल्या, पण आपल्या मागण्यांचा आवाज सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरूच राहिले. या परंपरेला सोमवारी ‘खीळ’ बसली," असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेनं 'जंतर-मंतर'ला आंदोलन स्थळांच्या यादीत वगळल्याच्या विषयाला हात घालताना केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 

मोदी सरकारचा डरपोकपणा सिद्ध केला

"अमित शहांच्या दिल्ली पोलिसांनी आंदोलन करण्याच्या जागेच्या सूचीतून ‘जंतर मंतर’ला वगळले आहे. ‘जंतर मंतर’ हे गेल्या काही महिन्यांपासून मोदी-शहांच्या हुकूमशाही राजवटीस आव्हान देणारे केंद्र बनले होते. भारतीय लोकशाहीचा आत्माच जणू ‘जंतर मंतर’वर मुक्तपणे फिरत होता. भाजपपुरस्कृत अण्णा हजारे यांचे आंदोलन ‘जंतर मंतर’वरच सुरू झाले होते. मध्यंतरी सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली परीक्षेतील भ्रष्टाचाराविरुद्ध शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी 36 दिवसांचे आंदोलन ‘जंतर मंतर’लाच झाले होते. ते इतके भडकले की, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मोदी यांना घ्यावा लागला. कॉक्रोच पार्टीचे जन्मस्थान म्हणून ‘जंतर मंतर’चे महत्त्व गेल्या काही दिवसांत अधोरेखित झाले आहे. आता ‘व्होट चोरी’सह मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारच्या भ्रष्ट कारभाराविरुद्ध सुरू झालेले आंदोलन ‘जंतर मंतर’ला पोहोचण्याआधीच मोदी-शहा यांनी ‘जंतर मंतर’वर लाखो सशस्त्र पोलीस उतरवले आणि आता तर दिल्ली पोलिसांनी ‘जंतर मंतर’वर आंदोलन करण्यास कायमची बंदी घालून मोदी सरकारचा डरपोकपणा सिद्ध केला आहे," असा टोला 'सामना'च्या अग्रलेखातून ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे. 

लोकशाहीचा आवाज बंद करण्याची ही प्रक्रिया

"रामलीला मैदान, बुरारी आणि सीबीडी ग्राऊंड या ठिकाणी आंदोलन करण्याचे नवे आदेश दिल्ली पोलिसांनी काढले आहेत. या सर्व जागा मोदी-शहांच्या घरापासून, भाजप कार्यालयापासून व संसद भवनापासून लांब आहेत. येथे होणाऱ्या आंदोलनांचे पडसाद ना संसदेत उमटतील ना देशात. एक प्रकारे घाबरलेल्या मोदी-शहांनी हुकूमशाही पद्धतीने दिल्लीतील आंदोलनांना रोखण्याचा प्रयत्न केला आहे. ‘जंतर मंतर’वरील लोकशाहीचा गळा दाबून जनतेचा आवाज शांत करण्याची ही पद्धत निषेधार्ह आहे. लोकशाहीत धरणे, आंदोलने, मोर्चे यांना स्थान आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात लोकांनी दिल्लीतील अनेक रस्त्यांवर आंदोलने केली. चांदनी चौक, दरिया गंज, टाऊन हॉल, क्लॉक टॉवर, फिरोजशाह कोटला, कश्मिरी गेट, जामा मशिदीजवळ इंग्रजांच्या राजवटीविरुद्ध निदर्शने होत राहिली. स्वातंत्र्यानंतर सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी आंदोलकांनी संसदेच्या दारातच अनेकदा ठिय्या मांडला व तीच आंदोलनाची जागा झाली. 1966 पर्यंत संसदेच्या दारात ही आंदोलने सुरूच होती. संयुक्त महाराष्ट्राचा लढा दिल्लीत पोहोचला तेव्हा शाहीर अण्णाभाऊ साठे ‘जाग मराठा;आम जमाना बदलेगा’ असे स्वर आळवत डफावर थाप मारत संसद भवनात धडकले होते. इंडिया गेट, बोट क्लबवरही आंदोलने झाली आहेत, पण मोदी-शहा सध्या इतके भयभीत झाले आहेत की,  त्यांनी संसद भवनाजवळचे ‘जंतर मंतर’ कायमचे बंद केले. यापुढे ‘जंतर मंतर’च्या रस्त्यावर भीषण शांतता नांदेल. तेथे धरणे होणार नाहीत, जनतेचा आवाज नसेल, मागण्यांची पोस्टर नसतील. लोकशाहीचा आवाज बंद करण्याची ही प्रक्रिया आहे," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे. 

...याचे भान तरी त्यांनी ठेवायला हवे होते

"रामलीला संसदेपासून 4 किलोमीटर, सीबीडी ग्राऊंड 12 कि.मी. आणि बुरारी 20-21 किलोमीटर दूर आहे. ‘जंतर मंतर’वरील आंदोलकांना भेटण्यासाठी अनेक खासदार व नेते जात असत. नव्या अव्यवस्थेमुळे ते शक्य होणार नाही. मोदी-शहांनी लोकशाहीचा आवाज दिल्लीच्या सीमेबाहेर ढकलला आहे. एका भ्रष्ट, संविधानविरोधी ज्ञानेश कुमारला वाचवण्यासाठी मोदी-शहांनी केलेले हे प्रताप आहेत. हुकूमशहा जनतेला घाबरू लागतो तेव्हा त्याचा अंतकाळ जवळ येतो, हेच सत्य असते. दिल्लीच्या बाहेर आंदोलन करा, असे सांगणारे मोदी-शहा कोण? राज्यकर्ते दिल्लीत येतात व जातात. मोदी-शहांनाही लवकरच जावे लागणार आहे. ते ‘विरोधक’ म्हणून असतील तेव्हा त्यांनाही आंदोलनासाठी ‘बुरारी’ला जावे लागेल याचे भान तरी त्यांनी ठेवायला हवे होते," असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे.

मोदी-शहांनाच पळून जावे लागेल

"संविधानाने शांततापूर्ण आंदोलनाला संरक्षण दिले आहे. रामलीला मैदानावर पुढील चार महिने ‘बुकिंग’ आहे व हे मैदान भाजपच्या रामकथावाल्यांनी आधीच बुक करून ठेवले आहे. रामलीला मैदानाचे भाडे दिवसाचे दीड लाख इतके आहे. गरीब आंदोलकांनी इतके पैसे कोठून आणायचे? ‘जंतर मंतर’वर कोणतेही शुल्क नव्हते. आता व्यापारी मोदी-शहांनी विरोधाचा आवाज उठवणाऱ्यांवर लाखोंचा ‘जिझिया’ कर लावला आहे. मोदींच्या काळात त्यांच्या सरकारला विरोध करणे खर्चिक व कठीण झाले आहे. लोकशाहीलाही महागाईचा फटका बसला. ‘जंतर मंतर’ हे जिवंत आंदोलनाचे ‘स्मारक’ बनले आहे. लोकशाहीचे एक प्रतीक मोदींनी ‘स्मारका’त रूपांतरित केले. ‘जंतर मंतर’चे हे स्मारक मोदी-शहांच्या हुकूमशाही प्रवृत्तीचे थडगे बनेल. अर्थात ‘जंतर मंतर’ शांत होणार नाही. मोदी-शहांनाच पळून जावे लागेल," असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.

ZEENEWS TRENDING STORIES