झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेडने आर्थिक वर्ष 2026-27 च्या दुसऱ्या तिमाहीत दमदार महसूलवाढ नोंदवली आहे. जुलै ते सप्टेंबर 2026 या कालावधीत कंपनीचा ऑपरेटिंग महसूल वार्षिक तुलनेत 13 टक्क्यांनी वाढून 2224.6 कोटी रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या डिजिटल प्लॅटफॉर्म झी5 ने आतापर्यंतची सर्वोच्च तिमाही कमाई नोंदवत 101 टक्के वाढ साधली. FIFA वर्ल्डकप 2026, सबस्क्रिप्शन व्यवसायातील वाढ आणि टीव्हीवरील लोकप्रिय कार्यक्रमांचा कंपनीला फायदा झाला.
झी एंटरटेनमेंटचा दुसऱ्या तिमाहीतील ऑपरेटिंग महसूल 2224.6 कोटी रुपये झाला. मागील वर्षी याच तिमाहीत तो सुमारे 1969 कोटी रुपये होता. डिजिटल, टीव्ही, संगीत आणि सबस्क्रिप्शन व्यवसायातील कामगिरीमुळे ही वाढ झाल्याचे कंपनीने म्हटले आहे.
कंपनीच्या डिजिटल प्लॅटफॉर्म ZEE5 ने तिमाहीतील आतापर्यंतची सर्वोच्च कमाई नोंदवली. मागील वर्षाच्या तुलनेत महसुलात 101 टक्क्यांची वाढ झाली. विविध भारतीय भाषांमधील आशय आणि वापरकर्त्यांचा अनुभव सुधारण्यावर दिलेला भर याचा फायदा झाल्याचे कंपनीने सांगितले. डिजिटल व्यवसाय कंपनीच्या महसूलवाढीतील महत्त्वाचा घटक ठरला आहे.
फिफा वर्ल्डकप 2026 मुळे कंपनीच्या क्रीडा व्यवसायाला चालना मिळाली. स्पर्धेची थेट आणि अन्य माध्यमांवरील एकूण पोहोच ४० कोटींपेक्षा अधिक झाल्याचा कंपनीचा दावा आहे. एकत्रित पाहण्याचा कालावधी सुमारे 50 अब्ज मिनिटांवर पोहोचला. या स्पर्धेमुळे झी5 वरील वापरकर्त्यांचा सहभाग वाढण्यास मदत झाली.
कंपनीच्या टीव्ही आणि डिजिटल व्यवसायातील सबस्क्रिप्शन महसूल वार्षिक तुलनेत 30 टक्क्यांनी वाढला. डिजिटल ग्राहकसंख्या, प्रति ग्राहक सरासरी महसूल आणि टीव्ही सबस्क्रिप्शन दरातील वाढ यामुळे हा फायदा झाला. जाहिरात महसुलात मागील तिमाहीच्या तुलनेत 20 टक्के वाढ नोंदवण्यात आली.
BARC आकडेवारीनुसार, 2026 च्या 24व्या आठवड्यात झी नेटवर्कचा टीव्ही मार्केट शेअर 20 टक्क्यांवर पोहोचला. हा सात वर्षांतील सर्वोच्च स्तर असल्याचे कंपनीने म्हटले आहे. झी म्युझिक कंपनीच्या गाण्यांना तिमाहीत 59 अब्जांहून अधिक व्हिडिओ व्ह्यूज मिळाले, तर युट्यूबवरील सबस्क्राइबर्सची संख्या 17.9 कोटींच्या पुढे गेली. मात्र, कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक तुलनेत घटल्याचेही आर्थिक निकालातून समोर आले आहे.
झी समुहाचे सीईओ पुनित गोयंका यांनी इन्व्हेस्टर कॉलमध्ये खालील मुद्दे मांडले. 'झी 5' (Zee5) च्या महसुलात वार्षिक आधारावर दुप्पट वाढ झाली असून, कंपनी प्रगतीच्या एका भक्कम मार्गावर आगेकूच करत आहे. विविध भाषांमधील मनोरंजन आणि जागतिक क्रीडा आशयामुळे (sports content) एकूण सबस्क्रिप्शन महसुलात वार्षिक 30 टक्क्यांची लक्षणीय वाढ झाली आहे. मला खात्री आहे की, 'झी 5' आता आमच्यासाठी विकासाचे एक प्रभावी माध्यम बनले आहे. आम्ही स्वतःला भविष्याभिमुख कंपनी म्हणून घडवत आहोत, जिथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे जागतिक दर्जाचा आशय (content) सादर करून 'अटेंशन इकॉनॉमी'मध्ये (Attention Economy) जास्तीत जास्त वाटा मिळवण्याचे आमचे ध्येय आहे.
हे साध्य करण्यासाठी, आम्ही संपूर्ण व्यवसायात तंत्रज्ञानावर आधारित नवकल्पनांचा अवलंब करत आहोत, ज्यामुळे कामकाजाची कार्यक्षमता वाढेल आणि ग्राहकांचा अनुभव अधिक समृद्ध होईल. ज्या कंपनीच्या केंद्रस्थानी कंटेट आहे, अशा कंपनीसाठी आपल्या ग्राहकांना वैयक्तिकृत आणि अखंड अनुभव देणे अत्यंत आवश्यक आहे, आणि हे साध्य करण्यासाठी तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी माझी ठाम धारणा आहे. आम्ही कंपनीच्या विविध विभागांमध्ये सर्वोत्तम तांत्रिक प्रतिभांना (talent) जोडून आमच्या टीम्सना अधिक सक्षम करत आहोत, ज्यामुळे आम्हाला अपेक्षित असलेले परिवर्तन घडवून आणणे शक्य होईल.
आमच्या फिक्शन स्टोरीस ज्या आपल्या सांस्कृतिक मुळांशी जोडलेल्या आहेत, त्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत आणि त्यांची कल्पनाशक्ती जागृत करत आहेत. त्याच वेळी, आम्ही आमच्या 'नॉन-फिक्शन' कंटेटला अधिक बळकट करण्यासाठीही मोठा वेळ आणि ऊर्जा खर्च केली आहे. तुम्हा सर्वांना माहीतच आहे की, आपल्या देशातील विविध भाषांची खरी क्षमता ओळखण्यात 'झी' नेहमीच अग्रेसर राहिली आहे. आम्ही असा कंटेट सादर करतो जो आपल्या परंपरा, विधी आणि श्रद्धा प्रणालींमधील सुंदर विविधतेचा उत्सव साजरा करतो. 'नॉन-फिक्शन' आशयाकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोनही प्रेक्षकांच्या मनातील भावना आणि आवडीनिवडी समजून घेण्याच्या आमच्या या सखोल जाणिवेतूनच आला आहे. गेल्या तिमाहीत, आम्ही विविध भाषांमध्ये काही महत्त्वाचे 'आयपी' लाँच केले आहेत. रेटिंग पुन्हा सुरू होण्याची प्रतीक्षा सुरू असताना, आमचा मुख्य भर आमच्या ग्राहकांना दर्जेदार कंटेंट देण्यावर आहे; कारण आम्हाला ठाऊक आहे की, प्रेक्षक आम्हाला रेटिंग किंवा आकड्यांच्या आधारावर नाही, तर त्यांच्या हृदयाला स्पर्श करतो म्हणून निवडतात.
या तिमाहीत, आम्ही जाहिरात महसुलातील घसरणही रोखली आहे. आम्ही धोरणात्मक भागीदारीद्वारे कमाईच्या नाविन्यपूर्ण संधी सतत शोधत आहोत, ज्यामुळे गतिमान जाहिरात क्षेत्रात मूल्य निर्माण करण्याची आमची क्षमता अधिक बळकट होत आहे. विकासाच्या दिशेने पावले उचलत असताना, आम्ही विद्यमान व्यवसायांना अधिक सक्षम करणे आणि नवीन व्यवसायांची उभारणी करणे, यांच्यात एक उत्तम समतोल राखत आहोत. मुलांचे मनोरंजन, 'लाईव्ह' अनुभव, ॲनिमेटेड कंटेट, मायक्रो-ड्रामा आणि अर्थातच क्रीडा क्षेत्रांत आम्ही राबवलेले धोरणात्मक उपक्रम भविष्यातील विकासासाठी निश्चितच एक भक्कम आधार ठरतील.