राहुल गांधींसोबत बसवर दिसलेली ही तरुणी आहे तरी कोण? सोशल मीडियावर तिच्याच फोटोंची चर्चा
राहुल गांधींच्या मागे उभी असलेली ही तरुणी इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरत आहे. ही तरुणी आहे तरी कोण? नेमकं ती काय काम करते? तिचं या बड्या नेत्याशी काय कनेक्शन आहे? जाणून घ्या सविस्तरपणे...
काँग्रेसचे नेते तसेच लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली सर्वोच्च न्यायालयावर काढण्यात आलेल्या विरोधीपक्षांच्या मोर्चामध्ये राहुल गांधींच्या मागे उभ्या असलेल्या तरुणीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. या मोर्चानंतर आजूनही या तरुणीसंदर्भात इंटरनेटवर चर्चा सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. ही तरुणी आहे तरी कोण? तिचं नाव काय? जाणून घ्या सविस्तरपणे...
कोण आहे ही तरुणी?
राहुल गांधींसोबत ट्रकवर उभे राहून घोषणाबाजी करणाऱ्या या तरुणीच्या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. राहुल गांधी ज्या ट्रकने प्रवास करत होते त्या ट्रकमध्ये राहुल गांधींच्या मागे उभ्या असलेल्या या मुलीचे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले असून ही मुलगी आहे तरी कोण असा प्रश्न अनेकांना पडलाय. तर या मुलीचं नाव आहे जन्नत बिश्नोई! जन्नत ही मूळची राजस्थानची आहे.
तिच्याकडे कोणतं पद?
जन्नत ही दिल्लीमधील एका विद्यापीठामध्ये शिकत असून ती काँग्रेस पक्षाची विद्यार्थी शाखा असलेल्या नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाची (NSUI) सदस्य आहे. महिला सुरक्षेच्या मुद्द्यापासून ते पर्यावरणापर्यंत अनेक विषयांवर जन्नत आक्रमकपणे भूमिका घेताना यापूर्वीही दिसून आली आहे.
कोणत्या कामासाठी ओळखली जाते?
जन्नत बिश्नोई दिल्ली विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या श्यामा प्रसाद मुखर्जी कॉलेजमध्ये बीएच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. ती दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेची (DUSU) कार्यकारी सदस्य आहे. जन्नत दिल्लीतील विद्यार्थी राजकारण आणि विद्यार्थी आंदोलनांमध्ये सक्रिय आहे. कॅम्पसमधील महिलांची सुरक्षा हा ती हाताळत असेलल्या प्रमुख मुद्द्यांपैकी एक आहे.
कॅम्पसमधील महिलांना अधिक सुरक्षित वातावरण मिळावं म्हणून कॅम्पसमध्ये सीसीटीव्ही नेटवर्क आणि गुलाबी पोलीस बूथ यांसारख्या उपाययोजनांची मागणी जन्नत बिश्नोईकडून मागील काही काळापासून सातत्याने केली जात आहे. जन्नत बऱ्याच काळापासून कॅम्पसमधील महिलांची सुरक्षा या विषयासंदर्भातील उपाययोजनांबद्दलचा पाठपुरावा करत आहे. तिने राजस्थान वृक्ष संरक्षण विधेयकाशी संबंधित एका मोहिमेसह पर्यावरण मोहिमांमध्येही अनेकदा सक्रीय सहभाग नोंदवला आहे.
सोशल मीडियावर चर्चा
जन्नतच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आंदोलनांचे आणि एनएसयूआयच्या कार्यक्रमांचे अनेक व्हिडिओ आहेत. एका व्हिडिओमध्ये, ती 'पितृसत्ता मोडून काढा' अशी घोषणा देणाऱ्या महिलांच्या ग्रुपचं नेतृत्व करताना दिसत आहे. हा ग्रुप 'आम्हाला न्याय हवा' अशा घोषणा देताना दिसतोय. राहुल गांधींसोबत मोर्चात सहभागी झाल्याने आता जन्नत पुन्हा चर्चेत आली आहे.