'बिहारी महिला एवढ्या मोठ्या आकाराचा सिंदूर लावतात, तो त्यांच्या पतीच्या...', स्टॅण्डअप कॉमेडियनचं अत्यंत घाणेरडं विधान; बिहारमध्ये संतापाची लाट
या स्टॅण्डअप कॉमेडियनने आपल्या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ अपलोड केला असून व्हिडीओमुळे संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळत आहे. नेमकं काय म्हणालाय हा स्टॅण्डअप कॉमेडियन जाणून घ्या
स्टॅण्डअप कॉमेडीच्या नावाखाली अश्लील विधानं आणि शिवीगाळ करण्याचे प्रकार मागील काही काळापासून वाढल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईमध्ये काही महिन्यांपूर्वी प्रणित मोरे प्रकरण चांगलेच गाजले होते. आता अशाच प्रकारचं प्रकरण बिहारमधून समोर आलं आहे. स्टॅण्डअप कॉमेडियन यश माहेश्वरीने बिहारमधील महिलांसंदर्भात अत्यंत घाणेरडं विधान केलं आहे. बिहारमधील महिला भांगेत जो सिंदूर भरतात त्यावरुन केलेल्या विधानामुळे यश माहेश्वरी वादात सापडला आहे.
नेमकं काय म्हटलंय या स्टॅण्डअप कॉमेडियनने?
यश माहेश्वरीने आपल्या स्टॅण्डअप कॉमेडीमध्ये महिलांच्या भांगेतील सिंदूरच्या रेषेच्या लांबीची तुलना पुरुषांच्या गुप्तांगाशी केल्या आरोप केला जात आहे. या संदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बिहारमधील अनेकांनी या स्टॅण्डअप कॉमेडियन आणि युट्यूबवरविरोधात गुन्हा दाखल करुन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या रितू जायसवाल यांनी छठ महापर्वासंदर्भातील श्रद्धा आणि अस्मितेची खिल्ली उडवणं सहन करुन घेतलं जाणार नाही, असा इशारा या प्रकरणावरुन दिला आहे.
बिहारी महिलांबद्दल वादग्रस्त विधान
यश माहेश्वरीने आपल्या युट्यूब चॅनेलवर 21 नोव्हेंबर रोजी एक स्टॅण्डअप कॉमेडीचा व्हिडीओ पोस्ट केला. हा व्हिडीओ दिल्ली-एनसीआरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या यशच्या शोदरम्यान शूट करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. याच कार्यक्रमात कॉमेडीच्या नावाखाली यश बिहारी महिलांबद्दल अत्यंत खालच्या स्तराला जाऊन विधानं करत असल्याचं दिसत आहे.
संतापाची लाट
यश माहेश्वरीने बिहारी महिला भांगेत अधिक लांबीपर्यंत सिंदूर भरत असल्याचा संदर्भ पतीच्या गुप्तांगाच्या लांबीशी जोडला. 'बिहारी महिला एवढ्या मोठ्या आकाराचा सिंदूर लावतात, तो त्यांच्या पतीच्या गुप्तांगाच्या लांबीचं असतो," असं यश माहेश्वरी म्हणाला. यशने पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये तिथे उपस्थित काही प्रेक्षक या विनोदावर हसत असल्याचं ऐकू येत आहे. मात्र हा व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. हा बिहारी महिलांचा अपमान असून यश माहेश्वरीला धडा शिकवण्याची मागणी बिहारमधील लोक करत आङेत. अनेकांनी बिहार पोलिसांच्या हॅण्डलला टॅग करुन या प्रकरणात कारवाई करण्याची मागणी केली आहे.
भाजपाच्या महिला नेत्याकडून एफआयआर दाखल करण्याची मागणी
सामाजिक कार्यकर्त्या तसेच लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक लढलेल्या भाजपाच्या नेत्या रितु जायसवाल यांनी या प्रकरणामध्ये यश माहेश्वरीविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. मंगळवारी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये, "आमच्या छठ महापर्वाचा आणि छठचं व्रत करणाऱ्यांसंदर्भात अश्लील कॉमेडी करणाऱ्या या व्यक्तीविरोधात अशी कठोर कायदेशीर कारवाई केली पाहिजे की ज्यामुळे त्याला त्याच्या चुकीची जाणीव व्हायला हवी. पुढील छठ पुजेला तो आमच्या या महापर्वाचं प्रत्यक्षात दर्शन करायला यायला हवा असा धडा त्याला शिकवला पाहिजे. छठची अस्मिता आणि श्रद्धेशी छेडछाड सहन केली जाणारी नाही," असं रितु यांनी म्हटलं आहे.
माफीचा व्हिडीओ पोस्ट
या प्रकरणावरुन वाद तापल्यानंतर यश माहेश्वरीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन स्पष्टीकरण देताना माफी मागितली आहे. त्याने कोणाच्या भावना दुखावण्याचा आपला हेतू नव्हता, असं म्हटलं आहे. मी असं बोलायला नको होतं, असंही यशने म्हटलं आहे.
मूळचा कुठला आहे यश माहेश्वरी?
यश माहेश्वरी हा स्वत: राजस्थानचा आहे. त्याच्या युट्यूब चॅनेलला 29 हजार सबस्क्रायबर्स आहेत. ही बातमी लिहीपर्यंत तरी यशविरुद्ध कोणताही एफआयआर दाखल झालेला नव्हता.